Friday, September 11, 2026

पोळा सणावर दुःखाचे सावट जनावरांसाठी कडबा कुट्टी करताना विद्युत करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू.


आष्टी (प्रतिनिधी): बळीराजाच्या सर्वात लाडक्या आणि सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या 'पोळा' सणाच्या दिवशीच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील चिखली येथील एका शेतकऱ्याचा गोठ्यातील जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा जोरदार करंट लागून जागीच मृत्यू झाला. शहाजी लक्ष्मण आवारे (वय ४४ वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी) असे दुर्दैवी अंत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे आवारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळी बैलांना घातली अंघोळ; गोठ्यात सुरू होती तयारी.

मिळालेल्या माहितीनुसार, पोळा सण असल्याने परंपरेनुसार बुधवारी बैलांची खांदा मळणी करण्यात आली होती. गुरुवारी (दि. १० सप्टेंबर २०२६) पोळ्याच्या दिवशी सकाळी शहाजी आवारे यांनी घरासमोरील अंगणात आपल्या सर्जा-राजाला प्रेमाने अंघोळ घातली. त्यानंतर पूजेची तयारी सुरू असताना, आपल्या मुक्त गाय गोठ्यातील बैल आणि इतर दुभत्या जनावरांना चारा टाकण्यासाठी ते घराजवळील कडबा कुट्टी मशीनकडे गेले.

कडबा कुट्टी करताना बसला विजेचा धक्का.
सकाळी साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास शहाजी आवारे मशीन सुरू करून चारा (कडबा) कुट्टी करत होते. त्याच वेळी विजेच्या वायरमधून अथवा मशीनच्या धातूच्या भागातून अचानक विद्युत प्रवाह (करंट) उतरला. शहाजी यांना विजेचा इतका तीव्र झटका बसला की ते क्षणात जागीच कोसळले. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन वीजपुरवठा खंडित केला, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन; गावात हळहळ. 
मृत शहाजी आवारे हे मनमिळाऊ व कष्टाळू शेतकरी म्हणून गावात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि भावजय असा मोठा परिवार आहे. घराचा कर्ता आधार अचानक हिरावल्याने कुटुंबाचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. घटनेनंतर ग्रामस्थांनी त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी दुपारी चिखली येथे शोकाकुल वातावरणात आणि जड अंतःकरणाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

No comments:

Post a Comment