Sunday, May 24, 2026
गंगाखेड - परळी रस्त्यावर निळा फाट्या जवळ अपघात.ऑटोचालक ठार.
Saturday, May 23, 2026
विवाह सोहळ्यात करण्यात आलेल्या फटाकेबाजीमुळे मोठी दुर्घटना.फोटोग्राफर गंभीररीत्या भाजले.लाखो रुपयांचे व्यावसायिक साहित्य जळून खाक.
बीड (प्रतिनिधी) शहरातील बार्शी रोड परिसरात कांबळे व टिके परिवाराच्या झालेल्या विवाह सोहळ्यात करण्यात आलेल्या धोकादायक फटाकेबाजीमुळे मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत फोटोग्राफर गंभीररीत्या भाजले गेले असून त्यांचे लाखो रुपयांचे व्यावसायिक साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. या प्रकरणी संबंधित आयोजक, इव्हेंट व्यवस्थापक आणि फटाके उडवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमेश्वर मंदिर परिसरामागील आशीर्वाद मंगल कार्यालयात २८ एप्रिल २०२६ रोजी विवाह सोहळा पार पडत होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र, ही फटाकेबाजी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजनांशिवाय आणि नियमांचे पालन न करता करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत फोटोग्राफर अभिषेक गोरख कदम हे गंभीररीत्या भाजले गेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दुर्घटनेदरम्यान त्यांचे अंदाजे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे कॅमेरे, लेन्स आणि इतर महागडे उपकरणे जळून नष्ट झाली. तसेच काही अन्य फोटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटर किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारदारांच्या मते, लोकवस्तीच्या भागात अग्निसुरक्षेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नव्हती. तसेच आवश्यक परवानग्या, प्रशिक्षित कर्मचारी किंवा सुरक्षेचे निकष पाळले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यास उपस्थित महिला, लहान मुले, नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे, जखमी फोटोग्राफर अभिषेक कदम यांच्या स्वतःच्या विवाहाला अवघे काही दिवस बाकी असताना ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक संकट कोसळले आहे.
दरम्यान, संबंधित मंगल कार्यालयात विनापरवाना मद्यसाठा असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून आयोजक, फायरवर्क व्यावसायिक आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच जखमींना नुकसानभरपाई मिळावी, नुकसानीचा अधिकृत पंचनामा करण्यात यावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी मंगल कार्यालयांमधील धोकादायक फटाकेबाजीवर कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी अभिषेक कदम चे वडील गोरख कदम यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अंगणवाडी पर्यवेक्षिका भेटीसाठी जाणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांना कारने उडवले! बीडच्या ३२ वर्षीय तनुजा घोडके यांचा मृत्यू.
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी): तालुक्यात शुक्रवारी (२२ मे) सकाळी शासकीय कामावर असताना एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. शिरूर अनंतपाळ येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या दोन महिला पर्यवेक्षिका अंगणवाडी केंद्रांना भेटी देण्यासाठी दुचाकीवरून जात असताना, उदगीरहून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. चामरगा पाटीजवळ झालेल्या या भीषण अपघातात मूळच्या बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका महिला पर्यवेक्षिकेचा करुण अंत झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. तनुजा घोडके- शिंदे (वय ३२ वर्षे, रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) असे अपघातात जागीच मृत पावलेल्या कर्तव्यदक्ष पर्यवेक्षिकेचे नाव आहे.
अंगणवाडी भेटीच्या प्रवासातच काळाचा घाला!
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका अनुसया खलंग्रे (रा. कवठाळा, ता. चाकूर) आणि तनुजा घोडके- शिंदे या दोन्ही अधिकारी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शासकीय कामकाजासाठी बाहेर पडल्या होत्या. तालुक्यातील चामरगा येथील अंगणवाडी केंद्राची पाहणी करून त्या दोघी उदगीर-लातूर महामार्गाने डिगोळ येथील दुसऱ्या अंगणवाडीकडे दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी चामरगा पाटीजवळ आल्यानंतर, तिथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका एसटी बसच्या बाजूने त्या पुढे जात होत्या. त्याच वेळी उदगीरच्या दिशेने लातूरकडे अत्यंत भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने (क्र. एमएच ५५, बी ०१३९) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघीही महामार्गावर दूरवर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
बीड जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार; कार जप्त
अपघातानंतर रस्त्यावरील नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ दोघींना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तनुजा घोडके- शिंदे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यांच्या अकाली निधनाने गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी तलवाडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक लहान मुलगा, सासू-सासरे आणि आई-वडील असा मोठा परिवार आहे. दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या पर्यवेक्षिका अनुसया खलंग्रे यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त कार जप्त केली आहे.
Friday, May 22, 2026
परळीत आर्थिक वादातून हॉटेल चालक कारभारी आंधळे यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या; दोघा विरुद्ध गुन्हा दाखल, एक अटकेत.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एका हॉटेल चालकाची गळा चिरून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कारभारी नारायण आंधळे (राहणार- नंदागौळ, तालुका परळी) असे मृत पावलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. या थरारक हत्याकांडामुळे परळीत गुन्हेगारांचा सुळसुळाट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पैशांचा वाद विकोपाला गेला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी आंधळे हे परळी शहरात स्वतःचे हॉटेल चालवत होते. संशयित आरोपी सचिन राठोड आणि सुमित पवार यांच्यासोबत आंधळे यांचा गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. गुरुवारी मध्यरात्रीनंतर या कारणावरून पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी संतापाच्या भरात खिशातून धारदार चाकू काढून कारभारी आंधळे यांच्या मानेवर गंभीर वार केले.
हत्या केल्यानंतर चक्क आरोपीचाच मुलाला फोन!
या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि विचीत्र बाब म्हणजे, कारभारी आंधळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर मुख्य आरोपी सचिन राठोड याने पळ काढण्यापूर्वी थेट आंधळे यांचा मुलगा ओमकेश याला फोन लावला. फोनवर तो म्हणाला, "तुमच्या वडिलांवर वार झाले आहेत, ते तिथे पडलेत." हा फोन येताच मुलांनी आणि नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या वडिलांना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी मयताचा मुलगा ओमकेश कारभारी आंधळे याने दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमित पवार (दोघे राहणार- वसंतनगर तांडा, परळी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. शुक्रवार (२२ मे) रोजी दुपारी मयताचे मूळ गाव नंदागौळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहे.
Thursday, May 21, 2026
परळीत “सोमवारी मांस विक्री बंदी” ठरावाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा नागरिकांकडून मागणी.
Tuesday, May 19, 2026
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यक्तिमत्व - पत्रकार मा. संतोषभाऊ जुजगर
स्वस्त सोन्याच्या आमिषाने ३ लाखांना लुटले; पसार होताना चोरटे कारवर धडकले
केज (प्रतिनिधी): स्वस्तात दुबई येथील सोन्याचे बिस्कीट खरेदी करण्याचा मोह एका सराफाला चांगलाच महाग पडला आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथील सराफ दत्ता काकडे यांना केज येथे बोलावून घेण्यात आले आणि त्यांच्याकडील ३ लाख रुपये लुटण्यात आले. मात्र, पैसे लुटून पळून जात असताना चोरांची दुचाकी एका कारला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी या दोन्ही जखमी आरोपींना जेरबंद केले असून त्यांचे इतर ३ ते ४ साथीदार फरार आहेत.
असा रचला लुटीचा 'ट्रॅप'
धाराशिव जिल्ह्यातील एका भामट्याने सराफ दत्ता काकडे यांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली होती. त्याने "आम्ही दुबईहून टॅक्स चुकवून सोन्याची बिस्किटे आणली आहेत, ती तुम्हाला स्वस्तात देतो," असे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून रविवारी (१७ मे) दुपारी दत्ता काकडे आणि त्यांचा कारागीर सतीश दीक्षित हे त्यांच्या 'किया' कारमधून (MH 23 BN 8387) ३ लाख रुपये घेऊन केजमधील उमरी फाट्याजवळ आले. तिथे आधीच दबा धरून बसलेले आरोपी आप्पा शिवाजी शिंदे आणि विशाल रामकिसन शिंदे यांनी त्यांना गंगा माऊली कारखान्या जवळील एका शाळेच्या भिंतीच्या आडोशाला नेले. तिथे जाताच चोरांनी कारागीर सतीश दीक्षित यांच्या हातातील ३ लाख रुपयांची पिशवी हिसकावून घेतली आणि सराफाच्या पाठीत लोखंडी रॉडने मारहाण करून दुचाकीवरून पळ काढला.
पळताना अपघात, पोलिसांकडून धरपकड
चोरटे पैशांची पिशवी घेऊन भरधाव वेगाने केजकडे पळून जात होते. गोळा झालेल्या जमावाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, नियंत्रण सुटून चोरांची दुचाकी समोरून येणाऱ्या एका कारवर (MH 05 AJ 8312) जोरात आदळली. या भीषण अपघातात आप्पा शिवाजी शिंदे आणि विशाल रामकिसन शिंदे (दोघे रा. मांडवा, ता. कळंब, जि. धाराशिव) हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सपोनि संदीप मांजरमे आणि पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार चाकू आणि केबल वायरचा बंच मिळून आला. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सराफ दत्ता काकडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हवेत! पुरुषोत्तमपुरीत ना सावली, ना पाणी; फक्त ओळखीच्यांनाच थेट दर्शन!'; उन्हात भाविकांचे हाल सीसीटीव्ही बंदच.
माजलगाव (प्रतिनिधी) : अधिक मास सुरू झाल्याने माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. लवकर दर्शनासाठी भाविकांना २०० रुपये शुल्काचे पास देण्यात आले. परंतु ओळखीच्या भाविकांना थेट दर्शनासाठी सोडले जाऊ लागल्यामुळे रांगेतील भाविकांना ५ तास रांगेत ताटकळत उभी राहण्याची वेळ आली. त्यातच ना सावली ना प्यायला पाणी यामुळे भाविकांचे हाल झाले.
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत अधिक मासाला सुरुवात हाेताच पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. उन्हातील सामान्य भाविकांना लवकर दर्शन व्हावे म्हणून देवस्थान समितीकडून २०० रुपये शुल्काचे पास देण्यात आले. परंतु काही वेळातच पासधारकात दर्शनावरून गोंधळ झाल्याने पास बंद करण्यात आले. सुरुवातीला आलेल्या भाविकांना पार्किंगसाठी दोन-तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. दूर होऊन भरउन्हात चालत यावे लागत असल्याने वृद्ध, महिला, बालके यांचे हाल झाले. या ठिकाणी पार्किंगसाठी शंभर रुपये घेतले जात असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
पुरुषोत्तमपुरीत विनापासधारकांची घुसखोरी, भाविकाकडून जीर्णोध्दासाठी घेतले जाऊ लागले पैसे तीन वर्षांपूर्वी पुरुषोत्तम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळून दिला. त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. भगवान पुरुषोत्तमची मूर्ती एका शेडमध्ये ठेवण्यात आली आहे. मंदिर समितीकडून भाविकांकडून पुरुषोत्तम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी घेतला जाऊ लागला आहे.
आम्ही आमच्या गावातील पंधरा-वीस महिलांना घेऊन दर्शनासाठी आलो होतो. परंतु या ठिकाणच्या नियोजनामुळे दर्शनासाठी सहा तास लागले यामुळे वृद्धांची खूपच परवड झाली, असे तुळजापूर येथील भाविक विनोद घोडके यांनी सांगितले
सावलीची सोय नाही, प्यायला पाणी नाही.
गोदावरी नदीकाठी आंघोळीला गेलेल्या महिलांनादेखील भरउन्हात थांबावे लागले. या ठिकाणी कुठलीच पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचा आरोपदेखील भाविकांनी केला असून येथे डबल पैसे देऊन पाण्याची बॉटल विकत घेण्याची वेळ आली असल्याचे भाविकांनी सांगितले.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मागील महिन्यात बैठक घेऊन मंदिरासह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे सांगितले होते. परंतु हे कॅमेरे बंद असून मंदिरातील सीसीटीव्हीदेखील बंद होते. मंदिर समितीकडून नियोजन केले नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने याचा फायदा घेत चोरांनी महिलांचे दागिने लांबवले.
देशसेवेसाठी निघण्यापूर्वीच काळाचा घाला! बीडमध्ये अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
कडा (प्रतिनिधी): मध्य प्रदेशातील भोपाळ येथे कार्यरत असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान विष्णू पोपट शेळके रविवारी दुपारी सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार होते. त्यासाठी त्यांची घरात आवराआवर सुरू होती. मात्र, देशसेवेसाठी निघण्यापूर्वी थोडा वेळ मित्रांना भेटून परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. भरधाव छोटा हत्ती टेम्पोने दिलेल्या जोराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
असा घडला भीषण अपघात
रविवार, १७ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा येथील संतोषी माता चौकाजवळ हा अपघात घडला. विष्णू शेळके हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 23 AP 4795) महामार्गावरील डिव्हायडरवरून वळण घेत असताना, जामखेडवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव छोटा हत्ती टेम्पोने (क्रमांक MH 12 SX 8433) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज, १८ मे रोजी सोमवारी सकाळी धानोरा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि सीआरपीएफच्या पुणे येथील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आपल्या शूर सहकाऱ्याला अखेरची सलामी दिली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे
Sunday, May 17, 2026
न्यायालयाच्या निर्देशानुसार. काटकसर' धोरणाचे पडसाद; बीडमध्ये क्षीरसागर धोंडे पंडितांसह ५ नेत्यांची पोलीस सुरक्षा काढली.
बीड (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी खर्चात काटकसर करण्यासाठी स्वतःच्या ताफ्यातील सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर, त्याचे थेट पडसाद आता जिल्हा पातळीवर उमटू लागले आहेत. राजकीय पद गेल्यानंतरही वर्षानुवर्षे पोलिस अंगरक्षक सोबत ठेवणाऱ्या जिल्ह्यातील पाच बड्या नेत्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांची सुरक्षा व्यवस्था तातडीने काढून घेण्याचे आदेश शुक्रवारी (दि. १५) जारी करण्यात आले आहेत.
जिल्हा संरक्षण समितीच्या अहवालानुसार, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण आणि अन्न राज्य आयोगाचे अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या जीवितास सध्या कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या नेत्यांकडून सुरक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते, तरीही प्रतिष्ठेपोटी ही सुरक्षा कायम होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार गठित समितीने आता ही सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनीही याला दुजोरा दिला आहे.
प्रतिष्ठा नको, आता कर्तव्य हवे!
अनेक नेत्यांसाठी अंगरक्षक बाळगणे ही केवळ प्रतिष्ठेची बाब बनली होती. मात्र, आता या निर्णयामुळे पोलिस दलातील महत्त्वाचे मनुष्यबळ इतर कामांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या जिल्ह्यात केवळ विद्यमान मंत्री, खासदार, आमदार आणि काही संवेदनशील प्रकरणातील व्यक्तींनाच संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. 'गरज असेल तरच सुरक्षा' हा संदेश यातून प्रशासनाने स्पष्ट केला आहे.
नियमानुसार पोलिस मुख्यालयातील प्रशिक्षित कर्मचारीच अंगरक्षक म्हणून देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक नेत्यांनी आपल्या पसंतीच्या ठराविक कर्मचाऱ्यांसाठीच हट्ट धरल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचारी नेत्यांच्या दिमतीला फिरत आहेत. "आमचा दुसऱ्यावर विश्वास नाही" असे पत्र नेत्यांनी दिल्याने पोलिसांचाही नाइलाज होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुरक्षा कमी अन् 'इतर' कामांत व्यस्त
हे अंगरक्षक नेत्यांच्या सुरक्षेपेक्षा त्यांची कागदपत्रे सांभाळणे, शाल, हार-तुरे आणि वैयक्तिक कामातच अधिक व्यस्त असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सुरक्षेची जबाबदारी सोडून अशी 'वैयक्तीक' कामे केल्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत असून, या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षणाची गरज व्यक्त होत आहे.
दु:खद घटना! हिंगणी तलावात मासेमारीची होडी पलटून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू.
दिंद्रुड (प्रतिनिधी) धारूर तालुक्यातील हिंगणी येथे शनिवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या परिवारातील पाच मुली तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या, मात्र मासेमारीच्या होडीवर बसने त्यांच्या जिवावर बेतले. मासे पकडण्याची होडी पलटल्याने दोन मुलींचा पाण्यात बुडून करून अंत झाला. पलक शामराव पारवे (वय १४, रा. हटिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) अशी मृत मुलींची नावे आहेत.
असा घडला अपघात:
शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हिंगणी येथील पारवे कुटुंबातील पलक पारवे, दिव्या कांबळे, मोहिनी पारवे, तन्वी पारवे आणि जानवी पारवे या पाच मुली तलावावर गेल्या होत्या. तिथे मासे पकडण्यासाठी असलेल्या होडीवर पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघी जणी बसल्या. मात्र, होडी तलावाच्या मधोमध गेल्यानंतर अचानक अनियंत्रित होऊन पलटली.
बचावण्यासाठी धरले अन्...
होडी पलटल्याने तिघीही पाण्यात बुडू लागल्या. मोहिनीला पोहता येत होते, मात्र पाण्यात बुडत असलेल्या पलक आणि दिव्या यांनी घाबरून मोहिनीला घट्ट पकडल्याने तीही बुडू लागली. तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या इतर मुलींनी हा प्रकार पाहून आरडाओरडा सुरू केला.
मुलींचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली आणि तिघींनाही बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. यातील मोहिनीला तातडीने शुद्ध आली, मात्र पलक आणि दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वराती (स्वामी रामानंद तीर्थ) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे हिंगणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Saturday, May 16, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरात क्लासेस चालकाची सीबीआयकडून चौकशी.
लातूर (प्रतिनिधी) नीट पेपरफुटी प्रकरणात येथील एका महाविद्यालयाचा सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी (ता. १५) येथील एका क्लासेस चालकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी सकाळपासून या क्लासेस चालकाची त्यांच्याच फ्लॅटमध्ये सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे.
दरम्यान येथील आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात एका पालकाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. यात मोटेगावकर यांच्या सोशल मीडियावरील एका व्हीडीओचा संदर्भ देत गेसपेपरमधील ४० प्रश्न नीटच्या परीक्षेत कसे आले याची चौकशी करावी अशी मागणी या पालकाने केली होती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. यात त्यांनी मोटेगावकर यांच्यासह चौघांचा जवाबही घेतला होता. त्याचाही तपास सुरु आहे.
दरम्यान शुक्रवारी (ता. १५) सीबीआयचे पथक येथे आले. येथील सूतमिल परिसरात असलेल्या ओंकार अपार्टमेंटमधील प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या फ्लॅवटर हे पथक गेले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना देखील त्यांनी सोबत नेले. सकाळपासून मोटेगावकर यांची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीमुळे शहरातील इतर क्लासेस चालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. चौकशी करुन सीबीआयचे पथक पुढे काय करणार याकडे आता लक्ष लागले आहे.
अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या बॅगेतील कप्पा कापून साडेचार लाखांचे दागिने लंपास.अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) सध्या उन्हाळी सुट्यांमुळे अंबाजोगाई बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे बसस्थानकावरील याच प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतील ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी वैजनाथ येथील रहिवासी मनिषा विनोद जगतकर (वय ५०) या बुधवारी सकाळी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुरुड (जि. लातूर) येथे जाण्यास निघाल्या होत्या. त्या परळीहून अंबाजोगाई बस स्थानकावर आल्या होत्या. येथून पुढे जाण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई येथून मुरुड जाणाऱ्या बसमध्ये बसल्या.
या घटनेनंतर मनिषा जगतकर यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दागिने चोरीची तक्रार नोंदवली. दरम्यान पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे जागा पकडण्यासाठी त्यांचे दीर आप्पाराव कांबळे यांनी दागिन्यांची बॅग कंडक्टरच्या सीटजवळ ठेवली होती. याच वेळी बसमध्ये उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने 'तुम्हाला बसता येत नाही, मी ही बॅग उचलून वर ठेवतो' असे म्हणत मदतीचा बहाणा केला. बॅग वर ठेवल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला दुसरी गाडी लागली आहे असे सांगून आपल्या दोन साथीदारांसह बसमधून खाली उतरून गेला.
मनिषा जगतकर जेव्हा मुरुड येथील आपल्या माहेरी पोहोचल्या, तेव्हा त्यांना बॅगेचा आतील कप्पा कशाने तरी कापलेला आढळला. त्यातून सोन्याचे गंठण, लॉकेट, अंगठ्या, बोरमाळ, बांगड्या, कर्णफुले आणि १० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
रुग्णसेवेतून समाजसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व — डॉ. विवेक दंडे
साळेगावमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटे झाले CCTV कॅमेऱ्यात कैद.
केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील साळेगाव येथे मोटार सायकल चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्यांच्यासोबत एक कार देखील होती. मात्र दुकानाच्याबाहेर झालेल्या दुकान मालकाला चोरांची चाहूल लागल्याने मोटार सायकल चोरीचा बेत फसला आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथे ४ मे रोजी रात्री जयमल्हार कृषी केंद्राचे खंडू घाटुळे हे त्यांच्या कृषी केंद्राचे समोर त्यांची मोटार सायकल लॉक करून झोपले होते. ५ मे रोजी मध्यरात्री ३:४४ वा. च्या सुमारास साळेगाव येथील बाजार तळाच्या रस्त्याने केज-कळंब जाणाऱ्या महामार्गाकडे एक कार येत होती. त्या कारच्या पुढे एक संशयित चोर तरुण पायी चालत येत होता. कार चालक त्या तरुणाच्या मागे मागे मंद गतीने कार चालवित होता.
संशयित चोरट्याने जय मल्हार कृषी सेवा केंद्राजवळ आल्यानंतर त्यांच्याकडील बनावट चावीने खंडू घाटुळे यांच्या मोटार सायकलचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आवाज येताच कृषी केंद्राच्या बाहेर मोटार सायकल जवळ झोपलेले खंडू घाटुळे हा युवक जागा झाला. त्यामुळे चोर सुद्धा सतर्क झाले. चोरट्यांना खंडू घाटुळे यांनी काय करतोस असा जाब विचारताच माळेगाव कडे जाणारा रस्ता कोणता आहे? असे म्हणून सारवासारव करीत कारमधून निघून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घाटुळे यांनी ही माहिती पोलिसांना देखील दिली असल्याचे समजते.
ऐ बाबू टाईम क्या हुआ स्टाईलने चोरीचा प्रयत्न
अज्ञात चोरटा जेव्हा बनावट चावीने मोटार सायकल चोरण्याचा प्रयत्न करीत होता तेव्हा आवाजाने जागी झालेल्या खंडू घाटुळे यांनी ए काय करतोस ? असे विचारताच चोरटा त्यांना म्हणाला "मालेगाव को कौनासा रस्ता जाता है ?" असे म्हणून चोरटे निघून गेले.
मराठा भुवनसाठी २८ गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मा.मंत्री धनंजय मुंडे यांचे मराठा समाजाकडून आभार.ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांचे विशेष आभार.
Tuesday, May 12, 2026
पेपरफुटी मुळे मेडिकल नीट ची परीक्षा रद्द! लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
नवी दिल्ली -
पेपरफुटी मुळे मेडिकल नीट ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. देशभरातून तब्बल 22 लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून परीक्षेतील गोंधळावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून यातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासादरम्यान ‘एनटीए’ सीबीआयला सर्व प्रकारचे सहकार्य, आवश्यक कागदपत्रे आणि रेकॉर्ड उपलब्ध करून देणार आहे. या चौकशीतून पेपरफुटीचे धागेदोरे कोठपर्यंत पोहोचले आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज केले होते, त्यांना नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले परीक्षा शुल्क त्यांना परत केले जाईल. फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ‘एनटीए’ आपल्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून ही परीक्षा पुन्हा आयोजित करणार आहे
लवकरच नवीन वेळापत्रक
फेरपरीक्षा नेमकी कधी होणार, याबाबतची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ‘एनटीए’ लवकरच अधिकृत संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी ‘एनटीए’च्या संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Monday, May 11, 2026
तेलगाव कारखाना परिसरात वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड; 2 आरोपी अटकेत.
धारूर (प्रतिनिधी) तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तेलगाव साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर दिंद्रुड पोलीस आणि बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना तेलगाव कारखाना परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली.या प्रकरणी मिना सुर्यवंशी आणि अनंत कोथिंबीरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणे तसेच भाग पाडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संयुक्त कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि पवनसिंग जंघाले यांच्या पथकाने केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना धारूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली
मंजूर शैक्षणिक कर्ज देण्यास टाळले महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ग्राहक आयोगाचा दणका
वडवणी (प्रतिनिधी) शैक्षणिक कर्ज मंजूर करूनही विद्यार्थ्याला वेळेत कर्ज वितरण न करता मानसिक व शैक्षणिक अडचणीत टाकल्याप्रकरणी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दणका दिला आहे. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील बी.टेक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मंजूर झालेले २ लाख ७८ हजार ३८० रुपयांचे शैक्षणिक कर्ज ३० दिवसांत वितरित करण्याचे तसेच मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपरखेड येथील सशांत संजय निपटे हा पुणे येथे बी.टेकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून शिक्षणासाठी त्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वडवणी शाखेकडे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये बँकेकडून आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन त्याने कॉलेज फी कोटेशन, ७/१२ उतारा, आधार कार्ड आदी सर्व कागदपत्रे जमा केली होती. त्यानंतर बँकेने कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू केली. जानेवारी २०२५ मध्ये बँकेने कर्ज मंजूर झाल्याचे सांगत प्रक्रिया शुल्क व कागदपत्र हाताळणी शुल्क म्हणून ६५६ रुपये ९८ पैसे खात्यातून वसूल केले. विद्यार्थ्याने चार लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली असताना बँकेने २ लाख ७८ हजार ३८० रुपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर केले. मात्र मंजुरीनंतरही रक्कम वितरित करण्यात आली नाही. विद्यार्थ्याने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर बँकेने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी लेखी पत्र देत जामीनदार रामप्रताप शिवाजी निपटे यांच्या नावावर थकबाकी असल्याने कर्ज वितरित करता येणार नसल्याचे सांगितले. यावर विद्यार्थ्याने ग्राहक आयोगात धाव घेतली.
सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या वतीने रिझर्व्ह बँकेच्या ‘मॉडेल एज्युकेशन लोन स्कीम’चा दाखला देण्यात आला. त्यानुसार चार लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी कोणतीही तारण मालमत्ता किंवा अतिरिक्त जामीनदार घेण्याची आवश्यकता नसल्याचे आयोगासमोर मांडण्यात आले. आयोगानेही ही बाब ग्राह्य धरत बँकेने जामीनदाराची अट घालणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्याने एसईबीसी प्रवर्गाची माहिती लपविल्याचा बँकेचा दावा आयोगाने फेटाळून लावला. कर्ज मंजुरी आदेशातच विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गातील असल्याचा उल्लेख असल्याने बँकेचा आक्षेप पुराव्याअभावी ग्राह्य धरता येत नसल्याचे आयोगाने नमूद केले. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष हरीश अडके, सदस्या सतिका शिरदे आणि संगिनी राहुल पोळ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तक्रारदाराच्यावतीने ॲड.एस. आर. कुंभार, ॲड. नारायण सिरसट, ॲड.विकास मिसाळ, ॲड.बालाजी घुमरे, ॲड.दीपक कुलकर्णी, ॲड.उदय दराडे, अक्षय सिरसट यांनी काम पाहिले. दरम्यान, आयोगाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेस ३० दिवसांत मंजूर कर्जाची रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले असून अन्यथा त्या रकमेवर ९ टक्के व्याज आकारण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये ४५ दिवसांत देण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत.
विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम
आयोगाने आदेशात म्हटले आहे की, बँकेने कर्ज प्रक्रिया शुल्क स्वीकारून कर्ज मंजुरी आदेश दिल्यानंतरही कर्ज वितरित न करणे ही सेवेतील कसूर ठरते. या विलंबामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम झाला असून मानसिक त्रासही सहन करावा लागला.
Sunday, May 10, 2026
केजमध्ये अनोखी प्रेम कहाणी !चार मुलां ची आई अन् दोन मुलांचा बाप झाले पसार.
केज (प्रतिनिधी): प्रेम आंधळे असते, याचाच प्रत्यय देणारी एक घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील एका २६ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या तीन मुलांना घरी सोडून आणि एका लहान मुलाला सोबत घेऊन प्रियकरासोबत पलायन केले आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणासोबत ती पळाली आहे, तो देखील विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.
संसाराचा विसर अन् मुलांची फरफट
मिळालेल्या माहितीनुसार, ही २६ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबासह एका गावात राहते. तिच्या घराशेजारीच भावकीतील एक २७ वर्षीय तरुण राहत होता. या दोघांमध्ये सूत जुळले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या आपापल्या मुलाबाळांचा आणि समाजाचा कोणताही विचार न करता या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. विवाहितेने जाताना आपल्या चार मुलांपैकी तीन मुलांना घरीच सोडले, तर एका लहान मुलाला सोबत नेले आहे.
या घटनेनंतर दोन्ही कुटुंबात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांच्याही नातेवाईकांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याच्या स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. एकाच वेळी दोन घरातील सदस्य अशा प्रकारे पळून गेल्याने परिसरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.
Friday, May 8, 2026
भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडी बीड न्यायालयाचा आदेश.
केजच्या टोल नाक्यावर वसुली जोरात पण रस्त्याची देखभाल व दुरूस्तीच्या नावाने बोंबाबोंब.
Thursday, May 7, 2026
भूसंपादन मावेजा घोटाळा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक ताब्यात!
दोरखंड टाकून अंबडची वाळू गेवराईत!' तहसीलदारांच्या धडक मोहीमेत१५ बड्या तस्करांविरुद्ध गोंदी पोलिसांत गुन्हा.
अंबड (प्रतिनिधी): अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून 'केणी' आणि दोरखंडांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील १५ मुख्य वाळू माफियांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेऊन बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लांबवर दोरखंड टाकून अंबडच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात असल्याचे प्रशासकीय तपासात निष्पन्न झाले आहे.
अशी चालायची चोरी
गेवराई तालुक्यातील तस्कर नदीत पाणी असल्याने महसूल पथक पोहोचू शकणार नाही, असा विचार करून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी करत होते. १८ ते २२ एप्रिल दरम्यान प्रशासनाने अनेकदा धाडी टाकून केण्यांचे दोरखंड कापून जाळून नष्ट केले होते. मात्र, तरीही तस्करांनी जेसीबी, पोकलेन आणि हायवा लावून शासकीय मालमत्तेची लूट सुरूच ठेवल्याने अखेर कडक पाऊले उचलण्यात आली आहेत.
मुख्य आरोपींची नावे
तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी पथकाने गोपनीय माहिती गोळा केली, ज्यातून खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत:
-माळस पिंपळगाव (ता. गेवराई): हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबुराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे आणि प्रवीण राऊत.
-सावळेश्वर (ता. गेवराई): बंटी उदे आणि मुकेश कुटे.
-भांबेरी (ता. अंबड): शाहरुख अनवर शेख.
-याशिवाय राक्षसभुवन व सुरळेगाव येथील त्यांचे इतर साथीदारही या गुन्ह्यात सामील आहेत.
कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल
"पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही. गुन्हे दाखल केल्यानंतरही तस्करांच्या वर्तनात बदल झाला नाही, तर यापेक्षाही अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची पथके २४ तास पाळत ठेवून आहेत."
— विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड.
आष्टीत ७दिवसांत धुमस्टाईल सोनेचोरीच्या ५घटना.सीसीटीव्ही बंद असल्याचा चोरट्यां नी घेतला फायदा.
आष्टी (प्रतिनिधी): आष्टी शहरात गेल्या आठवड्याभरापासून जबरी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. बुधवारी रात्री आष्टी दूध संघासमोर दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी अडवून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून नेले. विशेष म्हणजे, सात दिवसांपूर्वी एकाच दिवशी तीन ठिकाणी अशाच प्रकारे चोरी झाली होती. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील 'लाडक्या बहिणी' घराबाहेर पडताना भयभीत झाल्या आहेत.
रस्ते कामामुळे तपासात अडथळा
साबलखेड-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अनेक भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. चोरट्यांना याची पूर्ण खात्री असल्याने ते बिनधास्तपणे महिलांना लुटत आहेत. कॅमेरे बंद असल्याने पोलिसांनाही चोरट्यांचा माग काढणे कठीण जात आहे.
गुन्हे दाखल, पण तपासाचे काय?
पोलिस दरवेळी गुन्हा दाखल करून घेतात, मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही. "तपास सुरू आहे" हे पालुपद ऐकून नागरिक आता वैतागले आहेत. चोरटे पोलिसांना उघडपणे आव्हान देत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
"सोनसाखळी चोरांचा शोध घेण्यासाठी एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तांत्रिक तपासाच्या साहाय्याने लवकरच या चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील."
-शरद भुतेकर, पोलीस निरीक्षक, आष्टी.
मामा-मामी शेतात गेल्याची संधी साधून चिमुकलीवर अत्याचार. युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
केज (प्रतिनिधी): तालुक्यातील एका ग्रामीण भागात नात्यातील विश्वासाला तडा देणारी घटना घडली आहे. सोमवारी (४ मे) धाराशिव जिल्ह्यातील इटकूर (ता. कळंब) येथील २९ वर्षीय युवक आपल्या मामा-मामीला भेटण्यासाठी त्यांच्या गावी आला होता. रात्रीच्या वेळी मामा आणि मामी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता, घरी १० वर्षे १० महिने १८ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीला या भाच्यासोबत ठेवण्यात आले होते.
पाच महिन्यांपासून सुरू होते शोषण.
घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे, हा आरोपी केवळ एकदाच नाही तर गेल्या पाच महिन्यांपासून अशा प्रकारच्या गैरकृत्यात गुंतलेला होता. फिर्यादीनुसार, १३ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आणि त्याआधीही २ ते ३ महिन्यांपासून त्याने वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले होते.
आरोपीला इटकूरमधून.
अटक
आई-वडील शेतातून परतल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मामीने दिलेल्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्यानंतर आरोपी आपल्या गावी पळून गेला होता, मात्र पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून त्याला इटकूर येथून बेड्या ठोकल्या.