Monday, May 11, 2026

तेलगाव कारखाना परिसरात वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड; 2 आरोपी अटकेत.


धारूर (प्रतिनिधी)  तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तेलगाव साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर दिंद्रुड पोलीस आणि बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांना तेलगाव कारखाना परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी मिना सुर्यवंशी आणि अनंत कोथिंबीरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणे तसेच भाग पाडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संयुक्त कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि पवनसिंग जंघाले यांच्या पथकाने केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना धारूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली

No comments:

Post a Comment