Sunday, May 10, 2026

केजमध्ये अनोखी प्रेम कहाणी !चार मुलां ची आई अन् दोन मुलांचा बाप झाले पसार.


केज (प्रतिनिधी): प्रेम आंधळे असते, याचाच प्रत्यय देणारी एक घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील एका २६ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या तीन मुलांना घरी सोडून आणि एका लहान मुलाला सोबत घेऊन प्रियकरासोबत पलायन केले आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणासोबत ती पळाली आहे, तो देखील विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.

संसाराचा विसर अन् मुलांची फरफट
मिळालेल्या माहितीनुसार, ही २६ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबासह एका गावात राहते. तिच्या घराशेजारीच भावकीतील एक २७ वर्षीय तरुण राहत होता. या दोघांमध्ये सूत जुळले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या आपापल्या मुलाबाळांचा आणि समाजाचा कोणताही विचार न करता या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. विवाहितेने जाताना आपल्या चार मुलांपैकी तीन मुलांना घरीच सोडले, तर एका लहान मुलाला सोबत नेले आहे.

पोलीसांत परस्परविरोधी तक्रारी

या घटनेनंतर दोन्ही कुटुंबात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांच्याही नातेवाईकांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याच्या स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. एकाच वेळी दोन घरातील सदस्य अशा प्रकारे पळून गेल्याने परिसरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.

No comments:

Post a Comment