Saturday, May 23, 2026

अंगणवाडी पर्यवेक्षिका भेटीसाठी जाणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांना कारने उडवले! बीडच्या ३२ वर्षीय तनुजा घोडके यांचा मृत्यू.


शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी): तालुक्यात शुक्रवारी (२२ मे) सकाळी शासकीय कामावर असताना एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. शिरूर अनंतपाळ येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या दोन महिला पर्यवेक्षिका अंगणवाडी केंद्रांना भेटी देण्यासाठी दुचाकीवरून जात असताना, उदगीरहून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. चामरगा पाटीजवळ झालेल्या या भीषण अपघातात मूळच्या बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका महिला पर्यवेक्षिकेचा करुण अंत झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. तनुजा घोडके- शिंदे (वय ३२ वर्षे, रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) असे अपघातात जागीच मृत पावलेल्या कर्तव्यदक्ष पर्यवेक्षिकेचे नाव आहे.

अंगणवाडी भेटीच्या प्रवासातच काळाचा घाला!
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका अनुसया खलंग्रे (रा. कवठाळा, ता. चाकूर) आणि तनुजा घोडके- शिंदे या दोन्ही अधिकारी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शासकीय कामकाजासाठी बाहेर पडल्या होत्या. तालुक्यातील चामरगा येथील अंगणवाडी केंद्राची पाहणी करून त्या दोघी उदगीर-लातूर महामार्गाने डिगोळ येथील दुसऱ्या अंगणवाडीकडे दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी चामरगा पाटीजवळ आल्यानंतर, तिथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका एसटी बसच्या बाजूने त्या पुढे जात होत्या. त्याच वेळी उदगीरच्या दिशेने लातूरकडे अत्यंत भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने (क्र. एमएच ५५, बी ०१३९) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघीही महामार्गावर दूरवर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

बीड जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार; कार जप्त
अपघातानंतर रस्त्यावरील नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ दोघींना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तनुजा घोडके- शिंदे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यांच्या अकाली निधनाने गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी तलवाडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक लहान मुलगा, सासू-सासरे आणि आई-वडील असा मोठा परिवार आहे. दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या पर्यवेक्षिका अनुसया खलंग्रे यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त कार जप्त केली आहे.

No comments:

Post a Comment