Saturday, October 10, 2026

पलसिद्ध महास्वामी पीठाच्या सेवाधारी शिवैक्य सौ. शोभा (हेमाताई) विभुते यांना परळीत वीरशैव लिंगायत समाजाची भावपूर्ण श्रद्धांजली.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी पीठाचे मठाधिपती तथा सद्गुरू ष.ब्र. १०८ श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या भगिनी, पीठाच्या सेवाधारी आणि सर्वांच्या लाडक्या माय माऊली शिवैक्य सौ. शोभा (हेमाताई) शिवलिंग विभुते (पारडकर) यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यांच्या शिवैक्यामुळे वीरशैव लिंगायत समाजासह भक्त परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल परळी वैजनाथ येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या धर्मसंवर्धन, धार्मिक कार्य आणि समाजसेवेच्या प्रदीर्घ प्रवासामागे शोभाताईंचा त्याग, पाठिंबा आणि योगदान अत्यंत मोलाचे होते. सद्गुरूंच्या कार्याला बळ देताना त्यांनी केलेला त्याग आणि दिलेली साथ अनमोल होती. त्या केवळ सद्गुरूंच्या भगिनी नव्हत्या, तर त्यांच्यासाठी आईच्या मायेने आधार देणाऱ्या, प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या माय माऊली होत्या.
सद्गुरूंच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीत शोभाताईंनी दिलेल्या योगदानाचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, त्यागी वृत्तीने आणि सेवाभावाने त्यांनी सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही केवळ एका कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजासाठी दुःखद घटना आहे.
परळी वैजनाथ येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या त्यागाची, मायेची आणि सेवाभावी जीवनाची स्मृती सदैव समाजाच्या मनात जिवंत राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
माय माऊली शोभाताईंचे शिवैक्य म्हणजे प्रेम, त्याग आणि मायेचा एक अध्याय संपला; मात्र सद्गुरूंच्या धर्मसंवर्धन व समाजसेवेच्या कार्यामागील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
शिवैक्य सौ. शोभाताई विभुते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.

Tuesday, October 6, 2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी परळीचे सुपुत्र आयएएस किरण गित्ते यांची विशेष चर्चा; राष्ट्रीय महामार्ग परिषदेत भूमिकेचे कौतुक.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी): गुजरात येथील एकता नगर (केवडिया) स्थित टेंट सिटी २ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून आयोजित दोन दिवशीय 'चिंतन शिबीर २०२६' या राष्ट्रीय महामार्ग परिषदेत परळीचे भूमिपुत्र तथा त्रिपुरा सरकारमधील सचिव व वरिष्ठ आयएएस अधिकारी श्री. किरण गित्ते साहेब यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. परिषदेदरम्यान त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ईशान्य भारतातील रस्ते विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर महत्त्वपूर्ण व सकारात्मक चर्चा केली. "गतिशक्ती से प्रगति" या ब्रिदवाक्याखाली आयोजित या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील विविध राज्यांचे मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. त्रिपुरा शासनात सचिव पदावर कार्यरत असणारे आणि प्रशासकीय व विकासकामांचा मोठा अनुभव असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी किरण गित्ते साहेब यांनी या शिबीरात पीएम गतिशक्ती अंतर्गत एकात्मिक नियोजन, भूमी अधिग्रहण प्रक्रिया सुलभ करणे आणि अपघातमुक्त सुरक्षित महामार्गांची निर्मिती या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही श्री. गित्ते यांच्याकडून प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव जाणून घेत या चर्चेचे स्वागत केले. राष्ट्रीय पातळीवरील या उच्चस्तरीय परिषदेत परळीच्या सुपुत्राने नोंदवलेल्या या प्रभावी सहभागाबद्दल आणि देशपातळीवर बजावलेल्या भूमिकेबद्दल परळी शहर व परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संत एकनाथांच्या भागवतातून अध्यात्म आणि संसाराचा सुंदर समन्वय -ह.भ.प. प्रवीण महाराज गोसावी.

*मुक्ताई लॉन्स येथे एकनाथी भागवत कथा प्रवचन  सोहळ्याचा भाविकांना लाभ. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचे एकनाथी भागवत हे केवळ पद्याचे गद्यात रूपांतर नसून, नाथांच्या जीवनदृष्टीशी एकरूप झालेल्या अधिकारी संताचे चिंतन आणि निरूपण आहे. संत एकनाथ महाराजांनी आपल्या वाणीच्या माध्यमातून संतवाङ्मय आणि सामान्य भाविक यांच्यातील काळाचे व भाषेचे अंतर कमी करून भक्तीचा मार्ग अधिक सुगम केला. त्यांच्या जीवनातून संसारात राहूनही परमार्थ साधता येतो आणि परमात्मवृत्तीने संसाराचे कर्तव्य पार पाडता येते, याचा आदर्श समाजासमोर ठेवला, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रवीण महाराज गोसावी यांनी केले.
भास्करमामा चाटे व परिवाराच्या वतीने परळी-बीड रोडवरील मुक्ताई लॉन्स येथे मातृ-पितृ स्मरणार्थ आयोजित एकनाथी भागवत कथा प्रवचन  सोहळ्यात ते बोलत होते. संत एकनाथ महाराजांचे ते १३ वे वंशज आहेत.या धार्मिक सप्ताहाचे आयोजन ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. तुकाराम गाथा पारायण, एकनाथी भागवत कथा, संतवाङ्मय, हरिनाम, प्रवचन आणि कीर्तनांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक चिंतनाची पर्वणी मिळत आहे. यावेळी संत एकनाथ महाराजांनी समाजाला केवळ भक्तीचा उपदेश केला नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील देवत्व ओळखण्याची दृष्टी दिली. त्यांच्या भागवत निरूपणामुळे संतांची वाणी सामान्य माणसाच्या अधिक जवळ आली असून, आजही त्यांच्या विचारांमधून जीवन जगण्याची दिशा मिळते, असेही प्रवीण महाराज गोसावी यांनी नमूद केले.भाविकांनी या अध्यात्मिक कार्यक्रमांस मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतवाङ्मय, हरिनाम श्रवणाचा लाभ घेतला. दरम्यान आजच्या प्रवचन श्रवणास शिवसेना (शिंदे) जेष्ठ नेते प्रा. टि.पी.मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सौ. शोभाताई व श्री. भास्करराव चाटे (मामा), निळकंठ चाटे, दिनकर चाटे,सौ. स्मिता व ऍड गिरीशराव मुरकुटे,सौ. अर्चना व श्री. श्रीकांत चाटे, सौ. वैशाली व श्री. शशिकांत चाटे तसेच डॉ. सौ. गौरी उर्फ स्वप्ना व श्री. रविकांत चाटे व संपूर्ण चाटे परिवार परिश्रम घेत आहे.

परळीच्या वाण धरणावर २४ तास खडा पहारा; अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची विशेष पथके तैनात.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): चालू खरीप हंगामात पर्जन्यमानाने ओढ दिल्याने मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आणि भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने जलस्रोतांच्या संरक्षणासाठी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. तालुक्यातील वाण धरण (नागापूर) येथील पाणीसाठ्यातून होणारा अनधिकृत व अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धरणावर २४ तास खडा पहारा ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय परळी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश ५ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आले असून, मंगळवार (दि. ६) पासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

दोन पाळ्यांमध्ये २४ तास चोख नजर
परळी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विनोद रनवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, ६ ऑक्टोबरपासून धरण परिसरात दोन स्वतंत्र पाळ्यांमध्ये २४ तास तपासणी आणि नियंत्रण ठेवले जाणार आहे:
पहिली पाळी: सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत
दुसरी पाळी: रात्री ८:०० ते सकाळी ८:०० वाजेपर्यंत

या दोन्ही पाळ्यांमध्ये धरणातील पाण्यावर नजर ठेवण्यासाठी बहुविभागीय संयुक्त विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. धरणातील पाणीसाठ्यातून कोणत्याही व्यक्तीने, कारखान्याने अथवा संस्थेने अनधिकृतपणे मोटारी किंवा पाईपलाईन टाकून पाणी उपसू नये, यासाठी ही पथके सातत्याने गस्त घालणार आहेत.

संयुक्त पथकात विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश

धरणाचे संरक्षण आणि पाण्याचा थेंबन्‌थेंब वाचवण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत एकत्र आले आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या विशेष नियंत्रण पथकांमध्ये खालील यंत्रणांचा समावेश आहे: तलाठी व महसूल सेवक (ग्रामस्तरीय महसूल प्रशासन), ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक, परळी नगरपालिका कर्मचारी, महावितरणचे (MSEDCL) तांत्रिक कर्मचारी (अवैध वीजजोडण्या तोडण्यासाठी), लघु पाटबंधारे विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी, परळी पोलीस कर्मचारी व स्थानिक पोलीस पाटील

हलगर्जीपणा आढळल्यास कर्मचाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड
या आदेशाची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर व्हावी, यासाठी तहसीलदार विनोद रनवरे यांनी कडक निर्देश दिले आहेत.

नैसर्गिक आपत्ती कायद्यानुसार कारवाई 

"धरणावर नेमण्यात आलेल्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कर्तव्यात कसूर, गैरहजेरी किंवा हलगर्जीपणा दाखवल्यास त्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये तात्काळ शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल. उपलब्ध जलसाठा हा परळीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि आवश्यक गरजांसाठी अतिशय मोलाचा आहे; त्यामुळे पाण्याचा एक थेंबही बेकायदेशीरपणे उपसू दिला जाणार नाही."
-विनोद रनवरे, तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, परळी वैजनाथ.

अंबाजोगाईत बसस्थानकाजवळ अनैतिक देहव्यापार लॉजवर पोलिसांची धाड.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील जनता लॉजमध्ये पीडित महिलेला बोलावून तिच्याकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळताच सोमवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी नारायण व्यंकटराव गुंडे व सचिन जगन्नाथ दुधाणी, (दोघेही रा. प्रशांतनगर, बसस्थानकाच्या पाठीमागे, अंबाजोगाई) यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात २७ हजार ९०० रुपयांची रोकड, दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शहरातील जनता लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५.५० वाजता छापा मारून एका महिलेकडून व आरोपींकडून रोकड व इतर साहित्य जप्त केले. सचिन दुधाणी याच्या ताब्यातून ५ हजार ५०० रुपये रोकड व १० हजार रुपये किमतीचा जुना मोबाईल, तर पीडित महिलेच्या ताब्यातून १२ हजार ४०० रुपये व १० हजार रुपये किमतीचा जुना मोबाईल जप्त करण्यात आले. असा एकूण २७ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी मीरा महादेव रेडेकर यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जोगदंड करीत आहेत

Saturday, October 3, 2026

परळीत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद! ४८ तासांत २३ जणांना घेतला चावा.नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण.



परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी वैजनाथ शहरात मोकाट व फिरस्त्या श्वानांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात गुरुवारी आणि शुक्रवारी अशा अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत तब्बल २३ जणांना फिरस्त्या श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शुक्रवारी श्वानांनी ८ जणांचे लचके तोडले, ज्यात पेठ मोहल्ला परिसरातील तीन लहान बालकांचा समावेश आहे. तर गुरुवारी पद्मावती गल्लीतील एका शाळकरी विद्यार्थ्यासह विविध भागांतील १४ जणांना लक्ष्य करण्यात आले होते. रस्त्यांवरून ये-जा करताना लहान मुले, महिला आणि वृद्धांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे.

शहरातील गल्लीबोळांत कुत्र्यांचे टोळके वाढत असतानाच परळी नगरपालिकेची श्वान पकडण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून अचानक थंडावली होती. परिणामी श्वानांचा उपद्रव आणखी वाढला. वाढत्या तक्रारींनंतर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नगरपालिका कर्मचारी राज गायकवाड यांनी पेठ मोहल्ला भागातील जखमी व्यक्तीच्या कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर राधाकृष्ण सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली झाशी येथील विशेष कामगारांनी नगरपालिकेचे कर्मचारी राजाभाऊ गायकवाड, दयानंद रोडे आणि सचिन हिके यांच्या सहकार्याने पेठ मोहल्ल्यात दोन आक्रमक श्वानांना पकडले.

नंदागौळ ॲनिमल सेंटरमध्ये ६० श्वान; पिसाळलेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था
पकडण्यात आलेल्या श्वानांना नंदागौळ रोडवरील पालिकेच्या अधिकृत ॲनिमल सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या या केंद्रात सुमारे ६० श्वान असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिसाळलेल्या किंवा संशयित श्वानांना स्वतंत्र कक्षात ठेवले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. शनिवारपासून (३ ऑक्टोबर २०२६) संपूर्ण शहरात श्वान पकडण्याची मोहीम पुन्हा युद्धपातळीवर राबवली जाईल, अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे.

परळी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उपचार कक्ष सुरू करा 
परळी शहरात एकट्या सप्टेंबर महिन्यातच तब्बल १०० पेक्षा अधिक नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. श्वानदंश झाल्यानंतर गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात (SRTR) पाठवले जाते. यात लहान मुले आणि वृद्धांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रासामुळे प्रचंड हाल होतात.

रेबीज हा अत्यंत प्राणघातक आजार असल्याने वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे यांनी रुग्णासाठी परळीतच 'स्वतंत्र श्वानदंश उपचार कक्ष' सुरू करावा आणि सर्व आवश्यक रेबीज प्रतिबंधक लसी व औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे. 


परळीतील व्यापाऱ्याचे दुकान फोडून दुरुस्तीचे ७० मोबाईल लंपास, व्यापारी वर्गात चिंता. पोलीस दलासह एलसीबी घटनास्थळी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि २४ तास वर्दळ असणाऱ्या मध्यवर्ती भागातील सुरक्षेचे धिंडवडे काढणारी एक धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या लगतच असलेले 'न्यू आर्यन मोबाईल शॉपी'चे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुरुस्तीसाठी आलेले ७० मोबाईल आणि रोकड लंपास केली आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर २०२६) पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भरवस्तीत आणि थेट बँकेच्या शेजारीच दुकानाचा पत्रा उचकटून चोरी झाल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात तीव्र घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पत्रा उचकटून आत प्रवेश; एकाच चोरट्याने साधला डाव

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारच्या पहाटे २:१५ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छताचा लोखंडी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर चोरट्याने दुरुस्तीच्या रॅकवर ठेवलेले ग्राहकांचे मोबाईल आणि रोख रक्कम गोळा करून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, फुटेजमध्ये एकच संशयित चोरटा चोरी करताना स्पष्ट दिसत आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दुरुस्तीचे ७० मोबाईल, १ नवीन फोन अन् ५ हजारांची रोकड चोरीला
मोबाईल दुकानाचे चालक गणेश तोडकरी यांनी परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली आहे. तोडकरी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ग्राहकांनी विश्वासाने दुरुस्तीसाठी दिलेले ७० जुने स्मार्टफोन, १ नवीन सीलबंद मोबाईल आणि गल्ल्यातील ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. याशिवाय इतर साहित्याचीही चोरी झाली असून, चोरीला गेलेल्या एकूण ऐवजाचा निश्चित आर्थिक आकडा संपूर्ण तपासणीनंतर समोर येईल.

पोलीस दलासह एलसीबी घटनास्थळी

घटनेचे गांभीर्य ओळखून संभाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनमोल केदार, पोलीस उपनिरीक्षक नरहरी नागरगोजे, सहायक फौजदार राजाभाऊ थळकरी, अंमलदार चव्हाण आणि डोंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुतळे, सचिन सानप, सचिन आंधळे, रामचंद्र केकान आणि मारुती कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

ठसेतज्ज्ञांकडून पुरावे गोळा

चोरीच्या पद्धतीवरून हा सराईत गुन्हेगार असल्याचा संशय असून, बीडवरून आलेल्या श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने दुकानातून बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय परळीच्या विद्यार्थ्यांची उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागला अभ्यास भेट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 3/10/2026 रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे सर व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे  सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय परळी येथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या वतीने राबवित असलेले रेड रिबीन क्लब च्या विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालय परळी येथे भेट देऊन रुग्णालयातील ओपीडी, अपघात विभाग, ऑपरेशन थेटर  एक्स-रे,  प्रयोगशाळा विभाग, प्रस्तुती कक्ष व आयसीटीसी या विभागाची समुपदेशक श्री शरद चव्हाण यांनी संपूर्ण माहिती दिली त्यात विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन करताना एच आय व्ही/ एड्स   होण्यामागची कारणे त्याची लक्षणे व त्यावर उपलब्ध असणारा औषध उपचार , टीबी, , गुप्तरोग, मलेरिया, कॅन्सर या विविध आजाराबद्दल माहिती दिली, पोस्टर प्रदर्शनातूनही माहिती देण्यात आली व एच आय व्ही तपासणी करण्याच्या प्रक्रिया त्याच्या किट संदर्भात सविस्तर माहिती दिली एच आय व्ही वर उपलब्ध असणाऱ्या औषधोपचाराबद्दल ही माहिती देण्यात आली आयसीटीसी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रेड रिबीन क्लब मार्फत विद्यार्थ्यांकडून आरोग्याची जनजागृती करावी असे आवाहन केले. तसेच एचआयव्ही विषयी शंका आहे का करिता सेल्फ रिस्क असेसमेंट चे किंव आर कोड विद्यार्थ्याकडून स्कॅन करून घेण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे सर, , मेट्रन यमुना गायकवाड   व कर्मचारी वृंद. तसेच यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे सर, रेड रिबीन क्लब कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.पी.तिडके मॅडम, प्रा. ए.डी. शेख, प्रा. एस.के.अप्पार मॅडम यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.