परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी पीठाचे मठाधिपती तथा सद्गुरू ष.ब्र. १०८ श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या भगिनी, पीठाच्या सेवाधारी आणि सर्वांच्या लाडक्या माय माऊली शिवैक्य सौ. शोभा (हेमाताई) शिवलिंग विभुते (पारडकर) यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यांच्या शिवैक्यामुळे वीरशैव लिंगायत समाजासह भक्त परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल परळी वैजनाथ येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या धर्मसंवर्धन, धार्मिक कार्य आणि समाजसेवेच्या प्रदीर्घ प्रवासामागे शोभाताईंचा त्याग, पाठिंबा आणि योगदान अत्यंत मोलाचे होते. सद्गुरूंच्या कार्याला बळ देताना त्यांनी केलेला त्याग आणि दिलेली साथ अनमोल होती. त्या केवळ सद्गुरूंच्या भगिनी नव्हत्या, तर त्यांच्यासाठी आईच्या मायेने आधार देणाऱ्या, प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या माय माऊली होत्या.
सद्गुरूंच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीत शोभाताईंनी दिलेल्या योगदानाचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, त्यागी वृत्तीने आणि सेवाभावाने त्यांनी सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही केवळ एका कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजासाठी दुःखद घटना आहे.
परळी वैजनाथ येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या त्यागाची, मायेची आणि सेवाभावी जीवनाची स्मृती सदैव समाजाच्या मनात जिवंत राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
माय माऊली शोभाताईंचे शिवैक्य म्हणजे प्रेम, त्याग आणि मायेचा एक अध्याय संपला; मात्र सद्गुरूंच्या धर्मसंवर्धन व समाजसेवेच्या कार्यामागील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
शिवैक्य सौ. शोभाताई विभुते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
No comments:
Post a Comment