*मुक्ताई लॉन्स येथे एकनाथी भागवत कथा प्रवचन सोहळ्याचा भाविकांना लाभ.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचे एकनाथी भागवत हे केवळ पद्याचे गद्यात रूपांतर नसून, नाथांच्या जीवनदृष्टीशी एकरूप झालेल्या अधिकारी संताचे चिंतन आणि निरूपण आहे. संत एकनाथ महाराजांनी आपल्या वाणीच्या माध्यमातून संतवाङ्मय आणि सामान्य भाविक यांच्यातील काळाचे व भाषेचे अंतर कमी करून भक्तीचा मार्ग अधिक सुगम केला. त्यांच्या जीवनातून संसारात राहूनही परमार्थ साधता येतो आणि परमात्मवृत्तीने संसाराचे कर्तव्य पार पाडता येते, याचा आदर्श समाजासमोर ठेवला, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रवीण महाराज गोसावी यांनी केले.
भास्करमामा चाटे व परिवाराच्या वतीने परळी-बीड रोडवरील मुक्ताई लॉन्स येथे मातृ-पितृ स्मरणार्थ आयोजित एकनाथी भागवत कथा प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. संत एकनाथ महाराजांचे ते १३ वे वंशज आहेत.या धार्मिक सप्ताहाचे आयोजन ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. तुकाराम गाथा पारायण, एकनाथी भागवत कथा, संतवाङ्मय, हरिनाम, प्रवचन आणि कीर्तनांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक चिंतनाची पर्वणी मिळत आहे. यावेळी संत एकनाथ महाराजांनी समाजाला केवळ भक्तीचा उपदेश केला नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील देवत्व ओळखण्याची दृष्टी दिली. त्यांच्या भागवत निरूपणामुळे संतांची वाणी सामान्य माणसाच्या अधिक जवळ आली असून, आजही त्यांच्या विचारांमधून जीवन जगण्याची दिशा मिळते, असेही प्रवीण महाराज गोसावी यांनी नमूद केले.भाविकांनी या अध्यात्मिक कार्यक्रमांस मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतवाङ्मय, हरिनाम श्रवणाचा लाभ घेतला. दरम्यान आजच्या प्रवचन श्रवणास शिवसेना (शिंदे) जेष्ठ नेते प्रा. टि.पी.मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सौ. शोभाताई व श्री. भास्करराव चाटे (मामा), निळकंठ चाटे, दिनकर चाटे,सौ. स्मिता व ऍड गिरीशराव मुरकुटे,सौ. अर्चना व श्री. श्रीकांत चाटे, सौ. वैशाली व श्री. शशिकांत चाटे तसेच डॉ. सौ. गौरी उर्फ स्वप्ना व श्री. रविकांत चाटे व संपूर्ण चाटे परिवार परिश्रम घेत आहे.
No comments:
Post a Comment