Saturday, August 29, 2026

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ऐनतपूर मध्ये भीतीचे वातावरण एका शेळी ठार.

बेलापूर बुद्रुक (प्रतिनिधी) ऐनतपूर येथील बांगल वस्ती रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच रात्रीच्या वेळी सोमनाथ वसंत राशीनकर यांच्या घरात बिबट्याने हल्ला करून एका शेळीला ठार केले असून एका कुत्र्यालाही घेऊन गेल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिक तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
त्यातच बांगल वस्ती रोडवर पथदिवे नसल्यामुळे रात्री मोठा अंधार असतो, त्यामुळे बिबट्याचा धोका आणखी वाढला आहे.
दरम्यान, गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने पथदिवे बसविण्याची तोंडी मागणी करण्यात येत आहे. अद्याप याबाबत लेखी मागणी करण्यात आलेली नाही. तसेच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायत व वनविभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tuesday, August 18, 2026

वडिलांची 29 वर्षांची परंपरा कायम लातूर च्या 500 भाविकांची भव्य शिवकावड प्रभू वैद्यनाथाच्या चरणी!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पवित्र श्रावण महिन्यानिमित्त पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी लातूर ते परळी अशी भव्य-दिव्य शिवकावड यात्रा रविवारी, दि. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी वैद्यनाथ नगरीत दाखल झाली. लातूर शहरातील मोतीनगर भागातील ललितकुमार बालकिशन शर्मा परिवाराच्या वतीने या शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सुमारे 500 भाविकांचा सहभाग असलेल्या या कावड यात्रेचे परळीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताका आणि ‘हर हर महादेव’, ‘जय भोले’, ‘वैद्यनाथ भगवान की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परळी शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे या यात्रेला पारंपरिक धार्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
दरम्यान, या शिवकावड यात्रेला यंदा विशेष भावनिक पार्श्वभूमी लाभली. लातूरच्या मोतीनगर भागातील कै. बालकिशन शर्मा यांनी सुमारे 29 वर्षांपूर्वी मोजके मित्र व नातेवाईक यांना सोबत घेऊन लातूर ते परळी शिवकावड पदयात्रेची सुरुवात केली होती. दरवर्षी ही यात्रा काढताना परिसरातील नागरिक व नातेवाईक या यात्रेत सहभागी होत गेले आणि भाविकांची संख्या वाढत गेली.
काही महिन्यांपूर्वी बालकिशन शर्मा यांचे वयाच्या 75 व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाचा मुख्य आधार गमावल्याचे दुःख असतानाही चारही भावांनी वडिलांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केला. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवकावड पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आणि तयारीला सुरुवात केली.
*“वडिलांच्या निधनानंतरही त्यांची श्रद्धा आणि परंपरा पुढे नेत आम्ही यंदाची शिवकावड यात्रा काढत आहोत. ही यात्रा आमच्यासाठी केवळ धार्मिक यात्रा नसून वडिलांच्या स्मृतींना वाहिलेली श्रद्धांजली आहे,” अशी भावना ललितकुमार बालकिशन शर्मा व विजयकुमार शर्मा (व्यापारी, लातूर) यांनी व्यक्त केली.*

Sunday, August 16, 2026

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.

परळी (प्रतिनिधी): दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, परळी वैजनाथ येथे स्वातंत्र्य दिन विविध देशभक्तीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने झाली. प्रमुख अतिथी असणारे शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँड च्या मुख्याध्यापिका  स्वप्नाली टाले मॅडम, प्रशासक श्री.उमेश गायकवाड सर, ज्येष्ठ समन्वयक श्री. सुनील येवले सर व सन्माननीय पालकही उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वागतम् सुस्वागतम्, हा मानाचा मुजरा’ हे स्वागतगीत सादर केले.
विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स ड्रिल्स व लेझीमचे आकर्षक सादरीकरण केले.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारताचे महान क्रांतिकारक व राष्ट्रभक्त महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होत त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. 
याप्रसंगी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर सुंदर समूह नृत्य सादर केले, तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीही प्रभावी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणातून देशभक्ती, एकता, अनुशासन आणि राष्ट्रावरील प्रेम या मूल्यांचे सुंदर प्रतिबिंब दिसून आले. 
सदरील कार्यक्रमात प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या त्याग व बलिदानाची माहिती देत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच चि.अथर्व मिश्रा, रुद्र घुगे व आदित्य डिकले या विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व देशप्रेमाच्या भावना व्यक्त केल्या.
शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते सर (IAS) मुख्यमंत्री सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग, त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम यांचे सुपुत्र चि.शौर्य दादा किरण गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, डी डब्ल्यू पी एस वंडरलँड च्या विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गीताच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. नारायण मुंडे, आयुष गडदे, कु.आर्या लिंबकर व यशश्री दौंड या शाळेतील विद्यार्थ्यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आनंद काटापुरे सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले. देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साही सादरीकरणांनी भरलेला होता, यासाठी शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब (IAS) मुख्यमंत्री सचिव, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग, त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा : सौ.उषा किरण गित्ते मॅडम व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Thursday, August 13, 2026

15 ऑगस्टला कुठे कोण करणार ध्वजारोहण? सरकारकडून यादी जाहीर. बीडमध्ये पालकमंत्रीे सुनेत्रा अजित पवार

बीड — भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच विविध शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाले असून, राज्य सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.

राज्यातील प्रमुख शासकीय कार्यक्रमांमध्ये मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार असून पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील ध्वजारोहणाच्या जबाबदारीवरून सत्ताधारी नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या चर्चेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे.

बीडमध्ये सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

सरकारच्या जाहीर केलेल्या यादीत बीड जिल्ह्यासाठी सुनेत्रा अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

राज्य सरकारच्या यादीप्रमाणे विविध जिल्ह्यांची जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे—

  1. ठाणे – एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
  2. बीड – सुनेत्रा अजित पवार
  3. नागपूर – चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
  4. अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधूताई एकनाथराव विखे-पाटील
  5. नंदूरबार – हसन सकिना मियालाल मुश्रीफ
  6. सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चु पाटील
  7. नाशिक – गिरीष गिता दत्तात्रय महाजन
  8. पालघर – गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
  9. जळगाव – गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
  10. अमरावती – दादाजी रेश्माबाई दगडू भुसे
  11. यवतमाळ – संजय प्रमीला दुलीचंद राठोड
  12. रत्नागिरी – उदय स्वरूपा रविंद्र सामंत
  13. धुळे – जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
  14. जालना – पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
  15. नांदेड – अतुल लिलावती मोरेश्वर सावे
  16. चंद्रपूर – अशोक जनाबाई रामाजी उईके
  17. सातारा – शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
  18. मुंबई उपनगर – ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार
  19. वाशिम – दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
  20. लातूर – शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
  21. सोलापूर – जयकुमार कमल भगवानराव गोरे
  22. हिंगोली – नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
  23. छत्रपती संभाजीनगर – संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
  24. धाराशिव – प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
  25. रायगड – भरत विठाबाई मारूती गोगावले
  26. बुलढाणा – मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
  27. सिंधुदुर्ग – नितेश निलम नारायण राणे
  28. अकोला – आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
  29. कोल्हापूर – प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर
  30. गडचिरोली – आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
  31. भंडारा – माधुरी मिरा सतिश मिसाळ
  32. वर्धा – डॉ. पंकज कांचन राजेश भोयर
  33. परभणी – श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
  34. गोंदिया – इंद्रनील अनिता मनोहर नाईक

रायगड-नाशिकच्या चर्चेला पूर्णविराम

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कोणाला जबाबदारी मिळणार, याबाबत सत्ताधारी नेत्यांमध्ये चर्चा रंगली होती. अखेर सरकारने ध्वजारोहणाची जबाबदारी निश्चित करून यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या विषयावरील संभ्रम दूर झाला आहे.

15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय पातळीवर स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून, ध्वजारोहणासोबतच राष्ट्रगीत, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Monday, August 10, 2026

ईश्वर स्वरूपाला प्राप्त होणे म्हणजे शेवट भला होणे होय-गुरुवर्य ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर

किनगाव (प्रतिनिधी) मानवी जीवन हे ईश्वरापासून आले असून त्याचा शेवट हा मृत्यू नसून ईश्वर स्वरूप प्राप्त करणे होय. संत तुकाराम महाराजांचा शेवट गोड झाला असे ते म्हणतात कारण ते ईश्वर स्वरूपाला प्राप्त झाले.जसे पाणी गंगेच्या रूपाने समुद्राला जाऊन मिळते त्यात त्याचे पूर्णत्व असते कारण पाण्याचे उगमस्थान समुद्रच आहे. जिथून आले तिथेच पोहोचणे म्हणजे शेवट भला होणे होय असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध  युवा किर्तनकार गुरुवर्य ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी वै.वत्सलाबाई दत्तात्रय बदने यांच्या गोड जेवण प्रसंगी मौजे देवकरा ता.अहमदपूर जि. लातूर येथे कीर्तन प्रसंगी केले.
 ते पुढे बोलताना म्हणाले की आईचे आयुष्यातून जाणे हे खूप दुःखदायक असते.प्रा. रामकृष्ण बदने सर भागवत बदने, प्रा.योगीराज बदने व कन्या कमल माणिकराव गुट्टे या चारी  भावंडांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.डॉ.रामकृष्ण बदने सर महाराष्ट्रभर आईचा जागर घालतात.आई या पात्राला समाजासमोर मांडण्याचे काम करतात तशीच आई त्यांना लाभली होती.आईच्या जाण्यानंतर संत हीच आई समजून जगलं पाहिजे.आई हे लेकरावर निस्वार्थ प्रेम करते तसे संत ही करतात.संत आई पेक्षा ही श्रेष्ठ असतात म्हणूनच त्यांना माऊली म्हटले जाते. त्या संतांना आपण शरण गेले पाहिजे.आपले सर्वस्व त्यांना अर्पण केले पाहिजे.प्रत्येक जीवाला एक न एक दिवस मृत्यू येणार आहे.जे जे जन्मले ते ते एके दिवशी जाणार म्हणजेच मरणार आहेतच पण त्यातच त्याचाच शेवट गोड किंवा भला होतो जो ईश्वर स्वरूपाला प्राप्त होतात.
    या वेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे,महाराष्ट्राच्या गान कोकिळा गोदावरीताई मुंडे, माजी जि. प. सदस्य तथा भाजपा नेते त्र्यंबक आबा गुट्टे, जि.प.सदस्या प्रतीक्षा ताई भागवत गुट्टे, भाजपाचे युवा नेते भागवत गुट्टे,प.स.सदस्या तथा माजी सभापती प. स.अयोध्याताई केंद्रे,माजी प. स.सदस्य दिनकर मुंडे, रामायणाचार्य गुट्टे गुरुजी गंगाखेड, ह.भ.प. बालाजी महाराज जोडवाडीकर,प्रसाद गीते रामवाडीकर,प्राचार्य डॉ.भालचंद कराड,प्राचार्य जितेंद्र बदने,सरपंच कल्याण बदने,सरपंच विक्रम गुट्टे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत सानप,ह.भ.प. अंकुश महाराज मोळवणकर, प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे, प्रा.डॉ.नितीन देशमुख,प्राचार्य डॉ.हरिदास फेरे,प्राचार्य डॉ.सतीश यादव,प्राचार्य डॉ.बाबुराव लहाने,प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले,प्रा.माधव कांदे,प्रा.शंकर फड, मुख्या. व्यंकट भताने, संस्थाचालक हरिचंद्रजी लहाने,सरपंच पंडितराव मुंडे,डॉ.मनोहरराव घुले,डॉ.रामदास गुट्टे, सेवानिवृत्त मुख्या. बालाजी कांदे,डॉ.केंद्रे शिरसटवाडीकर, उदगीर येथील प्रा.डॉ.उस्तुरगे,  प्रा.डॉ.तंगावार,प्रा.डॉ. बिरादार,प्रा.डॉ.विठ्ठल भंडारे, प्रा. इंगळे सर हाडोळती,संस्थाचालक बाबुराव केंद्रे,भाऊसाहेब केंद्रे,सेवानीवृत अभियंता किशनराव घुले काका,प्रा.डॉ. बालाजी घुले,अमर मानवेंद्र केंद्रे,डॉ.जयपाल चव्हाण, प्राचार्य स्नेहलता चव्हाण, रामायणाचार्य चिंतामणी बाबा महाराज घोडके, रामायणाचार्य ज्ञानेश्वर सातुरे, रामायणाचार्य वैजनाथ महाराज गुट्टे,रामायणाचार्य केंद्रे सर रुद्देकर, रामायणाचार्य आवलगावकर महाराज,रामायणाचार्य बिभीषण महाराज साळुंखे, ह.भ.प.लहुदास महाराज, प्रल्हाद महाराज फड,गायक महादेव महाराज तांदळवाडी कर,गायक उद्धव महाराज भोजनकवाडीकर,गायक बालाजी महाराज गुटे,प्रा.डॉ. ज्ञानोबा मुंडे,प्राचार्य डॉ. हरिदास राठोड,प्राचार्य डॉ. वसंत नाईक,प्राचार्य डॉ. गुरुनाथ कल्याण,प्रा.डॉ.पी आर.शिंदे, प्रा.डॉ.सुग्रीव  क्षीरसागर,सेवा निवृत मुख्याध्यापक संग्राम मस्कले,प्रा.अण्णाराव मुंडे, प्रा.डॉ.मदन गिरी, प्रा.मुंडे सर घोणसी,उपप्राचार्य नागरगोजे सर रेणापूर, प्रा.डॉ.उमाकांत पदमवार,प्रा.सुभाष कनकुटे, प्रा.डॉ.श्रीनिवास पवार,प्रा. डॉ.डी.सी.पवार,प्रा.अरुणा ईटकापल्ले,प्रा.डॉ.सखाराम गोरे,प्रा.संजय पाटील,प्रा.डॉ. नाईक एन.यू.,प्रा.डॉ.गंगाधर मठपती,श्री आनंद राठोड,श्री रूपालाल रिंदकवाले,प्रा. कृष्णा हंगरगेकर,प्रा सुनील पवार,प्रा.एस.एन.सय्यद, प्रा.देशमुख कोठा, प्रा.शहाणा पटेल,भाजपा नेते माधव पाटील उच्चेकर,पत्रकार शेखर पाटील,दिगंबर सोनटक्के,किशोर मस्कले, नागनाथ गीते,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक किशोर फड, तंटामुक्ती अध्यक्ष सायस गुट्टे, बबन रोहिदास गुट्टे,भाजपा नेते बालाजी केंद्रे,रामकृष्ण केंद्रे,बापू केंद्रे,रोहीदास केंद्रे, दौलत गुरूजी गीते,वैजनाथ मुंडे,सेवानिवृत्त मुख्या.भक्तराम हाडबे,शरद फड, संस्थाचालक रामराजे फड,आनंदवाडी, दगडवाडी, कोळवाडी  मोळवण येथील भजनी मंडळ,आप्तेष्ट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यसनमुक्ती वर ब्रह्मकुमारी अहमदपुर शाखा छाया बहनजी यांनी मार्गदर्शन केले
 शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांनी मानले. तदनंतर भोजन प्रसाद सर्व उपस्थित यांनी घेतला.

Sunday, August 9, 2026

खा. बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर बीड जिल्हा कारागृह प्रशासनाला जाग.सुरक्षा तपासणीसाठी अत्याधुनिक कारागृहात 'स्कॅनर' दाखल.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हा कारागृहातील ढिसाळ कारभार, कैद्यांना मिळणारी व्हीआयपी वागणूक आणि गैरप्रकारांविरोधात खा. बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. या भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच कारागृह प्रशासनाला जाग आली असून, परिसरात गांजा, मोबाईल आणि इतर बेकायदेशीर वस्तूंच्या प्रवेशाला चाप लावण्यासाठी अत्याधुनिक 'हायटेक' तपासणी यंत्रणा बसवण्यात आली आहे.

बीड जिल्हा कारागृहात काही ठराविक कैद्यांना नियमांचे उल्लंघन करून विशेष सवलती दिल्या जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. कारागृहात मोबाईलचा वापर, बंदी असलेल्या वस्तूंची सहज उपलब्धता आणि अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यांवरून खा. सोनवणे यांनी ३ ऑगस्ट रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले होते.
गृहमंत्र्यांकडे तक्रार झाल्यानंतर चक्रे वेगाने फिरली असून, बीड कारागृहात आता डिजिटल निगराणी आणि कडक सुरक्षेसाठी अत्याधुनिक साधने बसवण्यात आली आहेत. यात 
बॅगेज स्कॅनर मशीन: कारागृहात येणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि बॅगची बारकाईने तपासणी करण्यासाठी.
डोर फ्रेम मेटल डिटेक्टर: मुख्य प्रवेशद्वारावर संशयित धातू अथवा वस्तू शोधण्यासाठी. हँड हेल्ड मेटल डिटेक्टर: वैयक्तिक शारीरिक तपासणीसाठी असेल. कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांमुळे न्यायप्रणालीवरील सामान्य जनतेचा विश्वास ढळू नये, यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाद्वारे चौकशीची मागणी अजूनही कायम आहे. मात्र, नव्या उपकरणांच्या आगमनामुळे आता बेकायदेशीर वस्तूंच्या थेट प्रवेशाला पूर्णपणे बंदी घालणे शक्य होणार आहे. गृह मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर स्थानिक प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे बीड कारागृहातील 'व्हीआयपी संस्कृती'ला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Friday, August 7, 2026

गोदावरी हॉस्पिटल व स्कॉलर्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष.भूलतज्ञ डॉ.मधुसूदन मगर यांचे निधन.

परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील गोदावरी हॉस्पिटल व स्कॉलर्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा भूलतज्ज्ञ डॉ. मधुसूदन मगर यांचे अल्पशा आजाराने  पुण्यातील खासगी रुग्णालयात  निधन झाले. मृत्युसमयी ते ५४ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी डाॅ. स्मिता, डाॅ.नेहा, श्रेया ह्या दोन मुली, एक मुलगा आणि डाॅ.विजय व अजित मगर हे दोन भाऊ असा परिवार आहे.
 दरम्यान डाॅ. मगर त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजता परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Saturday, August 1, 2026

रेल्वे फाटक व रेल्वे रुळ सुरक्षितपणे ओलांडण्याबाबत जनजागृती .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रेल्वे फाटक व रेल्वे रुळ सुरक्षितपणे ओलांडण्याबाबत जनजागृती सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दुचाकी, चारचाकी किंवा इतर कोणतेही वाहन घेऊन रेल्वे रुळ फक्त अधिकृत रेल्वे फाटक, उड्डाणपूल (FOB) किंवा भुयारी मार्ग (Underpass) यांच्या मार्गेच ओलांडावेत.रेल्वे रुळ ओलांडताना खालील बाबींचे पालन करावे:
*रेल्वे फाटक बंद असल्यास कोणत्याही परिस्थितीत फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
*रेल्वे येत असल्याची शक्यता असल्यास रुळांवर जाऊ नये.
*मोबाईल फोनचा वापर किंवा हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडू नयेत.
*रेल्वे रुळांचा शॉर्टकट म्हणून वापर करू नये.
*रेल्वे कर्मचारी व वाहतूक नियंत्रण यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
*रेल्वे रुळांवरील निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. 
त्यामुळे स्वतःची व इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवासास सहकार्य करावे.
— जनहितार्थ प्रसिद्ध

परळीत दिव्य ज्योति जाग्रति संस्थानची गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी.गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वकल्याणाचा मार्ग खुला होतो – सुश्री रुचिका भारतीजी_

सद्गुरूच जीवनाला योग्य दिशा देऊन आत्मकल्याणाचा महामंत्र देतात – स्वामी निरूपानंदजी_ 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने परमपूज्य श्री आशुतोष महाराजजी यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित श्री गुरुपौर्णिमा महोत्सव शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी परळी वैजनाथ येथील वैष्णवी मंगल कार्यालयात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर गुरुभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना नेते अभयकुमार ठक्कर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनोज संकाये, नगरपरिषदेचे गटनेते नितीन बागवाले, नगरसेवक अश्विन मोगरकर, शिवसेना युवा नेते प्राचार्य अतुल दुबे, उद्योजक वैजनाथआप्पा कोल्हे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संस्थापक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, पत्रकार धनंजय आढाव, संतोष जुजगर, बालाजी ढगे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच परमपूज्य सद्गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या प्रतिमेची पूजा व महाआरती करून झाली. त्यानंतर सामूहिक भजनाने संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिगीतांच्या स्वरांत उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
यानंतर दिल्ली येथील परमपूज्य सद्गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या कृपापात्र शिष्या साध्वी सुश्री रुचिका भारतीजी यांनी प्रभावी अध्यात्मिक प्रवचनातून गुरूचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व उलगडून सांगितले. वेद, उपनिषदे तसेच संत परंपरेतील उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी गुरू हा अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीपस्तंभ असल्याचे सांगितले.
त्या म्हणाल्या, "भारताची गुरू-शिष्य परंपरा ही जगासाठी आदर्श आहे. श्रद्धा, विश्वास, विनम्रता आणि सेवाभाव या गुणांनी युक्त शिष्यालाच गुरूकृपेचा लाभ मिळतो. गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते."
श्रीराम आणि हनुमान यांच्या आदर्श नात्याचा दाखला देत त्यांनी गुरूसेवेचे महत्त्व स्पष्ट केले. जीवनातील संकटांच्या काळात सद्गुरूच योग्य मार्ग दाखवतात. गुरू शिष्याची परीक्षा घेत असतात आणि त्या प्रत्येक प्रसंगात विश्वास व समर्पण कायम ठेवणारा शिष्यच अध्यात्मिक प्रगती साधू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी परमपूज्य सद्गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांचे कृपापात्र शिष्य स्वामी निरूपानंदजी यांनीही मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात मानव दिशाहीन होत चालला असून, अशा परिस्थितीत सद्गुरूच योग्य मार्ग दाखवून आत्मकल्याणाचा महामंत्र देतात, असे त्यांनी सांगितले. गुरूंच्या शिकवणीचा स्वीकार करून जीवनात अध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमस्थळी आकर्षक फुलांची सजावट, रांगोळी, प्रकाशयोजना आणि परमपूज्य सर्वश्री आशुतोषजी महाराजजी यांच्या भव्य दर्शनमंदिराने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सत्संग परिसरात अध्यात्मिक साहित्याचे स्टॉलही उभारण्यात आले होते.
परळीसह अंबाजोगाई, लातूर, नांदेड, गंगाखेड, सोनपेठ, माजलगाव, केज, कळंब, सिरसाळा आदी भागांतून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून गुरुकृपेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या परळी शाखेतील सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

*फोटो कॅप्शन :*
परळी वैजनाथ येथे आयोजित दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या श्री गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करताना सुश्री रुचिका भारतीजी, स्वामी निरूपानंदजी. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महाआरती करण्यात आली.

कै. वसंतराव नाईक जयंती महोत्सवात 'बीड भूमिपुत्र' पुरस्कार मिळाल्याबद्दल डी. एस. राठोड यांचा जाहीर सत्कार शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव

धर्मगुरू बाबुसिंग महाराज,आ. धनंजय मुंडे, ना.पंकजाताई मुंडे,   सौ.मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते डी. एस.राठोड यांचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा येथे आयोजित भव्य जयंती महोत्सवात 'बीड भूमिपुत्र' पुरस्काराने सन्मानित झालेले राजर्षी शाहू महाराज कौडगाव हुडा संस्थेचे अध्यक्ष तथा वसंतनगर तांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी. एस. राठोड यांचा धर्मगुरू बाबुसिंग महाराज,आ. धनंजय मुंडे, ना.पंकजाताई मुंडे,   सौ.मोहिनीताई इंद्रनील नाईक व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
             हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा येथे आयोजित भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक लोकमत यांच्या प्रतिष्ठेच्या बीड भूमिपुत्र' पुरस्काराने सन्मानित झालेले राजर्षी शाहू महाराज कौडगाव हुडा संस्थेचे अध्यक्ष तथा वसंतनगर तांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी. एस. राठोड यांचा सर्व बंजारा समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात बंजारा समाजाचे श्रद्धेय धर्मगुरू बाबुसिंग महाराज, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या शुभहस्ते श्री.डी.एस. राठोड साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते मा.अजय मुंडे, वसंत राठोड,प्रेमदास पवार, बाळासाहेब (पप्पू) चव्हाण, सिरसाळ्याचे सरपंच शेख नशीब, प्रविण पवार, विशाल चव्हाण, आकाश राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राठोड यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डी. एस. राठोड यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, सामाजिक बांधिलकी आणि वसंतनगरच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी बंजारा समाजातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल उपस्थितांनी श्री. डी. एस. राठोड साहेबांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
       कै. वसंतराव नाईक जयंती महोत्सवात बीड भूमिपुत्र' पुरस्काराने मिळाल्याबद्दल माझा जाहीर सत्कार होणे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा व अविस्मरणीय क्षण आहे. माझ्या शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामविकासाच्या कार्याची घेतलेली ही दखल मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझे कुटुंबीय, सहकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, हितचिंतक आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा आहे. सकल बंजारा समाज, जयंती महोत्सव समिती तसेच उपस्थित धर्मगुरू बाबुसिंग महाराज,आ. धनंजय मुंडे, ना.पंकजाताई मुंडे,   सौ.मोहिनीताई इंद्रनील नाईक व सर्व मान्यवरांनी दिलेल्या या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या पुरस्कारातून आणि सत्कारातून मिळालेली प्रेरणा कायम जपून समाजहित, शिक्षणाचा प्रसार आणि ग्रामीण विकासासाठी यापुढेही अधिक समर्पितपणे कार्य करत राहीन." असेही प्रतिक्रिया बीड भूमिपुत्र' पुरस्काराने प्राप्त तथा राजर्षी शाहू महाराज कौडगाव हुडा संस्थेचे अध्यक्ष तथा वसंतनगर तांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी. एस. राठोड यांनी दिली आहे.