Saturday, October 10, 2026
पलसिद्ध महास्वामी पीठाच्या सेवाधारी शिवैक्य सौ. शोभा (हेमाताई) विभुते यांना परळीत वीरशैव लिंगायत समाजाची भावपूर्ण श्रद्धांजली.
Tuesday, October 6, 2026
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी परळीचे सुपुत्र आयएएस किरण गित्ते यांची विशेष चर्चा; राष्ट्रीय महामार्ग परिषदेत भूमिकेचे कौतुक.
संत एकनाथांच्या भागवतातून अध्यात्म आणि संसाराचा सुंदर समन्वय -ह.भ.प. प्रवीण महाराज गोसावी.
परळीच्या वाण धरणावर २४ तास खडा पहारा; अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची विशेष पथके तैनात.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): चालू खरीप हंगामात पर्जन्यमानाने ओढ दिल्याने मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आणि भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने जलस्रोतांच्या संरक्षणासाठी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. तालुक्यातील वाण धरण (नागापूर) येथील पाणीसाठ्यातून होणारा अनधिकृत व अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धरणावर २४ तास खडा पहारा ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय परळी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश ५ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आले असून, मंगळवार (दि. ६) पासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
दोन पाळ्यांमध्ये २४ तास चोख नजर
परळी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विनोद रनवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, ६ ऑक्टोबरपासून धरण परिसरात दोन स्वतंत्र पाळ्यांमध्ये २४ तास तपासणी आणि नियंत्रण ठेवले जाणार आहे:
पहिली पाळी: सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत
दुसरी पाळी: रात्री ८:०० ते सकाळी ८:०० वाजेपर्यंत
या दोन्ही पाळ्यांमध्ये धरणातील पाण्यावर नजर ठेवण्यासाठी बहुविभागीय संयुक्त विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. धरणातील पाणीसाठ्यातून कोणत्याही व्यक्तीने, कारखान्याने अथवा संस्थेने अनधिकृतपणे मोटारी किंवा पाईपलाईन टाकून पाणी उपसू नये, यासाठी ही पथके सातत्याने गस्त घालणार आहेत.
धरणाचे संरक्षण आणि पाण्याचा थेंबन्थेंब वाचवण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत एकत्र आले आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या विशेष नियंत्रण पथकांमध्ये खालील यंत्रणांचा समावेश आहे: तलाठी व महसूल सेवक (ग्रामस्तरीय महसूल प्रशासन), ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक, परळी नगरपालिका कर्मचारी, महावितरणचे (MSEDCL) तांत्रिक कर्मचारी (अवैध वीजजोडण्या तोडण्यासाठी), लघु पाटबंधारे विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी, परळी पोलीस कर्मचारी व स्थानिक पोलीस पाटील
हलगर्जीपणा आढळल्यास कर्मचाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड
या आदेशाची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर व्हावी, यासाठी तहसीलदार विनोद रनवरे यांनी कडक निर्देश दिले आहेत.
"धरणावर नेमण्यात आलेल्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कर्तव्यात कसूर, गैरहजेरी किंवा हलगर्जीपणा दाखवल्यास त्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये तात्काळ शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल. उपलब्ध जलसाठा हा परळीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि आवश्यक गरजांसाठी अतिशय मोलाचा आहे; त्यामुळे पाण्याचा एक थेंबही बेकायदेशीरपणे उपसू दिला जाणार नाही."
-विनोद रनवरे, तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, परळी वैजनाथ.
अंबाजोगाईत बसस्थानकाजवळ अनैतिक देहव्यापार लॉजवर पोलिसांची धाड.
Saturday, October 3, 2026
परळीत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद! ४८ तासांत २३ जणांना घेतला चावा.नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी वैजनाथ शहरात मोकाट व फिरस्त्या श्वानांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात गुरुवारी आणि शुक्रवारी अशा अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत तब्बल २३ जणांना फिरस्त्या श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शुक्रवारी श्वानांनी ८ जणांचे लचके तोडले, ज्यात पेठ मोहल्ला परिसरातील तीन लहान बालकांचा समावेश आहे. तर गुरुवारी पद्मावती गल्लीतील एका शाळकरी विद्यार्थ्यासह विविध भागांतील १४ जणांना लक्ष्य करण्यात आले होते. रस्त्यांवरून ये-जा करताना लहान मुले, महिला आणि वृद्धांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे.
शहरातील गल्लीबोळांत कुत्र्यांचे टोळके वाढत असतानाच परळी नगरपालिकेची श्वान पकडण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून अचानक थंडावली होती. परिणामी श्वानांचा उपद्रव आणखी वाढला. वाढत्या तक्रारींनंतर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नगरपालिका कर्मचारी राज गायकवाड यांनी पेठ मोहल्ला भागातील जखमी व्यक्तीच्या कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर राधाकृष्ण सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली झाशी येथील विशेष कामगारांनी नगरपालिकेचे कर्मचारी राजाभाऊ गायकवाड, दयानंद रोडे आणि सचिन हिके यांच्या सहकार्याने पेठ मोहल्ल्यात दोन आक्रमक श्वानांना पकडले.
नंदागौळ ॲनिमल सेंटरमध्ये ६० श्वान; पिसाळलेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था
पकडण्यात आलेल्या श्वानांना नंदागौळ रोडवरील पालिकेच्या अधिकृत ॲनिमल सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या या केंद्रात सुमारे ६० श्वान असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिसाळलेल्या किंवा संशयित श्वानांना स्वतंत्र कक्षात ठेवले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. शनिवारपासून (३ ऑक्टोबर २०२६) संपूर्ण शहरात श्वान पकडण्याची मोहीम पुन्हा युद्धपातळीवर राबवली जाईल, अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे.
परळी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उपचार कक्ष सुरू करा
परळी शहरात एकट्या सप्टेंबर महिन्यातच तब्बल १०० पेक्षा अधिक नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. श्वानदंश झाल्यानंतर गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात (SRTR) पाठवले जाते. यात लहान मुले आणि वृद्धांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रासामुळे प्रचंड हाल होतात.
रेबीज हा अत्यंत प्राणघातक आजार असल्याने वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे यांनी रुग्णासाठी परळीतच 'स्वतंत्र श्वानदंश उपचार कक्ष' सुरू करावा आणि सर्व आवश्यक रेबीज प्रतिबंधक लसी व औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे.
परळीतील व्यापाऱ्याचे दुकान फोडून दुरुस्तीचे ७० मोबाईल लंपास, व्यापारी वर्गात चिंता. पोलीस दलासह एलसीबी घटनास्थळी.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि २४ तास वर्दळ असणाऱ्या मध्यवर्ती भागातील सुरक्षेचे धिंडवडे काढणारी एक धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या लगतच असलेले 'न्यू आर्यन मोबाईल शॉपी'चे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुरुस्तीसाठी आलेले ७० मोबाईल आणि रोकड लंपास केली आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर २०२६) पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भरवस्तीत आणि थेट बँकेच्या शेजारीच दुकानाचा पत्रा उचकटून चोरी झाल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात तीव्र घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारच्या पहाटे २:१५ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छताचा लोखंडी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर चोरट्याने दुरुस्तीच्या रॅकवर ठेवलेले ग्राहकांचे मोबाईल आणि रोख रक्कम गोळा करून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, फुटेजमध्ये एकच संशयित चोरटा चोरी करताना स्पष्ट दिसत आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दुरुस्तीचे ७० मोबाईल, १ नवीन फोन अन् ५ हजारांची रोकड चोरीला
मोबाईल दुकानाचे चालक गणेश तोडकरी यांनी परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली आहे. तोडकरी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ग्राहकांनी विश्वासाने दुरुस्तीसाठी दिलेले ७० जुने स्मार्टफोन, १ नवीन सीलबंद मोबाईल आणि गल्ल्यातील ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. याशिवाय इतर साहित्याचीही चोरी झाली असून, चोरीला गेलेल्या एकूण ऐवजाचा निश्चित आर्थिक आकडा संपूर्ण तपासणीनंतर समोर येईल.
घटनेचे गांभीर्य ओळखून संभाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनमोल केदार, पोलीस उपनिरीक्षक नरहरी नागरगोजे, सहायक फौजदार राजाभाऊ थळकरी, अंमलदार चव्हाण आणि डोंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुतळे, सचिन सानप, सचिन आंधळे, रामचंद्र केकान आणि मारुती कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
चोरीच्या पद्धतीवरून हा सराईत गुन्हेगार असल्याचा संशय असून, बीडवरून आलेल्या श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने दुकानातून बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय परळीच्या विद्यार्थ्यांची उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागला अभ्यास भेट
Monday, September 28, 2026
महावितरणचा भोंगळ कारभार: वरोरा येथे उखर्डा गावात नवीन 'स्मार्ट मीटर' जळाले नवीन मीटरसाठी पैसे मागितल्याने ग्राहकाचा तीव्र संताप!
वीज मीटर बदलण्यासाठी महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ.ला 13 हजारांची लाच, ACBने रंगेहात पकडले.
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तक्रारदार पंचासह महावितरणच्या परळी कार्यालयात गेले. परंतु त्या ठिकाणी अरुण गीते हे उपस्थित नव्हते. त्यानंतर तक्रारदारांनी गीते यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी तक्रारदारास शहरातील माऊलीनगर येथे बोलावून घेतले. त्या ठिकाणी झालेल्या चर्चेदरम्यान गीते यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. रविवारी दुपारी १.१० वाजता जिरगेनगर येथील डीपीजवळ तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ तंत्रज्ञ अरुण गीते यांना पथकाने रंगेहाथ पकडले. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार गजानन घायवट, पोलिस अंमलदार मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, गणेश चेके, पोलिस नाईक कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री सुरू होती. दरम्यान, परळीतील जलालपूर भागात भाड्याने राहत असलेल्या गीते यांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड येथील अधिकारी समाधान कवडे यांच्या पथकाने घेतल्याचे वृत्त आहे.
Thursday, September 24, 2026
कुटुंब अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनात इकडे चोरट्यांनी घर केले साफ!कपाटातील सोने अन् रोकड लंपास.
आष्टी (प्रतिनिधी): गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनासाठी कुटुंब घराला कुलूप लावून गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दार उचकटून आत प्रवेश करत कपाटातील दीड तोळे सोने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. ही घरफोडी आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे बुधवारी रात्री घडली असून, कीर्तन संपवून कुटुंब घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
सप्ताहात कीर्तनाला गेले अन् घडला अनर्थ
सुर्डी येथे सध्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. गावातील रहिवासी शेतकरी जालिंदर अर्जुन गर्जे हे बुधवारी रात्री घराला कुलूप लावून सहकुटुंब सप्ताहातील कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात भामट्यांनी घराच्या दरवाजा एका बाजूने उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील साहित्याची उचकापाचक करत कपाटात ठेवलेले सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला.
कीर्तन संपवून घरी आल्यावर प्रकार उघड
रात्री उशिरा कीर्तन संपल्यानंतर गर्जे कुटुंब घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि सामानाची दाणादाण उडाल्याचे दिसले. कपाटातील दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या चोरीच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हिंद नगर-भवानी नगरमधील अवैध दारू विक्री बंद करा.नवीन दारू दुकानास स्थलांतरास परवानगी देऊ नये. नागरिकांचे प्रशासनाला निवेदन - प्रशांत कराड
अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स रस्त्यावर उलटली. २० प्रवासी थोडक्यात बचावले
आष्टी (प्रतिनिधी) : पुण्याहून नांदेडकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. हा भीषण अपघात आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथील हॉटेल सम्राटसमोर पहाटे ३:२५ वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, गाडीतील सर्व २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
गाढ झोपेत असतानाच उलटली बस
'स्वामी टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स'ची बस (क्रमांक ए.आर. ०६, बी. ६७००) पुण्यावरून अहिल्यानगर-पाथर्डी मार्गे नांदेडच्या दिशेने २० प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असताना आष्टी तालुक्यातील मराठवाडी शिवारात ट्रॅव्हल्समध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्यावर उलटली. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली; मात्र नशीब बलवत्तर असल्याने सर्व प्रवासी मोठ्या अनर्थातून बचावले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंभोरा पोलिसांकडून अवघ्या ३० मिनिटांत मदतकार्य
पहाटे ३:२५ च्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्परता दाखवली. पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, कृष्णा नरवडे, प्रकाश पडवळ, सोपान येवले आणि होमगार्ड धुमाळ यांनी अवघ्या ३० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून सर्व जखमी प्रवाशांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवले.
चालकाला मारहाण करून कार पळवणारे दोन भामटे गजाआड; 'डायल ११२' मुळे अवघ्या १०५ मिनिटांत कारवाई.
बीड (प्रतिनिधी) मूळचे कोळगाव (ता. गेवराई) येथील रहिवासी व सध्या शांतीनिकेतन शाळेजवळ राहणारे अशोक दत्तात्रय करांडे (वय ४२) हे १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घरासमोर मित्राची कार (एमएच २३ एडी १४२४) घेऊन थांबले होते. त्यावेळी आलेल्या दोन भामट्यांनी "आम्हाला तुझी गाडी दे" अशी दमदाटी करत करांडे यांना कारमधून बाहेर ओढून मारहाण केली आणि गाडी घेऊन पसार झाले.
घटनेनंतर करांडे यांनी तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधला. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस पथकाने शहरात नाकाबंदी करून पाठलाग सुरू केला आणि रात्री ३:४५ वाजता अंबिका चौक परिसरातून पळवून नेलेली कार जप्त केली. या प्रकरणात सुधीर हनुमान वाघमारे (वय २५) व प्रीतम गणेश हनवते (वय १९, दोघे रा. शाहूनगर, बीड) यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, अंमलदार भास्कर केंद्र, संतोष राऊत व सचिन आगलावे यांनी केली.
‘डायल ११२’ ची तत्परता ठरली गेमचेंजर
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या 'डायल ११२' प्रणालीवर कॉल प्राप्त होताच शिवाजीनगर पोलिस पथकाने दाखवलेले प्रसंगावधान व अवघ्या १०५ मिनिटांत आरोपींना बेड्या ठोकून केलेली यशस्वी कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.
अटक करण्यात आलेले सुधीर वाघमारे आणि प्रीतम हनवते हे दोघेही शहरातील शाहूनगर भागातील रहिवासी असून, मध्यरात्री रस्त्यावर दादागिरी करत वाहन हिसकावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी त्वरित उधळून लावला आहे.
हालगे गल्ली ३३ वर्षांची परंपरा!मिरवणुकी ऐवजी नवचैतन्य गणेश मंडळाचा भव्य महाप्रसाद.
जमात-ए-इस्लामी हिंद परळीच्या वतीने MBBS साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यां चा भव्य सत्कार.
Tuesday, September 22, 2026
शिवनाम जपातून शरीरशुद्धी; शांततेसाठी सामूहिक प्रयत्न करा. मुला-मुलींना संस्कारांची शिदोरी द्या लिंगपूजा भस्म धारणेची शिकवण द्या.:- सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज.
Saturday, September 19, 2026
लालपरी' प्रवाशांचा जीव टांगणीला! हेड लाइट बंद, बॅटरीच्या उजेडात बस २० किलोमीटर धावली.
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी ते सावरगाव अशी धावणारी बस शुक्रवारी रात्री सात वाजेनंतर चक्क बॅटरीच्या उजेडात २० किलोमीटर धावली. रात्रीच्या अंधारात धोकादायक रीतीने हा प्रवास करण्यात आला. प्रवाशांनीही जीव मुठीत धरूनच सावरगावपर्यंत प्रवास केला. या प्रकारामुळे आष्टी आगाराच्या बसेस आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबाबतची प्रवाशांकडून मिळालेली माहिती अशी की, सावरगावला मुक्कामी निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल २०५५) कडा येथून सायंकाळी ६ वाजता निघाली. साबलखेड, धानोरा, पिंपरखेड, हिवरा मार्गे बस सुलेमान देवळा येथे पोहोचली. तेथे अंधार पडल्याने चालकाने बसचे मुख्य हेडलाइट लावले मात्र तांत्रिक बिघाडामुळे बसचे लाइट न लागल्याने काही वेळ बस तिथेच थांबली. या परिस्थितीत भर रस्त्यात अंधारात बस उभी ठेवण्याऐवजी चालकाने बसमध्ये असलेल्या बॅटरीवर गाडी पुढे नेण्याची तयारी केली. काही प्रवाशांनीही नेहमीचाच रस्ता आहे, असे सांगत बॅटरीच्या उजेडात बस नेण्यास संमती दर्शविली.
वाहकाने धरली बॅटरी
त्यानंतर वाहकाने चालकाच्या शेजारी उभे राहात रस्त्याच्या दिशेने प्रकाश जाईल, अशा पद्धतीने बॅटरी धरली. बस चालविताना चालकाची कसरत झाली. चालकाने नेहमीच्या वेगापेक्षा कमी वेग ठेवत म्हसोबाची वाडी, गहूखेल, तागडखेल, वेलतुरी आणि गंगादेवी मार्गे साडेसात वाजता सावरगाव येथे बस पोहोचविली. दहा प्रवाशांनी गावी पोहोचल्यावर सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी धावणाऱ्या बसेसच्या दिव्यांची तपासणी केली जात नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. यापुढे नादुरुस्त गाड्या मुक्कामी न पाठवता सुस्थितीतील बस द्याव्यात, अशी मागणी कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे यांनी केली आहे.
माहिती घेतो...
बस बॅटरीच्या उजेडात चालल्यासंदर्भात चालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून योग्य ती माहिती घेतो.
- अनिल निकाळजे, आगार प्रमुख, आष्टी
Web Summary : An ST bus ran 20 km in darkness using only battery light after its headlights failed. Passengers held their breath during the dangerous journey from Ashti to Savargaon. This incident raises serious questions about the maintenance and operational efficiency of the Ashti depot's buses.