Monday, September 28, 2026

वीज मीटर बदलण्यासाठी महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ.ला 13 हजारांची लाच, ACBने रंगेहात पकडले.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) फॉल्टी वीज मीटर बदलून वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना परळी येथील महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञ अरूण सुरेश गितेला जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी रंगेहाथ पकडले. परळी शहरातील जिरगेनगर येथील डीपीजवळ रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तक्रारदार पंचासह महावितरणच्या परळी कार्यालयात गेले. परंतु त्या ठिकाणी अरुण गीते हे उपस्थित नव्हते. त्यानंतर तक्रारदारांनी गीते यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी तक्रारदारास शहरातील माऊलीनगर येथे बोलावून घेतले. त्या ठिकाणी झालेल्या चर्चेदरम्यान गीते यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. रविवारी दुपारी १.१० वाजता जिरगेनगर येथील डीपीजवळ तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ तंत्रज्ञ अरुण गीते यांना पथकाने रंगेहाथ पकडले. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार गजानन घायवट, पोलिस अंमलदार मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, गणेश चेके, पोलिस नाईक कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री सुरू होती. दरम्यान, परळीतील जलालपूर भागात भाड्याने राहत असलेल्या गीते यांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड येथील अधिकारी समाधान कवडे यांच्या पथकाने घेतल्याचे वृत्त आहे.

No comments:

Post a Comment