Thursday, September 24, 2026

कुटुंब अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनात इकडे चोरट्यांनी घर केले साफ!कपाटातील सोने अन् रोकड लंपास.


आष्टी (प्रतिनिधी): गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनासाठी कुटुंब घराला कुलूप लावून गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दार उचकटून आत प्रवेश करत कपाटातील दीड तोळे सोने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. ही घरफोडी आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे बुधवारी रात्री घडली असून, कीर्तन संपवून कुटुंब घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सप्ताहात कीर्तनाला गेले अन् घडला अनर्थ
सुर्डी येथे सध्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. गावातील रहिवासी शेतकरी जालिंदर अर्जुन गर्जे हे बुधवारी रात्री घराला कुलूप लावून सहकुटुंब सप्ताहातील कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात भामट्यांनी घराच्या दरवाजा एका बाजूने उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील साहित्याची उचकापाचक करत कपाटात ठेवलेले सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला.

कीर्तन संपवून घरी आल्यावर प्रकार उघड
रात्री उशिरा कीर्तन संपल्यानंतर गर्जे कुटुंब घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि सामानाची दाणादाण उडाल्याचे दिसले. कपाटातील दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या चोरीच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

No comments:

Post a Comment