Monday, September 14, 2026

शेगाव-पंढरपूर महामार्गावर थरार.रिक्षा अंगावर उलटल्याने २२ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.


केज (प्रतिनिधी) : शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव (ता. केज) शिवारात रविवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कडबा कुटी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रिक्षा दुभाजकावर (डिव्हायडर) आदळून थेट अंगावर उलटल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. उमेश फुलचंद भैरट (वय २२ वर्षे, रा. उमरी, ता. केज) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कळंबहून गावी जाताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, उमरी येथील रहिवासी असलेले उमेश भैरट हे शेतातील जनावरांसाठी कडबा कुटी आणण्याकरिता भाड्याने रिक्षा घेऊन कळंब येथे गेले होते. रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ते कडबा कुटी भरून रिक्षातून आपल्या उमरी गावाकडे परत येत होते. माळेगावजवळ आले असता चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव रिक्षा थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली आणि जोरदार पलटी झाली. या अपघातात रिक्षामध्ये कडबा कुटीसोबत बसलेले उमेश हे थेट रिक्षाखाली दबले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

उमरी गावावर शोककळा
सोमवारी दुपारी ३ वाजता उमरी येथे शोकाकुल वातावरणात उमेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या बाविसाव्या वर्षी उमेशचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment