पुणे (प्रतिनिधी) शहरातील चर्चेत असणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला सहआरोपी बनवले जाऊ शकते असं बोलले जाते.
माहितीनुसार, पोलिसांच्या ताब्यात असणारा हा नवा आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र रितेश हिंगे हा आहे. १८ जूनला लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट रचण्याबाबत रितेशला आधीच माहिती होते. चेतन चौधरी आणि त्याची गर्लफ्रेंड सिया गोयल या दोघांनी वर्गमित्रासोबत हत्येची योजना बनवली होती. या हत्याकांडाच्या संपूर्ण कटाची चर्चा या तिघांमध्ये झाली होती. चेतन आणि सियाने रितेशलाही लोहगडला सोबत येण्यास अनेकदा सांगितले होते. मात्र त्याने येण्यास नकार दिला.
परंतु केतन अग्रवाल हत्याकांडाबाबत रितेशला आधीच माहिती होती. केतनच्या हत्येनंतर कथितपणे चेतन चौधरी आपल्या या मित्राला भेटला होता असा पोलिसांचा संशय आहे. सिया गोयलही त्याच्या संपर्कात होती. आरोपी चेतन चौधरी याच्या फोन रेकॉर्डमधून पोलीस रितेश हिंगे याच्यापर्यंत पोहचले. हा आरोपी मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं समोर येत असून तो पुण्यातील बालेवाडी येथे एका खासगी कंपनीत काम करतो. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातही तो चेतन चौधरीच्या संपर्कात होता. आता या नव्या आरोपीचा हत्याकांडात काय सहभाग होता आणि त्याची गुन्ह्यात काय भूमिका होती याचा शोध पोलीस घेत आहेत.
No comments:
Post a Comment