आष्टी (प्रतिनिधी) आष्टी ते सावरगाव अशी धावणारी बस शुक्रवारी रात्री सात वाजेनंतर चक्क बॅटरीच्या उजेडात २० किलोमीटर धावली. रात्रीच्या अंधारात धोकादायक रीतीने हा प्रवास करण्यात आला. प्रवाशांनीही जीव मुठीत धरूनच सावरगावपर्यंत प्रवास केला. या प्रकारामुळे आष्टी आगाराच्या बसेस आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबाबतची प्रवाशांकडून मिळालेली माहिती अशी की, सावरगावला मुक्कामी निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल २०५५) कडा येथून सायंकाळी ६ वाजता निघाली. साबलखेड, धानोरा, पिंपरखेड, हिवरा मार्गे बस सुलेमान देवळा येथे पोहोचली. तेथे अंधार पडल्याने चालकाने बसचे मुख्य हेडलाइट लावले मात्र तांत्रिक बिघाडामुळे बसचे लाइट न लागल्याने काही वेळ बस तिथेच थांबली. या परिस्थितीत भर रस्त्यात अंधारात बस उभी ठेवण्याऐवजी चालकाने बसमध्ये असलेल्या बॅटरीवर गाडी पुढे नेण्याची तयारी केली. काही प्रवाशांनीही नेहमीचाच रस्ता आहे, असे सांगत बॅटरीच्या उजेडात बस नेण्यास संमती दर्शविली.
वाहकाने धरली बॅटरी
त्यानंतर वाहकाने चालकाच्या शेजारी उभे राहात रस्त्याच्या दिशेने प्रकाश जाईल, अशा पद्धतीने बॅटरी धरली. बस चालविताना चालकाची कसरत झाली. चालकाने नेहमीच्या वेगापेक्षा कमी वेग ठेवत म्हसोबाची वाडी, गहूखेल, तागडखेल, वेलतुरी आणि गंगादेवी मार्गे साडेसात वाजता सावरगाव येथे बस पोहोचविली. दहा प्रवाशांनी गावी पोहोचल्यावर सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी धावणाऱ्या बसेसच्या दिव्यांची तपासणी केली जात नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. यापुढे नादुरुस्त गाड्या मुक्कामी न पाठवता सुस्थितीतील बस द्याव्यात, अशी मागणी कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे यांनी केली आहे.
माहिती घेतो...
बस बॅटरीच्या उजेडात चालल्यासंदर्भात चालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून योग्य ती माहिती घेतो.
- अनिल निकाळजे, आगार प्रमुख, आष्टी
Web Summary : An ST bus ran 20 km in darkness using only battery light after its headlights failed. Passengers held their breath during the dangerous journey from Ashti to Savargaon. This incident raises serious questions about the maintenance and operational efficiency of the Ashti depot's buses.
No comments:
Post a Comment