*नशेच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती, युवकांना सकारात्मक जीवनशैलीची प्रेरणा आणि नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नशेच्या वाढत्या समस्येविरोधात जनजागृती आणि नशामुक्त समाजनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून दिव्य ज्योति जाग्रती संस्थान (DJJS) यांच्या ‘बोध–नशा उन्मूलन कार्यक्रम’ या उपक्रमाचा भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयासोबत दोन वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा करार नशामुक्त भारत अभियान (NMBA) अंतर्गत करण्यात आला आहे.
या सामंजस्य करारामुळे नशेच्या दुष्परिणामांविषयी समाजातील विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यास तसेच विशेषतः युवकांना नशेपासून दूर ठेवून सकारात्मक व निरोगी जीवन शैलीकडे वळविण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप मिळणार आहे.
DJJSच्या ‘बोध–नशा उन्मूलन कार्यक्रम’ अंतर्गत जनजागृती अभियान, समुपदेशन, प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम, व्याख्याने तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नशेच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात येते. नशेपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि समाजातील विविध घटकांना नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. नशेच्या आहारी जाण्यापासून युवकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीसोबतच सकारात्मक विचार, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी DJJSच्या साध्वी शिताभा भारती, ग्लोबल कोऑर्डिनेटर, बोध–नशा उन्मूलन कार्यक्रम यांनी नशेची समस्या ही केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसून तिचा परिणाम कुटुंब आणि संपूर्ण समाजावर होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे नशामुक्त समाजनिर्मितीसाठी शासन, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, पालक आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारसोबत झालेल्या या सामंजस्य करारामुळे ‘नशामुक्त युवा – सशक्त समाज – विकसित भारत’ या उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार असून, नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी DJJSच्या जनजागृती उपक्रमांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
लातूर जिल्ह्यातही जनजागृतीला चालना
या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी व नागरिकांमध्ये नशाविरोधी जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी DJJS लातूर–अंबाजोगाई शाखेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे. नशामुक्त आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन साध्वी सुश्री अन्नपूर्णा भारती जी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment