Monday, September 14, 2026

परळी-बीड महामार्गावर रस्तारोको! खांब तोडून वीजपुरवठा बंद पाडला, दोन गावांत वाद चिघळला.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : पांगरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधून होणाऱ्या वीजपुरवठ्यावरून पांगरी आणि तळेगाव या दोन गावांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर वेगवेगळे रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

तळेगाव ग्रामस्थांचा आरोप: हातोड्याने खांब तोडले, गाव अंधारात

तळेगावचा वीजपुरवठा पांगरी ३३ केव्ही सबस्टेशनमधून येणाऱ्या स्वतंत्र फिटरद्वारे केला जातो. मात्र, अज्ञात व्यक्तींनी रविवारी सकाळी या फिटरच्या तारा काढून आणि विद्युत खांब तोडून वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून गाव अंधारात असून शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तळेगावच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. स्वतःच्या गावातील शेतीसाठी वीज मिळावी म्हणून पांगरीतील काही व्यक्तींनी हा प्रकार केल्याचा आणि हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप तळेगावच्या सरपंचांनी केला आहे. याप्रकरणी महावितरण व परळी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पांगरी ग्रामस्थांचाही अडीच तास रस्ता रोको
दुसरीकडे, पांगरी (गोपीनाथ गड) येथील ३३ केव्ही सबस्टेशन १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बंद असल्याने पांगरीसह परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळातच ३३ केव्ही वीजवाहिनीवर एका व्यक्तीने मुद्दाम बिघाड (फॉल्ट) केल्याचा आरोप करत पांगरीचे ग्रामस्थही रस्त्यावर उतरले. त्यांनी सकाळी १०.३० ते १२.४५ दरम्यान रस्ता रोको आंदोलन करत दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

महावितरणच्या तपासणीत खांब तोडल्याचे उघड; पोलिसांचा कडक बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, सहायक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके, पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोणे यांच्यासह १५ पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान, महावितरणच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, पांगरी येथील काही व्यक्तींनी हातोड्याच्या साहाय्याने तळेगाव गावठाणाच्या ११ केव्ही वीजवाहिनीचे तीन खांब तोडल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विशाल खंडारे यांनी दिली

No comments:

Post a Comment