Saturday, September 5, 2026

नांदूरघाटमध्ये रोहयोत कोट्यवधींची लूट.ग्रामपंचायत अधिकारी,सहाय्यकावर गुन्हा; सरपंचांनी भरले ३३ लाख.



केज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील गोरगरीब मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला (MGNREGA) भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केज तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीत तब्बल १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा महाअपहार झाल्याचे प्रशासकीय चौकशी समितीच्या सखोल तपासणीत निष्पन्न झाले आहे. या महाघोटाळ्यात दोषी ठरलेल्या पाचही जणांना अपहाराची रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी सरपंच व अभियंत्यांनी स्वतःच्या वाट्याची रक्कम जमा केली; मात्र ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपयांची रक्कम न भरल्याने ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामरोजगार सहाय्यक या दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चौकशी समितीचा अहवाल; ५ जणांवर ठेवला होता ठपका
नांदूरघाट ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या विकासकामांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीने कागदपत्रे आणि प्रत्यक्ष कामांची तपासणी केली असता, १ कोटी ३ लाख ८९ हजार रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले. समितीने सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, शाखा अभियंता आणि तांत्रिक अधिकारी या सर्वांना जबाबदार धरून प्रत्येकाच्या वाट्याची अपहाराची स्वतंत्र रक्कम निश्चित केली होती. ही रक्कम ८ दिवसांच्या आत शासकीय खात्यात जमा न केल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा कारणे दाखवा नोटीशीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला होता.

सरपंचांनी भरले ३३ लाख; तिघांची कारवाई तूर्त टळली. 
प्रशासनाने फौजदारी कारवाईचा बडगा उगारताच तिघांनी तातडीने हात जोडून अपहाराची रक्कम जमा केली:

सरपंच सुनीता युवराज जाधव: यांनी सर्वाधिक ३३ लाख १५ हजार १४७ रुपये भरले.

तांत्रिक अधिकारी आर. आर. दराडे: यांनी ८ लाख ७ हजार ५९९ रुपये जमा केले.
शाखा अभियंता व्ही. एम. सासवडे: यांनी ४ लाख १५ हजार १५३ रुपयांचा भरणा केला.
या तिघांनी एकूण ४५ लाख ३७ हजार ८९९ रुपये ग्रामपंचायतीच्या मग्रारोहयो बँक खात्यामध्ये अधिकृतरीत्या जमा केल्याने त्यांच्यावरील तात्काळ कारवाई तूर्त टळली आहे.

No comments:

Post a Comment