Wednesday, September 16, 2026

महावितरणच्या भोंगळा.निष्काळजी कारभारामुळे निष्पाप शेतकऱ्याचा बळी.


केज (प्रतिनिधी) : महावितरणच्या भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे केज तालुक्यातील जीवाचीवाडी शिवारात आणखी एका निष्पाप शेतकऱ्याचा नाहक बळी गेला आहे. खातेदरा वस्ती येथे घराबाहेरील उघड्या विद्युत तारेचा जोरदार धक्का लागल्याने रामकिशन उर्फ अण्णा लक्ष्मण चौरे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि. १६) सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच याच गावात विजेच्या धक्क्याने एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.

गणेशोत्सवाचा कार्यक्रम संपवून घरी गेले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, रामकिशन चौरे हे मंगळवारी रात्री उशिरा १२.३० वाजेपर्यंत गावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून ते जीवाचीवाडी शिवारातील खातेदरा वस्तीवरील आपल्या घरी परतले. यावेळी अंधारात त्यांचा अचानक उघड्या विजेच्या तारेला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते जागीच कोसळले. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांना तातडीने विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनादरम्यान त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्याला विजेचा तीव्र धक्का बसल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक थोरात यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

१५ दिवसांत गावात दुसरा बळी; महावितरण कधी सुधारणार?
२८ ऑगस्टची दुर्घटना : श्रावण महिन्यात नारदस्वामी मंदिरात गंगेचे पाणी अर्पण करण्यासाठी गेलेल्या युवराज आसाराम चौरे (वय २२ वर्षे) या भाविकाचा तुटलेल्या उघड्या वायरचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला होता.
१६ सप्टेंबरची घटना : या घटनेला अवघे १५ दिवस उलटत नाहीत तोच रामकिशन चौरे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment