Thursday, July 30, 2026
परचुंडीच्या विकासकामांचे महापौर समीर राजूरकर यांच्याकडून कौतुक; उत्कृष्ट शेतीची केली पाहणी
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देते – प्राचार्य प्रा. अतुल दुबे
Tuesday, July 28, 2026
मा. प्राचार्य प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने यांना मातृशोक.
Sunday, July 26, 2026
बीडचे मा.शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना बोगस शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी अटक.
बीड (प्रतिनिधी) बीडचे माजी शिक्षणाधिकारी तथा प्रसिद्ध लेखक शशिकांत हिंगोणेकर यांना बोगस शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.2015 ते 2017 या काळात ते बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते, तत्पूर्वी त्यांनी जळगाव येथे हा शालार्थ आयडी घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.
१६० कोटी रुपयांच्या गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना पोलिसांनी धुळ्यातून अटक केली आहे. २०११ ते २०१५ या काळात जळगाव जिल्ह्यात पदावर असताना त्यांनी २५९ जणांना बनावट मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
हिंगोणेकर यांनी जळगाव मध्ये ज्याप्रमाणे घोटाळे करून बोगस शिक्षक भरतीला सहकार्य केले तशाच पद्धतीने त्यांनी बीडमध्ये देखील अनेक संस्थाचालक, कार्यवाह, सहकार्यवाह यांना मदत करून बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडी घोटाळा केला असून त्याचा तपास सुरु झाला आहे.
१६० कोटी रुपयांच्या गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना पोलिसांनी धुळ्यातून अटक केली आहे. २०११ ते २०१५ या काळात जळगाव जिल्ह्यात पदावर असताना त्यांनी २५९ जणांना बनावट मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Wednesday, July 22, 2026
विद्यार्थ्यांमध्ये त्वचेच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये त्वचारोग जनजागृती व्याख्यान संपन्न
ग्राहक बनून दुकानात शिरलेल्या बुरखाधारी महिलांची हातचलाखी.सराफा दुकानातून सोन्याच्या दागिन्यांचा अख्खा बॉक्सच पळवला.
केज (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील केज शहरातील गजबजलेल्या सराफा लाईन परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि भन्नाट हातचालाखीची चोरीची घटना समोर आली आहे. ग्राहक बनून दुकानात शिरलेल्या तीन अज्ञात बुरखाधारी महिलांनी ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ४ गंठण असलेला संपूर्ण बॉक्स सुवर्णकाराची नजर चुकवून अत्यंत शिताफीने लंपास केला. १ जुलै रोजी घडलेला हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमुळे तब्बल २० दिवसांनंतर उघडकीस आला असून, याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात तीन बुरखाधारी महिलांविरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ जुलैची घटना; ५ लाख ९९ हजारांचे ४७ ग्रॅम सोने पळवले
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केज येथील उमरी रोडवर राहणारे सुवर्णकार प्रदीप विजयकुमार रुद्रवार यांचे सराफा लाईनमध्ये दुकान आहे. १ जुलै २०२६ रोजी दुपारी दीड ते तीन वाजेच्या सुमारास तीन बुरखाधारी महिला सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. त्यांनी वेगवेगळे दागिने पाहण्याचा बनाव केला. याच दरम्यान सुवर्णकाराची नजर चुकवून त्यांनी दुकानातील काउंटरवर ठेवलेला ४७ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या गंठणचा बॉक्स चोरून नेला. आजच्या प्रति ग्रॅम १२ हजार ७६५ रुपये दराने या चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत ५ लाख ९९ हजार ९५५ रुपये आहे.
स्टॉक मोजताना ४ गंठण कमी भरले
ही चोरी इतक्या शिताफीने करण्यात आली होती की घटनेच्या वेळी दुकानदाराच्या ही गोष्ट अजिबात लक्षात आली नाही. १५ जुलै रोजी दुकानातील शिल्लक राहिलेल्या दागिन्यांच्या नियमित स्टॉकचे मोजमाप करत असताना ४ सोन्याचे गंठण कमी भरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दुकानदाराने संशय येऊन मागील सर्व दिवसांचे तारीखनिहाय सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली. १ जुलैचे फुटेज पाहताना दुपारी आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी तो सोन्याचा बॉक्स हळूच उचलून आपल्याजवळ लपवल्याचे स्पष्ट दिसले.
२० दिवसांच्या विलंबानंतर केज पोलिसांत गुन्हा नोंद
या चोरीबाबत बोलताना फिर्यादी सुवर्णकार प्रदीप रुद्रवार यांनी बोलताना सांगितले की, "चोरी १ जुलै रोजी झाली असली तरी १५ जुलैला स्टॉक मोजताना दागिने कमी आढळले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्यात आणि तांत्रिक माहिती गोळा करण्यात वेळ गेल्याने फिर्याद देण्यास २० दिवसांचा उशीर झाला." सुवर्णकाराच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी मंगळवारी, २१ जुलै रोजी रात्री ८:०० वाजता तीन अज्ञात बुरखाधारी महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. केज पोलीस ठाण्याचे पथक आता परिसरातील इतर दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित महिलांच्या हालचालींचा कसून तपास करत आहे.
महिलेच्या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून हॉटेल व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या.
केज (प्रतिनिधी): एका डोकेदुखी ठरलेल्या महिलेच्या सततच्या मानसिक त्रासाला, फोनवरील शिवीगाळ आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने लातूरमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील सोनीजवळा येथील रहिवासी असलेले प्रकाश नानासाहेब भांडवलकर (४१ वर्षे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून लातूरच्या एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेच्या अवघ्या काही तासांतच आरोपी महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
आधीच केज पोलिसांत दाखल केला होता अर्ज
पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिकृत एफआयआर दस्तऐवजातील माहितीनुसार, मृत प्रकाश भांडवलकर हे लातूर शहरातील एम.आय.डी.सी. परिसरात हॉटेल व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी नोकरीनिमित्त माजलगाव येथे राहत असल्याने प्रकाश हे लातूरमधील श्रीनगर भागात भाड्याच्या खोलीत एकटेच वास्तव्यास होते. हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची ओळख रुपाली गरड उर्फ रुक्मिणी सुधीर अंधारे (रा. श्रीनगर, एम.आय.डी.सी., लातूर) या महिलेशी झाली होती. ओळख झाल्यानंतर सदर महिलेने प्रकाश यांच्या कौटुंबिक अडचणींचा फायदा घेत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून सतत शिवीगाळ करणे, धमकी देणे व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. या छळाला कंटाळून भांडवलकर कुटुंबाने १९ मे २०२६ रोजी केज पोलीस ठाण्यात यापूर्वीच तक्रार अर्ज दाखल केला होता.
"पप्पू शेठ गेलाय, लातूरला या!"; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
त्यानंतरही आरोपी महिलेचा त्रास सुरूच राहिला. रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०४ वाजेच्या सुमारास आरोपी महिला रुपाली अंधारे हिने थेट प्रकाश यांच्या ६५ वर्षीय वृद्ध वडिलांना फोन केला आणि "पप्पू शेठ गेला आहे, तुम्ही तात्काळ लातूरला या," असे थंडपणे सांगून फोन कट केला. ही बातमी ऐकताच भांडवलकर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने गाडी करून लातूर गाठले. श्रीनगर भागातील खोलीत पोहोचले असता प्रकाश हे जमिनीवर मृतावस्थेत आढळले. उपस्थितांच्या आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
आरोपी महिला रुपाली अंधारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात
आपला ४१ वर्षांचा तरुण मुलगा गमावल्यानंतर सोनीजवळा येथील ६५ वर्षीय वृद्ध पिता नानासाहेब मनोहर भांडवलकर यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लातूरच्या एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आरोपी महिला रुपाली गरड उर्फ रुक्मिणी सुधीर अंधारे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक (PSI) अजय पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना माहिती दिली की, "आत्महत्यूस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी महिला रुपाली अंधारे हिला पोलिसांनी शोध घेऊन तात्काळ अटक केली असून, तिची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे."
मतदार SIR पूर्ण करा, आपले मतदानाचे हक्क सुरक्षित ठेवा ! - सौ.वर्षा मगर
अनंतअप्पा (बाप्पा) जुजगर यांचे निधन पुरुषोत्तम जुजगर यांना पितृशोक
Monday, July 20, 2026
परळीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय गौरव मा. किरणकुमार गित्ते साहेब IAS यांच्या नागरिक सत्कारला उस्फूर्त प्रतिसाद.आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते गौरव.
कलयुगात देवाचीही फसवणूक! पुरुषोत्तमपुरीत भाविकांनी दान केलेली सव्वाकिलो चांदी निघाली 'डुप्लिकेट'!
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त महिनाभर चाललेल्या यात्रोत्सवात ५० लाख भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी १ कोटी ४७ लाख रुपयांचे रोख दान, ९ ग्रॅम सोने आणि ४४६ ग्रॅम चांदी देवस्थानला भरभरून अर्पण केली. तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली, तरी दान केलेल्या चांदीच्या वस्तूंमध्ये चक्क देवाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाविकांनी अर्पण केलेल्या मूर्ती आणि धोंड्यांमध्ये जवळपास सव्वाकिलो चांदी पूर्णपणे 'डुप्लिकेट' आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे. येथे चक्रतीर्थ असल्याची आख्यायिका असल्याने अधिक मासात गोदावरी स्नान आणि भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाला भाविक मोठी गर्दी करतात. यंदा १७ मे ते १५ जूनदरम्यान झालेल्या अधिक महिन्यात देशभरातून लाखो भाविक येथे आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर महिनाभर गजबजून गेला होता. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने भाविकांनी पेटीत आणि गोदाकाठावर सढळ हस्ते दान केले. या यात्रोत्सवानंतर देवस्थानला अर्पण आलेल्या वस्तूंची मोजदाद आणि तपासणी करण्यात आली. त्यावेळी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या विविध देवांच्या मूर्ती आणि धोंड्यांच्या रूपात आणलेली सव्वाकिलो चांदी ही वापरण्यायोग्य नसून ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
धोंडा अन् मूर्तींच्या रुपात फसवणूक!
अधिक मासात जावयाला किंवा देवाच्या नावाने 'धोंडा' देण्याची आणि देवाच्या मूर्ती दान करण्याची जुनी परंपरा आहे. याच परंपरेचा गैरफायदा घेत काही दुकानदारांकडून फसवणूक झालेल्या भाविकांनी अनवधानाने ही बनावट चांदी देवाच्या चरणी अर्पण केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सव्वाकिलो बनावट चांदीमध्ये अनेक देवांच्या मूर्तींचीही चांदी समाविष्ट आहे.
मंदिर प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पोलिस, आरोग्य आणि महसूल प्रशासनाच्या उत्तम समन्वयामुळे आणि सहकार्यामुळे हा भव्य यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडला. भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने सढळ हस्ते अर्पण केले आहेत.
- विजय गोळेकर, अध्यक्ष, मंदिर समिती
बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर े भीषण अपघात भरधाव कारने दुचाकी स्वारांना हवेत उडवले; सख्ख्या भावांसह वडील-मुलगा गंभीर जखमी .
कडा (प्रतिनिधी): बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अतिवेगामुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज पुन्हा एकदा एका बेजबाबदार कार चालकामुळे महामार्गावर भीषण रक्ताळलेला थरार पाहायला मिळाला. कड्यावरून अहिल्यानगरच्या दिशेने वायूवेगाने जाणाऱ्या एका लक्झरी कारने समोरून कड्याच्या दिशेने येत असलेल्या दोन वेगवेगळ्या दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, दोन्ही दुचाकींवरील चारही प्रवासी रस्त्यावर दूरवर फेकले गेले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सोमवार, २० जुलै रोजी सकाळी ठीक ९:३० वाजण्याच्या सुमारास कडा येथील कर्डिले वस्ती परिसरात घडला.
पाण्याच्या प्लांटवर जाणारे शिरोळे बंधू अन् मुलाला शाळेत सोडणारे देसाई पिता-पुत्र जखमी
आष्टी तालुक्यातील कडा पोलीस चौकीच्या हद्दीतून मिळालेल्या अधिकृत अपघाती दस्तऐवजानुसार, कडा येथील रहिवासी असलेले आदित्य किसन शिरोळे (वय २१ वर्षे) आणि त्याचा सख्खा लहान भाऊ अभिषेक किसन शिरोळे (वय १९ वर्षे) हे दोघे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या एम.एच १७, आर. ९४२० (MH 17 R 9420) क्रमांकाच्या दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याच्या प्लांट कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी साबलखेड येथील रहिवासी विनायक देसाई (वय ४० वर्षे) हे आपला ११ वर्षांचा लहान मुलगा संकेत विनायक देसाई याला एम.एच ०६, बी.के. २३८३ (MH 06 BK 2383) क्रमांकाच्या दुचाकीवर बसवून कडा येथील शाळेत सोडण्यासाठी जात होते.
कार चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले; सीसीटीव्ही फुटेजवरून कारचा अतिवेग उघड
हे चारही जण कर्डिले वस्तीजवळ आले असता, कड्याकडून अहिल्यानगरकडे अतिशय वेगवान गतीने जाणाऱ्या कार क्रमांक एम.एच १२, जे.सी. १०८७ (MH 12 JC 1087) वरील चालकाचे अचानक स्टेअरिंगवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. नियंत्रण सुटलेली ही कार महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला घुसली आणि तिने या दोन्ही दुचाकींना समोरून जोरदार उडवले. या भीषण धडकेत कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला असून चारही जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने कडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हा संपूर्ण अपघात महामार्गालगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, कारचा वेग प्रचंड असल्याने अपघात किती भयानक होता, हे फुटेजवरून स्पष्ट दिसत आहे.
अपघाताची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी व तपास पथकाने तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त दुचाकी आणि कार बाजूला सारून पोलिसांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. कार चालकाविरुद्ध हलगर्जीपणा आणि अतिवेगाने वाहन चालवून लोकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जखमींवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून कडा परिसरातील नागरिकांनी या महामार्गावर गतिरोधक बसवण्याची आग्रही मागणी केली आहे.
Friday, July 17, 2026
माजलगावात घाणीचे साम्राज्य एक महिन्यापासून स्वच्छता ठप्प.३! दिवसांत माजलगाव स्वच्छ करा, मुख्याधिकारी नगराध्यक्षांना न्यायालयाने झापले.
माजलगाव (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेकडून मागील एक महिन्यापासून स्वच्छतेचे काम बंद असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता येथील न्यायालयानेनगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून चांगलेच झापले. तीन दिवसात स्वच्छता न केल्यास नगराध्यक्षसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे वृत्त आहे.
येथील नगरपालिकेने एक महिन्यापासून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना मलेरिया झाल्याने त्यांनी गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील नगराध्यक्षा शिफा बिलाल चाऊस, उपाध्यक्ष सहाल चाऊस, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सुपरवायझर, प्रभाग सात मधील नगरसेवकांना बोलावून घेतले. आणि स्वच्छतेबाबत प्रश्न विचारले परंतु कोणालाही व्यवस्थित उत्तरे न देता आल्याने तीन न्यायाधीशांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना झापले. ही चर्चा न्यायालयाच्या आवारात दिसून आली.
अन्यथा गुन्हे दाखल करू
तीन दिवसात शहराची स्वच्छता न केल्यास नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे करण्याची आदेश न्यायालयाने दाखल दिल्याचे वृत्त आहे यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांना देखील फोन द्वारे संपर्क केला परंतु त्यांचा संपर्क झाला नाही.
Thursday, July 16, 2026
लातूरमध्ये खळबळ: प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.मेहुल राठोड यांचे निधन.स्वतःच्या चार चाकी गाडीत ते मृतावस्थेत आढळले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीपूर्वी न.प.कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बाल विवाह पती, सासू-सासऱ्यांसह आई-वडिलांवर पोक्सो गुन्हा.
केज (प्रतिनिधी): केज शहरातील एका भागात राहणाऱ्या आणि केवळ आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा दोन महिन्यांपूर्वी बळजबरीने बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या छळाची दखल घेत मुंबई आणि केज पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. पिडीतेचा छळ करणारा नराधम पती, तिचे सासू-सासरे आणि स्वतःचे जन्मदाते आई-वडील यांच्यासह इतर नातेवाईकांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात बुधवारी, १५ जुलै रोजी रात्री ८:०० वाजता बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि अत्यंत कडक अशा पोक्सो (POCSO) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिकृत गुन्ह्याच्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत मुलगी ही पूर्णपणे अल्पवयीन आहे हे स्पष्ट माहिती असताना देखील तिच्या नातेवाईकांनी ९ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी केज येथे हा बालविवाह लावून दिला होता. लग्न करून सासरी पाठवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पिडीत अल्पवयीन मुलीचा छळ सुरू झाला. पतीने वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पिडीतेला अमानुष शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून पिडीतेने मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे धाव घेतली होती.
चेंबूर महिला व बाल विकास विभागाची धाव; 'झिरो एफआयआर' द्वारे केज पोलिसांत गुन्हा वर्ग
पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने आणि तिच्यावर अत्याचार झाल्याने चेंबूर उपनगर (मुंबई) येथील जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत विभागाच्या संरक्षण अधिकारी नेहा नितीन पेंडणेकर यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. त्यांच्या कायदेशीर पुढाकाराने आणि फिर्यादीवरून प्रथमता मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने (Zero FIR) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी आणि घटनास्थळाच्या कार्यक्षेत्रानुसार बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता केजचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तात्काळ चक्रे फिरवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलीस तपासाच्या अधिकृत माहितीनुसार, या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी पती, सासरा, सासू यांच्यासह पिडीत मुलीचे जन्मदाते आई-वडील इतर नातेवाईक अशा एकूण ५ पेक्षा जास्त जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला व बाल गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या सूचनेनुसार, केज पोलीस ठाण्याच्या विशेष 'पिंक पथकाचे' प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेश नेटके यांच्याकडे या संवेदनशील गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला असून पोलीस संशयितांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांचा छापा. १लाख ४ हजाराचा गुटखा जप्त;गुटखा माफियाला स्थानिक गुन्हे शाखेचा दणका.
बीड(प्रतिनिधी) गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर राज्य सरकारने बंदी घातली असताना देखील बीड शहर व जिल्ह्यात गुटखा राजरोज विक्री व वाहतूक केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पेठ बीड पोलिसांनी गेल्या आठ दिवसात गुटख्यावर दोन कारवाया करत लाखोचा गुटखा व वाहने जप्त करुन गुटखा माफिया पर गुन्हा दाखल करण्यात आला होता तरीही याच पोलीस ठाणे हद्दीतच गुटखा विक्री होत असल्याने पेठ बीड हे गुटक्याचे “हॉटस्पॉट” बनले आहे का? असा सवाल उपस्थित होत असून गुटखा माफियाचे “पाळेमुळे”पोलिसांनी उखडून टाकावे.
बीड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई करत पेठ पोलीस ठाणे हद्दीतील मोहम्मदिया कॉलनी, मोमीनपुरा परिसरातून ₹1,04,840 किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या कारवाईदरम्यान आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेला.
दिनांक 15 जुलै रोजी अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सायंकाळी 6.15 वाजता मोहम्मदिया कॉलनी येथे एका घरात गुटखा विक्रीसाठी ठेवली असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला.
छाप्यावेळी संशयित शहबाज अब्दुलरजाक मोमीन हा मोमीनपुरा भागात गुटख्याच्या दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांना पाहताच त्याने गोण्या जागीच टाकून घराच्या मागील दरवाजातून पलायन केले. पंचांसमक्ष गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा-1000, विमल पान मसाला, के.एन.-01 जाफराणी जर्दा, रॉयल 220 तंबाखू, रॉयली 717 टोबॅको आणि V-1 टोबॅको आदी विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी एकूण ₹1,04,840 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. उर्वरित मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शहबाज अब्दुलरजाक मोमीन, रा. मोहम्मदिया कॉलनी, मोमीनपुरा, बीड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 274 व 275 अन्वये पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम त्यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शेखर औटी,पो. ह.अशोक दुबाले,पो.ह.गोविंद राख,अंकुश वरपे,महिला पो. ह.स्वाती मुंडे,तसेच पोलीस अंमलदार बबन सलगर, मनोज परजणे,पो.अं.अशफाक अन्सार, सुनील राठोड यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
Wednesday, July 15, 2026
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची केंद्रीय पथकाकडून सखोल तपासणी.
केंद्रीय समितीकडून जिल्ह्यातील नवनिर्मित सिमेंट रस्त्यांची अत्यंत कडक आणि तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली असून, यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांतच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने आणि कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण पथकाने बीड गाठले आहे.
या तपासणीदरम्यान पथकाकडून अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने सिमेंट रस्त्यांचे ठिकठिकाणचे गोलाकार भाग कापून बाहेर काढले जात आहेत. रस्ता खोदून काढलेले हे सॅम्पल्स थेट प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
फौजदारी गुन्हे दाखल होणार का?
तपासणीमुळे बोगस काम करणाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. या सखोल चौकशीचा अहवाल थेट केंद्रीय मंत्रालयाला सादर केला जाणार असून, दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत टाकणे) कारवाई होणार का व फौजदारी गुन्हे दाखल होणार का? याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ दर्शनासोबत अन्नसेवेचा पवित्र संगम; ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’मध्ये दररोज हजारो भाविकांना मोफत भोजनप्रसाद.
Tuesday, July 14, 2026
तहसीलदार राकेश गिड्डे मृत्यू प्रकरणात घातपाताची शंका मागे, नातेवाइकांच्या निर्णयामुळे चर्चा.
केज (प्रतिनिधी) : येथील तत्कालीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनाचा तपास लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण केला आहे. सुरुवातीला या प्रकरणावर गंभीर शंका उपस्थित करणाऱ्या गिड्डे यांच्या नातेवाइकांनी आता 'हा घातपात नसून अपघातच आहे' असा यू-टर्न घेतल्याने केज तालुक्यात व महसूल वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
मोबाइलच्या 'सीडीआर'वरून २८ जणांचे जबाब.
तपासादरम्यान तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या मोबाइलच्या सीडीआरवरून (कॉल डिटेल रेकॉर्ड) अनेक बाबी तपासण्यात आल्या. अपघातापूर्वीच्या दोन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या २८ हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब लातूर स्थानिक गुन्हे शाखेने नोंदवले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी दिली.
अपघातानंतर तहसीलदार गिड्डे यांच्या कारमधील मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप गायब झाले असून त्यांचा तपास अजूनही लागलेला नाही. अपघात स्थळाशेजारीच नेहरूनगर तांडा असून, तेथील काही नागरिकांनी हे साहित्य घेतले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लॅपटॉपमध्ये अद्याप सिमकार्ड टाकण्यात आलेले नाही; ते टाकले जाताच त्याचा माग काढता येईल, त्यामुळे हा तपास सध्या गुलदस्त्यात आहे.
डाव्या बाजूच्या सातही बरगड्या तुटल्या होत्या
राकेश गिड्डे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारे रेणापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल हाडबे यांनी सांगितले की, अपघातामध्ये गिड्डे यांच्या पूर्ण डाव्या बाजूला गंभीर मार लागला होता. त्यांच्या डाव्या बाजूच्या सातही बरगड्या तुटल्या होत्या, तर डाव्या बाजूचा कानही तुटला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नाक आणि कानातून मोठा रक्तस्त्राव झाला होता. या अपघाताचा अंतिम विसेरा अहवाल लातूर एलसीबीकडे प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Monday, July 13, 2026
अंबाजोगाईत खळबळ.तथागत चौकात शाळेच्या सेवकाचा मृतदेह. घातपात की अपघात? पोलीस तपास सुरु.
Sunday, July 12, 2026
आंदोलनात सहभागी ८ हजार ६०० शिक्षकांची पगार कपात. शिक्षण विभागा कडून माहिती गोळा करण्यास सुरुवात.
मुंबई (प्रतिनिधी) आझाद मैदानात ९ जुलै २०२६ रोजी झालेल्या 'शाळा बंद' आंदोलनाने महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रात खळबळ उडवली आहे. शालेय शिक्षण विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार राज्यभर १ हजार ४६६ शाळा बंद राहिल्या, तर ८ हजार ६०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी.झाले.त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली असून सहभागी शिक्षकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची तयारी केली जात आहे. शिक्षण विभागाने आंदोलनात भाग घेणाऱ्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापण्याची घोषणा केली होती, तरीही हजारो शिक्षकांनी 'वेतन कापले तरी मागे हटणार नाही' अशी भूमिका घेत आंदोलनात भाग घेतला.
शिक्षण विभागाने आंदोलनातील सहभागी व्यक्तींची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. लवकरच कारवाईचे पुढील टप्पे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. या घटनेने शिक्षक आणि शासन यांच्यातील संबंध ताणले गेले असून, भविष्यात अशा आंदोलनांची मालिका सुरू राहू शकते. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि शिक्षकांच्या मागण्यांचा समतोल साधण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहेआंदोलनामागील मुख्य कारणे म्हणजे टीईटी परीक्षेच्या जाचक अटी, रखडलेल्या पदोन्नती, संचमान्यता धोरणातील बदल आणि बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामांचा शिक्षकांवर लादलेला अतिरिक्त भार. शिक्षक संघटनांनी यासंदर्भात अनेकदा शासनाकडे मागणी केली होती, परंतु तोडगा न निघाल्याने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो शिक्षक एकत्र आले, तर जिल्हा पातळीवरही मोर्चे आणि धरणे आंदोलने झाली. ६० टक्क्यांहून अधिक शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा देखील समोर आला आहे.
शिक्षण संचालनालयाने आंदोलनापूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता की, आंदोलनात सहभागी होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई केली जाईल. विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना सहभागी शिक्षकांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले. शिक्षक संघटनांनी मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत विरोध दर्शवला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली असून, शासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या.घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री घडलेल्या हत्येच्या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाल्याने ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय 21, रा. पट्टीवडगाव) या तरुणाचा धारदार चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काय घडले?
प्राथमिक माहितीनुसार, घाटनांदूर येथील साठे चौकात काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संशयितांनी ज्ञानेश्वर वाकडे याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृत तरुण कोण होता?
मृत ज्ञानेश्वर वाकडे हा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील रहिवासी होता. तो गेल्या वर्षभरापासून लातूरजवळील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये 'कूक' (आचारी) म्हणून काम करत होता. सुट्टीसाठी तो आपल्या गावी आला होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटना नेमकी कुठे आणि कधी घडली?
ही घटना शनिवारी (11 जुलै) रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावातील साठे चौकात घडली. ज्ञानेश्वर आपल्या मोटारसायकलवरून अंबाजोगाईहून घाटनांदूरकडे जात असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे.हल्ला कसा झाला?
ज्ञानेश्वर आपल्या दोन मित्रांसह मोटारसायकलवरून प्रवास करत होता. साठे चौकात काही जणांशी त्यांचा वाद झाला. वादानंतर संशयितांनी चाकू काढून ज्ञानेश्वरवर अनेक वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला. मात्र दुसरा मित्र हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वादाचे कारण काय?
प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र नेमका वाद कशामुळे झाला आणि त्यामागील कारण काय होते, याचा सखोल तपास सुरू आहे. पोलिस घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.पोलिसांची पुढील कारवाई
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ज्ञानेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. नातेवाईकांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.या घटनेमुळे घाटनांदूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे