Monday, July 20, 2026

परळीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय गौरव मा. किरणकुमार गित्ते साहेब IAS यांच्या नागरिक सत्कारला उस्फूर्त प्रतिसाद.आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते गौरव.

परळी वैजनाथ (प्रतिनिध )परळी वैजनाथच्या भूमीतून घडलेले आणि आज देशातील उल्लेखनीय सनदी अधिकाऱ्यांमध्ये मानाचे स्थान मिळविणारे आयएएस किरणकुमार गित्ते यांचा नागरी गौरव सोहळा रविवारी उत्साहात व दिमाखात पार पडला. त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले आणि परळीकरांनी आपल्या भूमिपुत्राचा अभिमानाने गौरव केला. अल्पावधीतही प्रदीप खाडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाची सर्वांकडून प्रशंसा

          परळी वैजनाथचे भूमिपुत्र तथा त्रिपुरा केडरचे वरिष्ठ सनदी अधिकारी आयएएस किरणकुमार गित्ते यांची त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्री यांचे सचिव (Secretary to the Chief Minister) म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल परळी शहरात रविवारी भव्य नागरी गौरव व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते किरणकुमार गित्ते व त्यांच्या पत्नी सौ. उषाताई गित्ते यांचा मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी औक्षण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण उत्साहमय झाले. अल्पावधीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असतानाही स्टेज, बैठक व्यवस्था, मान्यवरांचे स्वागत व संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन हे आयोजक तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. 
         यावेळी बोलताना आ. धनंजय मुंडे म्हणाले, "किरणकुमार गित्ते यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा आम्हाला सदैव आनंद, गौरव आणि अभिमान आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने कठोर परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर भारतीय प्रशासकीय सेवेत मानाचे स्थान मिळविले आहे. त्यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे." सत्काराला उत्तर देताना आयएएस किरणकुमार गित्ते म्हणाले, "परळीकरांनी दिलेले प्रेम, संस्कार आणि जडणघडण यामुळेच लोकसेवेचे कार्य माझ्या हातून घडत आहे. माझ्यावर दाखविलेल्या या प्रेमाबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे."
यानंतर परळी शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना, शैक्षणिक संस्था, पत्रकार, डॉक्टर, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने किरणकुमार गित्ते यांचा सत्काराचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव शिरसाट ,तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, उपनगराध्यक्ष राजाखान, माजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, डॉ. सूर्यकांत मुंडे, माजी सभापती भास्कर चाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, ॲड. गोविंद फड, दिनकर मुंडे गुरुजी, डॉ. सुरेश चौधरी, विजयकुमार वाकेकर, किशोर गित्ते,  माधव मुंडे ,रामेश्वर महाराज कोकटे, नगरसेवक अनंत इंगळे, नगरसेवक हाजी बाबू, शंकर कापसे, अजय गित्ते, डॉ. दत्तात्रय गुट्टे, डॉ. बाळासाहेब कराड, डॉ. अजित केंद्रे, सुरेश टाक, समाधान मुंडे, विकास मुंडे, वैजनाथ कळसकर, कैलास तांदळे, श्रीकांत पाथरकर, रामेश्वर गुट्टे, दिलीप कराड, उद्धव आघाव , प्रा. तेजस तिडके, हरिष नागरगोजे, बंडू आघाव, अतुल दुबे, अनंत मुंडे सर, सौदागर कांदे, प्राचार्य श्रीकांत पाटील सर , यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद केंद्रे यांनी केले, तर आभार सुरेश नाना फड यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि परळीकरांनी आपल्या भूमिपुत्राच्या यशाचा अभिमानाने गौरव केला.

No comments:

Post a Comment