Wednesday, July 22, 2026

विद्यार्थ्यांमध्ये त्वचेच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये त्वचारोग जनजागृती व्याख्यान संपन्न

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)विद्यार्थ्यांमध्ये त्वचेच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, परळी वैजनाथ येथे त्वचारोग जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंबईतील नामांकित केईएम (KEM) हॉस्पिटलचे माजी विद्यार्थी व एम.डी. त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रोहित हाडबे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीचे प्रतिनिधी श्री. राजेश मेडपल्ली व श्री. व्यंकटेश शिर्शीकर तसेच शाळेचे प्राचार्य मा. श्री श्रीकांत पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.रोहित हाडबे व इतर मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदरील कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य मा.श्री श्रीकांत पाटील सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमांचे नियमित आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्तम आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा उद्देश व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित असलेले डॉ. हाडबे यांनी त्वचेची योग्य निगा, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, बुरशीजन्य संसर्ग, त्वचेची ऍलर्जी, मुरुम, उन्हापासून त्वचेचे संरक्षण तसेच किशोरवयीन मुलांमध्ये आढळणाऱ्या विविध त्वचारोगांबाबत वैज्ञानिक माहिती दिली. कोणत्याही त्वचारोगाकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावरील अपूर्ण माहिती किंवा घरगुती उपायांवर अवलंबून न राहता योग्य वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले.डॉ.हाडबे यांनी त्यांची समर्पक उत्तरे देत त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी दैनंदिन जीवनातील चांगल्या सवयींचे महत्त्व अधोरेखित केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आरोग्याविषयी सजग नागरिक घडविण्याच्या उद्देशाने दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमास शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब (आय.ए.एस. ) मुख्यमंत्री सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग, त्रिपुरा सरकार , विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रूपाली सावंत मॅडम यांनी केले, याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचारी वर्गानेही या व्याख्यानाचा लाभ घेतला.

No comments:

Post a Comment