अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील युवकाच्या खुनाची थरारक घटना ताजी असतानाच, आज सकाळी अंबाजोगाई शहरातील तथागत चौकात एका ४१ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की अपघात? याबाबतचे गूढ वाढले असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत युवकाचे नाव विवेक करपे (वय ४१) असे असून ते मूळचे केज तालुक्यातील जवळबन गावचे रहिवासी होते. सध्या ते केज येथे पत्नी मुलाबाळांसह वास्तव्यास होते. वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील एका खाजगी शाळेवर ते 'सेवक' (शिपाई) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, इयत्ता १० वीत शिकणारा मुलगा आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली होती.
आज सकाळी तथागत चौकात विवेक करपे यांचा मृतदेह पडलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करताना पोलिसांना मयताच्या खिशात ट्रॅव्हल्सचे तिकीट आढळून आले आहे. त्यामुळे ते केजवरून किंवा इतर ठिकाणाहून प्रवास करून अंबाजोगाईत आले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, विवेक करपे यांना दारूचे व्यसन होते, तसेच वर्षभरापूर्वी त्यांच्या पोटाचे एक मोठे ऑपरेशन देखील झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने किंवा प्रकृती बिघडल्याने झाला की यामागे काही घातपात आहे, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान या सेवकाला रात्री उशिरा एका खाजगी चारचाकी वाहनांचा धक्का लागला आणि त्यात तो मृत पावला अशी ही चर्चा आहे. अंबाजोगाई शहरात लागोपाठ घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत सर्वच शक्यता गृहीत धरून अंबाजोगाई पोलीस तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
No comments:
Post a Comment