केज (प्रतिनिधी): केज शहरातील एका भागात राहणाऱ्या आणि केवळ आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा दोन महिन्यांपूर्वी बळजबरीने बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या छळाची दखल घेत मुंबई आणि केज पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. पिडीतेचा छळ करणारा नराधम पती, तिचे सासू-सासरे आणि स्वतःचे जन्मदाते आई-वडील यांच्यासह इतर नातेवाईकांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात बुधवारी, १५ जुलै रोजी रात्री ८:०० वाजता बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि अत्यंत कडक अशा पोक्सो (POCSO) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिकृत गुन्ह्याच्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत मुलगी ही पूर्णपणे अल्पवयीन आहे हे स्पष्ट माहिती असताना देखील तिच्या नातेवाईकांनी ९ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी केज येथे हा बालविवाह लावून दिला होता. लग्न करून सासरी पाठवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पिडीत अल्पवयीन मुलीचा छळ सुरू झाला. पतीने वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पिडीतेला अमानुष शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून पिडीतेने मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे धाव घेतली होती.
चेंबूर महिला व बाल विकास विभागाची धाव; 'झिरो एफआयआर' द्वारे केज पोलिसांत गुन्हा वर्ग
पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने आणि तिच्यावर अत्याचार झाल्याने चेंबूर उपनगर (मुंबई) येथील जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत विभागाच्या संरक्षण अधिकारी नेहा नितीन पेंडणेकर यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. त्यांच्या कायदेशीर पुढाकाराने आणि फिर्यादीवरून प्रथमता मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने (Zero FIR) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी आणि घटनास्थळाच्या कार्यक्षेत्रानुसार बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता केजचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तात्काळ चक्रे फिरवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलीस तपासाच्या अधिकृत माहितीनुसार, या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी पती, सासरा, सासू यांच्यासह पिडीत मुलीचे जन्मदाते आई-वडील इतर नातेवाईक अशा एकूण ५ पेक्षा जास्त जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला व बाल गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या सूचनेनुसार, केज पोलीस ठाण्याच्या विशेष 'पिंक पथकाचे' प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेश नेटके यांच्याकडे या संवेदनशील गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला असून पोलीस संशयितांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
No comments:
Post a Comment