माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त महिनाभर चाललेल्या यात्रोत्सवात ५० लाख भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी १ कोटी ४७ लाख रुपयांचे रोख दान, ९ ग्रॅम सोने आणि ४४६ ग्रॅम चांदी देवस्थानला भरभरून अर्पण केली. तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली, तरी दान केलेल्या चांदीच्या वस्तूंमध्ये चक्क देवाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाविकांनी अर्पण केलेल्या मूर्ती आणि धोंड्यांमध्ये जवळपास सव्वाकिलो चांदी पूर्णपणे 'डुप्लिकेट' आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे. येथे चक्रतीर्थ असल्याची आख्यायिका असल्याने अधिक मासात गोदावरी स्नान आणि भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाला भाविक मोठी गर्दी करतात. यंदा १७ मे ते १५ जूनदरम्यान झालेल्या अधिक महिन्यात देशभरातून लाखो भाविक येथे आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर महिनाभर गजबजून गेला होता. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने भाविकांनी पेटीत आणि गोदाकाठावर सढळ हस्ते दान केले. या यात्रोत्सवानंतर देवस्थानला अर्पण आलेल्या वस्तूंची मोजदाद आणि तपासणी करण्यात आली. त्यावेळी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या विविध देवांच्या मूर्ती आणि धोंड्यांच्या रूपात आणलेली सव्वाकिलो चांदी ही वापरण्यायोग्य नसून ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
धोंडा अन् मूर्तींच्या रुपात फसवणूक!
अधिक मासात जावयाला किंवा देवाच्या नावाने 'धोंडा' देण्याची आणि देवाच्या मूर्ती दान करण्याची जुनी परंपरा आहे. याच परंपरेचा गैरफायदा घेत काही दुकानदारांकडून फसवणूक झालेल्या भाविकांनी अनवधानाने ही बनावट चांदी देवाच्या चरणी अर्पण केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सव्वाकिलो बनावट चांदीमध्ये अनेक देवांच्या मूर्तींचीही चांदी समाविष्ट आहे.
मंदिर प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पोलिस, आरोग्य आणि महसूल प्रशासनाच्या उत्तम समन्वयामुळे आणि सहकार्यामुळे हा भव्य यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडला. भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने सढळ हस्ते अर्पण केले आहेत.
- विजय गोळेकर, अध्यक्ष, मंदिर समिती
No comments:
Post a Comment