Tuesday, April 30, 2024

मराठा समाजाच्या रोषामुळे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची कोंडी.


माजलगाव (प्रतिनिधी) मराठा आरक्षणा चा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसत असून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना प्रचारासाठी गावात येताच सकल मराठा समाजाच्या युवकांनी रोखले. ही घटना लवूळ क्र.1 या ठिकाणी घडली. युवकांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत पंकजा मुंडे यांना सभास्थळी नेण्यात आले

मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका या निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. दरम्यान आज सकाळी 11 वाजता लवूळ येथे त्यांची सभा होती. या सभेमूळे सकाळपासूनच मराठा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाण मांडले. पंकजा मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा चौकात येताच युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी पंकजा मुंडे खाली उतरून सर्व युवकांना मराठा आरक्षणाबाबत आपला असलेला पाठिंबा याबाबत समजून सांगत होत्या. समजून सांगण्याचा प्रयत्न करूनही मराठा तरुण त्यांच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसू लागलं. तुम्ही बॉण्डवर मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे, असे लिहून द्या, असा आग्रह केला. मात्र पंकजा मुंडे यांनी बॉण्डवर लिहून देण्याच्या आग्रहाला बगल दिली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. मुंडे यांची गाडी सोडण्यात आली.


वीटभट्टीवरील मजुर महिलेचा पदर मशीन मध्ये अडकला गळ्याला फास बसुन दुर्दैवी मृत्यू.


आष्टी (प्रतिनिधी) वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलेचा चिखल कालवण्याच्या मशीनमध्ये माती टाकत असताना पदर अडकला.यामुळे गळफास लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील केरूळ येथे घडली. शांताबाई जयदेव जाधव वय 45 वर्ष असं मृत महिलेचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील मांडवा येथील जयदेव जाधव हे पत्नी शांताबाईसह मागील दोन वर्षांपासून केरूळ येथे एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत‌‌ आहेत. दरम्यान आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चिखल तयार करण्याच्या मशिनमध्ये माती टाकत असताना शांताबाई यांचा पदर अचानक मशिनमध्ये अडकला. यामुळे गळ्याभोवती फास बसला या दुर्घटनेत शांताबाई गंभीर जखमी झाल्या. अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात शांताबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. गेल्या वर्षी देखील अशीच दुर्दैवी घटना या वीट भट्टीवर घडली होती. वाळूज येथील मजुराचा चार वर्षीय मुलगा खेळत असताना अचानक ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला होता.


बीड लोकसभेच्या रिंगणात आता ४१ उमेदवार १४ उमेदवारांची माघार. चित्र स्पष्ट.

बीड : (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारांच्या अर्ज दाखल व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे बीड लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले असून बीडसाठी निवडणुकीच्या रिंगणात आता ४१ उमेदवार असून १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता उमेदवारांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात देखील झाली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. मात्र अर्जाची छाननी झाली तेव्हा १९ अर्ज बाद झाल्याने ५५ उमेदवार रिंगणात होते. या दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चार पक्षाच्या उमेदवारांसह १० अपक्ष अशा १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार आहेत. यामध्ये नोटांचा एक पर्याय असणार आहे. यासाठी एका बूथवर ३ ईव्हीएम लागणार आहे. २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात २१ लाख ४२ हजार ५४७ मतदारांची नोंदणी झाली असून हे मतदार आपला खासदार निवडणार आहेत.

१३ मे ला होणार मतदान 
दरम्यान बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे १३ दिवस उरले आहेत. आता लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून ४१ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात २ हजार ३५५ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी २५ ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये माजलगाव ६, गेवराई ३, परळी ३, केज ४, आष्टी ६ आणि बीड ३ असे चेकपोस्ट आहेत.

सेलु हादरलं! शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून.






सेलु (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे शेत जमीनच्या वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर धारदार शस्त्राचे वार करुन खून केल्याची घटना साेमवारी रात्री घडली. मधुकर मारोतराव मगर (वय ३८, रा.मोरेगाव) असे मृताचे नाव असून राजेभाऊ उर्फ अशोक मगर यास पाेलिसांनी अटक केल्याची माहिती दिली. 
सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वर मंदीरात जेवणाची पंगत चालू असताना ही घटना घडली. याप्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर (वय ३१) यांनी फिर्याद दिली‌. संशयित आरोपी राजेभाऊ याने मृताच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर, छातीच्या डाव्या बाजुस चाकुने हल्ला करुन त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे. 

पाेलिसांनी राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर (वय ४३ रा. मोरेगाव) याच्यावर सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. जमीन परत घेतल्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद होता, अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

या घटनेनंतर पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहेत