बीड (प्रतिनिधी) बीडच्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पार्किंगवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री दोन पार्किंगवरुन वाद सुरू झाला आणि रुग्णालयातील अपघात विभागातच दोन गट भिडले.
रात्री 10 च्या दरम्यान घडलेला हा राडा जवळपास 10 ते 15 मिनिटे चालला. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर परिचारकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान रुग्णालयाचे सुरक्षारक्षक अन पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले. याप्रकरणी दोन्ही गटातील 16 जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment