Tuesday, April 9, 2024

मांजरा धरणातील पाणीसाठा अवघा ६ टक्क्यावर; बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट गडद.

बीड (प्रतिनिधी) बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकटाचे ढग आता गडद होतांना पहायला मिळत आहेत. या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तीन जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे  बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरणातील पाणीसाठा दिवसाला झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आले आहे. यामुळे पाणी टंचाईची समस्या भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
यंदा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणी साथ देखील कमी होत चालला असल्याने राज्यातील अनेक भागात तर मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवत असून ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करून तहान भागविली जात आहे. तरीदेखील काही भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हीच परिस्थिती आता बीड जिल्ह्यात जाणवू लागली आहे. येथील मांजरा धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. 

मांजरा धरणात आज घडीला असलेला पाणीसाठा ६.३६ टक्क्यांवर आला आहे. उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने धरणात असलेला पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. अवघ्या ४ दिवसात तब्बल ०.८० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळं चालू एप्रिल आणि पुढील मे महिन्यात बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment