Saturday, May 16, 2026

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरात क्लासेस चालकाची सीबीआयकडून चौकशी.


लातूर (प्रतिनिधी) नीट पेपरफुटी प्रकरणात येथील एका महाविद्यालयाचा सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी (ता. १५) येथील एका क्लासेस चालकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी सकाळपासून या क्लासेस चालकाची त्यांच्याच फ्लॅटमध्ये सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने एनटीएला ही परीक्षाच रद्द करावी लागली आहे. या पेपरफुटीप्रकरणाचे लातूर कनेक्शन आले आहे. त्यामुळे दोन दिवसापूर्वी सीबीआयचे पथक येथे दाखल झाले होते. गुरुवारी (ता. १४) या पथकाने येथील एका महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांची चौकशी करुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुण्याला नेण्यात आले. तेथून त्यांना दिल्लीला नेण्यात आले आहे.

दरम्यान येथील आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात एका पालकाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. यात मोटेगावकर यांच्या सोशल मीडियावरील एका व्हीडीओचा संदर्भ देत गेसपेपरमधील ४० प्रश्न नीटच्या परीक्षेत कसे आले याची चौकशी करावी अशी मागणी या पालकाने केली होती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. यात त्यांनी मोटेगावकर यांच्यासह चौघांचा जवाबही घेतला होता. त्याचाही तपास सुरु आहे.

दरम्यान शुक्रवारी (ता. १५) सीबीआयचे पथक येथे आले. येथील सूतमिल परिसरात असलेल्या ओंकार अपार्टमेंटमधील प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या फ्लॅवटर हे पथक गेले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना देखील त्यांनी सोबत नेले. सकाळपासून मोटेगावकर यांची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीमुळे शहरातील इतर क्लासेस चालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. चौकशी करुन सीबीआयचे पथक पुढे काय करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment