परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एका हॉटेल चालकाची गळा चिरून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कारभारी नारायण आंधळे (राहणार- नंदागौळ, तालुका परळी) असे मृत पावलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. या थरारक हत्याकांडामुळे परळीत गुन्हेगारांचा सुळसुळाट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पैशांचा वाद विकोपाला गेला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी आंधळे हे परळी शहरात स्वतःचे हॉटेल चालवत होते. संशयित आरोपी सचिन राठोड आणि सुमित पवार यांच्यासोबत आंधळे यांचा गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. गुरुवारी मध्यरात्रीनंतर या कारणावरून पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी संतापाच्या भरात खिशातून धारदार चाकू काढून कारभारी आंधळे यांच्या मानेवर गंभीर वार केले.
हत्या केल्यानंतर चक्क आरोपीचाच मुलाला फोन!
या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि विचीत्र बाब म्हणजे, कारभारी आंधळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर मुख्य आरोपी सचिन राठोड याने पळ काढण्यापूर्वी थेट आंधळे यांचा मुलगा ओमकेश याला फोन लावला. फोनवर तो म्हणाला, "तुमच्या वडिलांवर वार झाले आहेत, ते तिथे पडलेत." हा फोन येताच मुलांनी आणि नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या वडिलांना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी मयताचा मुलगा ओमकेश कारभारी आंधळे याने दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमित पवार (दोघे राहणार- वसंतनगर तांडा, परळी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. शुक्रवार (२२ मे) रोजी दुपारी मयताचे मूळ गाव नंदागौळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहे.
No comments:
Post a Comment