परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी नगर परिषदेच्या दि. 30/04/2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत “प्रत्येक सोमवारी मांस विक्री बंदी” ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ प्रभू यांच्या पवित्र नगरीच्या भावना जपत घेतलेल्या या निर्णयाचे त्या वेळी शहरभर स्वागत करण्यात आले होते. विशेषतः अधिकमास प्रारंभ झाल्यामुळे भाविकांमध्ये या निर्णयाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त होत होत्या.
मात्र मंजुरीनंतर दि. 25/05/2026 रोजी चौथा सोमवार येत असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत आवश्यक ती प्रभावी कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नागरिकांच्या मते, अद्याप नगर परिषदेमार्फत वृत्तपत्रांमध्ये अधिकृत जाहीर प्रसिद्धी, व्यापाऱ्यांना स्पष्ट नोटीस, लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती किंवा सातत्यपूर्ण सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक भागांमध्ये सोमवारची मांस विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
याबाबत वेळोवेळी नगर परिषद प्रशासन, मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, गटनेते तसेच नगरसेवक-नगरसेविका यांना अभिनंदन संदेश, निवेदने, WhatsApp संदेश, ईमेल व स्मरणपत्रांद्वारे अंमलबजावणीची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष पातळीवर अधिक काटेकोर उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी पदभार स्वीकारताना “विकास पर्व 2.0” ची घोषणा करत शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मांडला होता. त्याच अनुषंगाने धार्मिक भावना, जनभावना आणि परळीच्या पवित्रतेशी संबंधित निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
परळी हे पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्यामुळे सोमवारचा दिवस भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ स्पष्ट आदेश, जनजागृती मोहीम, पोस्टर, जाहीर सूचना आणि आवश्यक प्रशासनिक कारवाई करून सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहरातील भाविक व नागरिकांकडून केली जात आहे.
श्री वैद्यनाथ प्रभू यांच्या पवित्र नगरीच्या सन्मानासाठी घेतलेला निर्णय केवळ कागदापुरता न राहता प्रत्यक्षात काटेकोरपणे राबविण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment