Tuesday, May 19, 2026

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हवेत! पुरुषोत्तमपुरीत ना सावली, ना पाणी; फक्त ओळखीच्यांनाच थेट दर्शन!'; उन्हात भाविकांचे हाल सीसीटीव्ही बंदच.


माजलगाव (प्रतिनिधी) : अधिक मास सुरू झाल्याने माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. लवकर दर्शनासाठी भाविकांना २०० रुपये शुल्काचे पास देण्यात आले. परंतु ओळखीच्या भाविकांना थेट दर्शनासाठी सोडले जाऊ लागल्यामुळे रांगेतील भाविकांना ५ तास रांगेत ताटकळत उभी राहण्याची वेळ आली. त्यातच ना सावली ना प्यायला पाणी यामुळे भाविकांचे हाल झाले.

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत अधिक मासाला सुरुवात हाेताच पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. उन्हातील सामान्य भाविकांना लवकर दर्शन व्हावे म्हणून देवस्थान समितीकडून २०० रुपये शुल्काचे पास देण्यात आले. परंतु काही वेळातच पासधारकात दर्शनावरून गोंधळ झाल्याने पास बंद करण्यात आले. सुरुवातीला आलेल्या भाविकांना पार्किंगसाठी दोन-तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. दूर होऊन भरउन्हात चालत यावे लागत असल्याने वृद्ध, महिला, बालके यांचे हाल झाले. या ठिकाणी पार्किंगसाठी शंभर रुपये घेतले जात असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.

पुरुषोत्तमपुरीत विनापासधारकांची घुसखोरी, भाविकाकडून जीर्णोध्दासाठी घेतले जाऊ लागले पैसे तीन वर्षांपूर्वी पुरुषोत्तम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळून दिला. त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. भगवान पुरुषोत्तमची मूर्ती एका शेडमध्ये ठेवण्यात आली आहे. मंदिर समितीकडून भाविकांकडून पुरुषोत्तम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी घेतला जाऊ लागला आहे.

दर्शनासाठी सहा तास लागले

आम्ही आमच्या गावातील पंधरा-वीस महिलांना घेऊन दर्शनासाठी आलो होतो. परंतु या ठिकाणच्या नियोजनामुळे दर्शनासाठी सहा तास लागले यामुळे वृद्धांची खूपच परवड झाली, असे तुळजापूर येथील भाविक विनोद घोडके यांनी सांगितले

सावलीची सोय नाही, प्यायला पाणी नाही.
गोदावरी नदीकाठी आंघोळीला गेलेल्या महिलांनादेखील भरउन्हात थांबावे लागले. या ठिकाणी कुठलीच पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचा आरोपदेखील भाविकांनी केला असून येथे डबल पैसे देऊन पाण्याची बॉटल विकत घेण्याची वेळ आली असल्याचे भाविकांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनही सीसीटीव्ही बंद

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मागील महिन्यात बैठक घेऊन मंदिरासह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे सांगितले होते. परंतु हे कॅमेरे बंद असून मंदिरातील सीसीटीव्हीदेखील बंद होते. मंदिर समितीकडून नियोजन केले नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने याचा फायदा घेत चोरांनी महिलांचे दागिने लांबवले.

No comments:

Post a Comment