Tuesday, June 3, 2025

धारूर-केज रस्त्यावर दुचाकीस्वाराला इथेनॉल टँकरने चाकाखाली चिरडले. तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.


धारूर (प्रतिनिधी): धारूर-केज राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ सोमवारी रात्री सुमारे आठ वाजता झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंगद लांडगे (वय २७, रा. पिसेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अंगद लांडगे हे केज येथील एका दुकानात मॅनेजर पदावर कार्यरत होते. दुकानाच्या उधारी वसुलीसाठी ते धारूर येथे आले होते. काम आटोपून दुचाकीवरून परत जात असताना टोलनाक्याजवळ अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या इथेनॉल टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, या युवकाचे केवळ आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर इथेनॉल टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment