स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा, माजी शिक्षकांचा भावनिक सन्मान.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- श्री वैद्यनाथ विद्यालय, परळी येथील सन 2000 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला. आज रविवार, दिनांक 22 जून 2025 रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या खास कार्यक्रमात जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. एकेकाळी एकत्र शाळेच्या बाकावर बसणारे वर्गमित्र, आज विविध क्षेत्रात स्थिरावलेले असून, अनेकांनी व्यवसाय, पत्रकारिता, शासकीय सेवा, शिक्षण, वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते माजी शिक्षकांचा सन्मान समारंभ. विद्यार्थ्यांनी आपल्या आदरणीय शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. शिक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा समोर पाहून, आज पुन्हा वर्ग भरल्यासारखे वाटले, असे भावनिक उद्गार काढले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना व स्वागतगीत सादर करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख, सध्याची व्यावसायिक स्थिती व शालेय काळातील आठवणी शेअर करताना वातावरण अगदी भावनिक झाले. वर्गातील काही विद्यार्थ्यांनी शाळेतील विनोदी प्रसंग, गमतीदार आठवणी रंगवून सांगितल्या, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे क्षण रंगले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विदेशात कार्यरत असून, त्यांनी ऑनलाइन स्वरूपात सहभागी होत आपले मनोगत व्यक्त केले. हे पाहून स्नेहमेळाव्याचे आयोजन अधिक संस्मरणीय ठरले.
या मेळाव्यासाठी विशेष आकर्षण म्हणून शाळेचा वर्गजमवून ‘क्लासरूम सीन’ तयार करण्यात आला होता. काही माजी शिक्षकांनी त्या वर्गात पुन्हा एकदा थोडक्यात शिकवणी सत्र घेतले, जे क्षण अक्षरशः सर्वांच्या आठवणीत कायमचे कोरले गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांशी पुन्हा संवाद साधला. या स्नेहमेळाव्यामुळे आपल्या सर्वांच्या नात्यांना नव्याने बहर मिळाला, असे अनेकांनी व्यक्त केले. भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम दर 5 वर्षांनी आयोजित करण्यात यावेत, असा निर्धार या सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला.
या यशस्वी आयोजनामागे आयोजन समितीतील श्री.श्रीकांत रंगनाथ खके, सौ.रुपाली सूर्यकांत कापसे (वाकडे ) श्री.सचिन बापुराव डाके यांचा मोलाचा सहभाग होता. सर्व उपस्थितांनी एकमुखाने या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.
दरम्यान, या स्नेहमेळाव्यात 2000-2001 बॅचच्या मयत झालेले गुरूवर्य शिक्षक व सहकारी मित्र यांना उपस्थित शिक्षकवृंद व माजी विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
No comments:
Post a Comment