मुंबई: (प्रतिनीधी ) पुण्यापाठोपाठ मुंबईतही करोनाचे दोन रुग्ण आढळल्याने राज्य सरकार खडबडून जागे झालं आहे. राज्यात कोणतेही मोठे समारंभ न घेण्याचा निर्णय आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांनाही मोठ्या समारंभांचं आयोजन न करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. तसेच आयपीएलचं आयोजन रद्द करायचं की नाही, याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी आज
प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील बैठकी तील तपशील सांगितला. राज्यात गर्दी होईल असे कोणतेही मोठे समारंभ न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर राजकीय पक्षांनाही असे समारंभ टाळण्याचं आवाहन करण्यात आल्याचं ना.राजेश टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागानेही शंभर टक्के गर्दी टाळण्याच्या कडक सूचना केल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
*आयपीएलचा निर्णय लवकरच*
आयपीएलचे सामने बघण्यासाठी एकावेळी ८० ते ९० हजार लोकं एकत्र जमतात. करोनाच्या वातावरणात अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्याची सरकारची इच्छा नाही. या विषयावर आज कॅबिनेटमध्ये प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यात दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली. आयपीएलचे सामने व्हावेत, पण तिकिट विक्री करण्यात येऊ नये. तिकिट विक्रीशिवाय सामने भरवण्यात यावेत. लोकांनी घरीच बसून थेट प्रक्षेपण पाहावं हा एक पर्याय समोर आहे. आयपीएलचे सामने पुढे ढकलण्याचा दुसराही पर्याय आहे. त्यावरही विचार झाला. कारण रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणं खेळाडूंनाही प्रोत्साहन देणारं ठरणार नाही. त्यामुळे या दोन्ही पर्यायांवर चर्चा झाली असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं ना.राजेश टोपे म्हणाले .
No comments:
Post a Comment