विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचे प्रशिक्षण देणारा हा बाबा आपण दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा तर करत होता. तसेच प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत अश्लील भाषेत त्यांचा पाणउतारा करत होता. अखेर त्याला धडा शिकवण्यात आला. तसेच विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून या भोंदू बाबाला योगवर्ग घेण्याची परवानगी देणारे क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षण किरण शूरकांबळे रडारवर आले असून त्या दोघांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या योगी बाबाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश बुधवारी केला होता.
काय आहे प्रकरण ?
विद्यापीठाच्या क्रीडा विभागात गेल्या एक ते दीडवर्षापासून या ‘योगी बाबा’चे योगवर्ग अनधिकृतपणे सुरू आहेत. आपण योगाद्वारे मायग्रेन, लकवा यासारखे दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा हा योगीबाबा करत होता. एका महिलेच्या मुलाला चालताही येत नव्हते परंतु आपल्या योगविद्येमुळे तो मुलगा चालायला लागला, असे दावा करत त्या भोंदूबाबाने विज्ञानालाच आव्हान दिले. त्याच्या दाव्याला पुष्टी करणारी एक महिलाही त्याच्यासोबत होती.
त्यांचे नाव ऐकून आठवडाभरापूर्वी विद्यापीठातील काही विद्यार्थिनी या ‘योगी बाबा’च्या योगवर्गात प्रशिक्षणासाठी जायला लागल्या होत्या. पण या विद्यार्थिनींना मात्र तेथे वेगळाच अनुभव आला. तुमचे नखरे सहन करायला मी काय तुमचा नवरा आहे का?’, ‘तुम्ही छपरी मुली आहात…’ अशा अश्लील शब्दात तो योगगुरू मुलींशी बोलत होता. विद्यार्थिनींनी त्यावर आक्षेप घेत त्याला भाषा आणि वर्तन नीट ठेवायला सांगितले. मात्र तरीही त्याचे हे उद्योग सुरूच होते.
अखेर संतापलेल्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांना आपबिती सांगितली. मग काही कार्यकर्ते घेऊन वडमारे जाब विचारण्यासाठी पोहोचले. त्यांनी या ‘योगीबाबा’ला जाब विचारला. तेव्हा तो निर्लज्जपणे बोलला आणि आपण तसेच बोलल्याचे कबूल केले. अखेर वडमारे यांनी त्या बाबाच्या कानशिलात लगावून धडा शिकवला.
No comments:
Post a Comment