Tuesday, July 16, 2024

पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाण पत्राची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून त्वरित योग्य ती कारवाई करावी : डॉ. संतोष मुंडे.


*खोटे दिव्यांग प्रमाणपत्र धारक शोधून कडक कारवाई करण्यासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धनंजय मुंडे व दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनायांना. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अहमदनगर च्या जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्यानंतर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती  रुग्णालयानेही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे सोमवारी  उघड झाले आहे. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाण पत्राची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे.

तसेच शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असणारे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र धारक शोधून कडक कारवाई करण्यासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धनंजय मुंडे व दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना भेटणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे अनेक कारनामे उघड होत आहे. त्यातच मंगळवारी खेडकर यांनी ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचा प्रकार उघड झाला. दरम्यान, खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले होते. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयातून २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर आता वायसीएम रुग्णालयातून ऑगस्ट २०२२ मध्ये ७ टक्के दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामध्ये खेडकर यांना ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे नमूद केले आहे. 

शिपाई असो की सनदी अधिकारी किंवा प्रशासनातील कोणतीही व्यक्ती कायद्यासमोर सगळेच समान आहेत. जिल्हाधिकारी असो की पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी असो की शिक्षण अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी सर्वांना समान न्याय द्यावा. खाते महसूल, पोलीस (गृह), शिक्षण, आरोग्य किंवा प्रशासनाचा कोणताही घटक असेल तरी त्यातील बोगस प्रमाणपत्र बाळगणाऱ्यांवर कारवाई हवी नैसर्गिकरीत्या जे बांधव किंवा भगिनी खऱ्या अर्थाने अपंगत्व व दिव्यांग आहेत, अशांना शासकीय योजनेसह अन्य लाभ मिळाला पाहिजे. खोटे प्रमाणपत्र बनवून किंवा सादर करून शासकीय नोकरी मिळवित लाभ उचलत असतील तर अशा लोकांची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई होणेअपेक्षित आहे. जेणेकरून खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही अशा भावना डॉ. संतोष मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment