अहिल्या नगर - (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय ५८) यांनी शनिवारी सकाळी रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. निंबळक शिवारात सकाळी नऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांनी ते शासकीय सेवेतून निवृत्त होणार होते. त्याआधीच त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
भिंगारमधील साईनगरी परिसरात राहणारे देवतरसे शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडले. त्यानंतर निंबळक रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयात त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी आणले असता, तिथे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
देवतरसे हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. यापूर्वी त्यांनी श्रीगोंदा आणि शेवगाव तहसीलमध्येही काम केले होते. त्यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव पाहता, त्यांनी आत्महत्या का केली? हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते, अशी कुजबुज कर्मचारी वर्गात सुरू आहे. वरिष्ठांकडून होणारा कामाचा जाच या आत्महत्येला कारणीभूत आहे का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. अहिल्यानगरचा महसूल विभाग हा राज्यात लखिना पॅटर्नसाठी ओळखला जातो. मात्र, एका कर्तव्यदक्ष नायब तहसीलदाराने अशा प्रकारे जीवन संपवल्याने जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देवतरसे यांच्या निधनामुळे एका अनुभवी अधिकाऱ्याला विभाग मुकला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी
ही आत्महत्या केवळ वैयक्तिक कारणातून नसून त्यामागे प्रशासकीय कारणे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, जेणेकरून आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment