Wednesday, February 4, 2026

आरोग्य विभागात बोगस नियुक्ती पत्रांचा धुमाकूळ.लाखाेंचा गंडा घालणारे रॅकेट बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश.

या रॅकेटने फसवणुकीसाठी कागदपत्रांचा बनाव रचला आहे. काही उमेदवारांना दिलेल्या आदेशावर 'उपसंचालक कार्यालय, धाराशिव' असा उल्लेख आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, धाराशिव येथे आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालयच अस्तित्त्वात नाही; धाराशिवचा कारभार लातूर उपसंचालक कार्यालयातून चालतो. तसेच पुणे उपसंचालक कार्यालयाच्या नावे देण्यात आलेल्या आदेशाचा फॉरमॅटही पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप तरी उमेदवारांनी याची लेखी तक्रार कोठेही दिली नसली तरी त्यांची धावपळ मात्र सुरू झाली आहे. हे उमदेवार बीडच नव्हे तर धाराशिव, यवतमाळ, पुणे, बुलढाणा, जालना आदी जिल्ह्यांतील असल्याची माहिती आहे.

१७ लाखांपर्यंत वसुली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यसेवक पदासाठी एका उमेदवाराकडून १५ ते १७ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. बनावट आदेश हाती पडल्यानंतर आणि नियुक्तीसाठी गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे उमेदवारांच्या लक्षात आले. आता हे फसवणूक झालेले तरुण पैसे घेणाऱ्या एजंटांचा शोध घेत आहेत.

बीडमध्ये यापूर्वीही घोटाळा.

यापूर्वीही बीडमध्ये भरती घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने हे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि अस्तित्त्वात नसलेल्या कार्यालयांचे शिक्के वापरून सुशिक्षित बेरोजगारांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकाव्यात, असे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

म्हणे, तीन महिने ट्रेनिंग घ्या.

बोगस नियुक्ती आदेश दिल्यानंतर या उमेदवारांना मुंबईतच तीन महिने ट्रेनिंग घ्यावे लागेल, असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, ही ट्रेनिंग कोणत्याही शासकीय रुग्णालयाऐवजी खासगी अथवा ट्रस्टशी संलग्न असलेल्या रुग्णालयात दिले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. फसवणुकीचा हा बनाव अधिक खरा वाटावा, यासाठी हा ट्रेनिंगचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे.

एफआयआर दाखल करणार.

मी बनावट आदेश पाहिले. आमच्याकडे उपसंचालक कार्यालय नाही. तसेच माझी बनावट सही वापरली आहे. असे कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाहीत. आता यासंदर्भात सीईओ यांच्याशी बोलून एफआयआर दाखल करणार आहे.- डॉ. सतीश हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव

No comments:

Post a Comment