परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - परळी वैजनाथ नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक 10 मधील संपूर्ण परिसर सध्या मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या संतापाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या वार्डात स्ट्रीट लाईटची सुविधा अत्यंत अपुरी असल्याने संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेला असतो. परिणामी नागरिकांना रात्री ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अपघात, चोरी, महिलांची असुरक्षितता यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, वार्ड क्रमांक 10 मधील अशोक नगर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी आजही स्वतंत्र व योग्य पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना रोजच्या रोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेक कुटुंबांना दूरवरून पाणी आणावे लागत असून, नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगर परिषदेकडून कर वसुली नियमितपणे केली जाते; मात्र त्या बदल्यात मूलभूत सुविधा देण्यात अपयश येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “कर आम्ही भरायचा आणि सुविधा मात्र मिळत नाहीत, हा अन्याय किती दिवस सहन करायचा?” असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
तरी वार्ड क्रमांक 10 मधील संपूर्ण भागात तातडीने आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यात याव्यात तसेच अशोक नगर परिसरात स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मंजूर करून प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नगर परिषद प्रशासनाने या दोन्ही गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन ठोस व वेळबद्ध कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, की वार्ड क्रमांक 10 चे नागरिक अंधारात आणि तहानलेलेच राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
No comments:
Post a Comment