बीड (प्रतिनिधी): बीड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा एका पुतण्याला पाठिंबा देत दुसऱ्याला विरोध केला आहे. यामुळे क्षीरसागर काका-पुतण्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. राजकारणाचा अनुभव असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी पहिल्यांदाच बीड पालिका निवडणुकीसाठी बैठक घेत भाजप उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांचे राजकीय स्थान स्पष्ट झाले आहे.
तिरंगी लढत अन् अण्णांची गुगली.
बीड पालिकेवर आतापर्यंत क्षीरसागर कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, अंतर्गत मतभेदांमुळे आमदार संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) हे आपल्या उमेदवारांसाठी मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. दुसऱ्या बाजूला डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यादेखील भाजपकडून उमेदवारांसाठी धावपळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर, जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतीच गेवराईतील भाजपच्या उमेदवार गीता पवार यांचे पती बाळराजे पवार आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांची भेट घेत राजकीय गुगली टाकली. आता भाजप (योगेश क्षीरसागर / जयदत्त समर्थक), राष्ट्रवादी (अजित पवार गट / पंडित बंधू) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट / संदीप क्षीरसागर) अशी तिरंगी लढत बीडमध्ये अधिक तीव्र झाली आहे.
संदीप क्षीरसागरांना पुन्हा विरोध.
संदीप क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून राजकीय मतभेदामुळे वेगळे झाले. त्यांनीच विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत त्यांनी भाऊ डॉ. योगेश यांच्यावर निसटता विजय मिळवला. तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांनी डाॅ. योगेश यांना पाठिंबा दिला होता. परंतु, विजय मिळवता आला नाही. आतादेखील त्यांनी डॉ. योगेश यांच्याच पाठीमागे उभे राहात भाजपचा प्रचार सुरू केला आहे. संदीप क्षीरसागर हे त्यांचे राजकीय विरोधक कायम असल्याचे दिसते.
No comments:
Post a Comment