परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आभा गणेश मुंडे हिची 25 वी राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग स्पर्धा (National Para Swimming Championship) साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दिनांक 15 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान जी.एम.सी. बालयोगी कॉम्प्लेक्स, हैदराबाद येथे होणार आहे.
कु. आभा गणेश मुंडे ही दोन्ही पायांनी अपंग असूनही तिच्या अतूट इच्छाशक्ती, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र संघाकडून तिची निवड झाली असून ती 50 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 100 मीटर बटरफ्लाय या तीन प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज विद्यावर्धिनी विद्यालयात कु. आभाचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. राजेश्वर नीला, क्रिडाशिक्षक विजय मुंडे, बालासाहेब हंगरगे, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी तिच्या यशाचे कौतुक करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कु. आभाने आपल्या अडचणींवर मात करत राष्ट्रीय स्तरावर पोहोचून परळी शहराचाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे. तिच्या या यशामुळे अपंगत्वावर मात करूनही उज्ज्वल यश मिळविता येते, हा प्रेरणादायी संदेश समाजाला मिळाला आहे.
No comments:
Post a Comment