परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी नगर परिषद निवडणुकीची रणधूमाळी दिवसेंदिवस रंगतदार होत असताना प्रभाग क्रमांक ७ मधून सौ. अश्विनी राहुल केंद्रे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रहमत नगर, इंदिरानगर, पद्मावती, संभाजीनगर, आनंदनगर आणि गजराज नगर या विस्तृत व विविध समस्यांनी ग्रस्त परिसरांचा समावेश असलेल्या या प्रभागात नवीन नेतृत्वाच्या शोधात असलेले मतदार आता सौ आश्विनी राहुल केंद्रे यांच्या नावाकडे उत्सुकतेने पाहू लागले आहेत.
*प्रभागातील प्रश्न आणि सौ अश्विनी राहुल केंद्रे यांची भूमिका*
सौ. अश्विनी राहुल केंद्रे यांनी आपल्या उमेदवारीच्या घोषणेनंतर प्रभागातील नागरिकांशी सखोल संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे. रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची अपुरी उपलब्धता, नालेसफाई, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, युवकांसाठी संधी यांसारखे प्रश्न प्रभागात चांगलेच जाणवतात. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी दृढनिश्चयाने काम करण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले.
"मतदारांनी २ डिसेंबर रोजी मतदानरूपी आशीर्वाद देऊन प्रामाणिक काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ द्यावी," असे आवाहन सौ. अश्विनी राहुल केंद्रे यांनी नागरिकांना केले.
*१९ तारखेला संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*
बुधवार दि. १९ रोजी प्रभाग क्रमांक ७ मधील संपर्क कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात होणार आहे. या कार्यालयातून सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या तक्रारी, सूचना व मागण्या समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक महिला, तरुण, विविध समाजातील मान्यवर आणि समर्थक मोठ्या संख्येने हजेरी लावतील, अशी माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.
*राहुल केंद्रे यांचा निर्णय आणि स्थानिकांमध्ये वाढती उत्सुकता*
राहुल रामचरण केंद्रे हे परळी शहरात नेहमीच तत्परतेने मदतीला धावणारे, कोणत्याही समस्येवर त्वरित उपाय शोधण्याचा प्रयत्न करणारे म्हणून ओळखले जातात. प्रभागात त्यांचा संपर्क आणि लोकप्रियता चांगली आहे. सुरुवातीला भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; परंतु अंतिम क्षणी पक्षात झालेल्या राजकीय समीकरणांमुळे उमेदवारी हातातून गेल्याने त्यांनी पत्नी सौ. अश्विनी राहुल केंद्रे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर प्रभागातील निवडणुकीची लढत आणखी चुरशीची झाली आहे. मतदारांमध्ये सौ अश्विनी राहुल केंद्रे दाम्पत्याला चांगले संख्याबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.
*निवडणुकीचे तापमान चढू लागले*
उमेदवारी जाहीर होताच सौ. अश्विनी राहुल केंद्रे यांनी प्रचाराला जोर देण्यास सुरुवात केली आहे. घर भेटी, महिला गाठीभेटी, युवा संवाद, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, गल्ली-गल्लीत भेटीगाठी अशा विविध उपक्रमांतून त्या लोकसंपर्क वाढवत आहेत. मतदारांच्या प्रतिक्रिया सकारात्मक असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, प्रभागातील इतर उमेदवारही आपापल्या प्रचार मोहीमेत गुंतले असून प्रत्येक पक्षाने आपले एकत्रीकरण सुरू केले आहे. या प्रभागातील मतदारसंख्या, स्थानिक समीकरणे आणि वाढती राजकीय हालचाल पाहता येथील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आधीपासूनच स्पष्ट दिसत आहेत.
No comments:
Post a Comment