परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषण व सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावर यंदा पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील या निर्णयाची अंमलबजावणी आदरणीय जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. नवनीत कावत साहेब यांच्या मार्गदर्शना खाली शिस्तबद्ध रितीने झाली.
यंदा परळी शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या तालावर, विविध पोशाखांनी सजलेल्या भव्य मिरवणुका पाहायला मिळाल्या. डीजेमुक्त मिरवणुकी मुळे ध्वनीप्रदूषण पूर्णपणे टळले आणि हरवलेली पारंपरिकता पुन्हा नव्या जोमाने अनुभवायला मिळाली. विशेष म्हणजे, शहरात प्रथमच महिलांच्या ढोल पथकांची भव्य उपस्थिती होती. महिलांनी ढोल-ताशांच्या तालावर दिलेला नजराणा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोशाख परिधान करून, शिस्तबद्ध रितीने, संयमानं मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी कुठेही वादविवाद, भांडणे किंवा गोंधळ झाल्याचे चित्र दिसून आले नाही. शिस्त, परंपरा आणि उत्साह या तिन्हींचा सुंदर संगम या मिरवणुकांमधून दिसून आला.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी पोलिस अधीक्षक साहेबांनी सोशल मीडिया, वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांतून आवाहन केले होते. परळीतील मिरवणुकांमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला. कोणत्याही प्रकारच्या नशेविना, शुद्ध भक्तिभावाने व आनंदात गणेशभक्त वाजंत्रींच्या तालावर नाचत-गात होते.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान परळी शहर पोलिस स्टेशन व संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून संपूर्ण वातावरण सुरक्षित ठेवले. मिरवणुकीत सहभागी प्रत्येक गणेश मंडळ, ढोल पथक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय ठरला.
या यशस्वी आयोजनाबद्दल परळी शहर पोलिस स्टेशन व संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवकुमार राजेश्वर आप्पा केदारी, हिंद नगर परळी वै यांनी सांगितले की,
"यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त पार पडल्यानं ध्वनीप्रदूषण रोखलं गेलं, पारंपरिक वाद्यांना संजीवनी मिळाली आणि महिलांच्या सहभागामुळे सांस्कृतिक रंगतही वाढली. अशा प्रकारे शिस्तबद्ध व परंपरेनं होणारे उत्सव हेच खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देणारे आहेत."
No comments:
Post a Comment