परभणी (प्रतिनिधी) : गंगाखेड तालुक्यातून येथून जवळच असलेल्या सोनपेठ तालुक्यातील वडगाव रेल्वे स्थानकावरील ट्रॅक बदलण्याच्या कामादरम्यान काढून टाकण्यात आलेले जुने रेल्वे ट्रॅक चोरीची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी परभणी येथील आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) कडे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरपीएफने केलेल्या तपासात १३ आरोपीची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेत चोरीस गेलेले अंदाजे ३० लाख रुपये किंमतीचे रेल्वे ट्रॅक तेलंगणा राज्यातील विकाराबाद येथून जप्त केले. या चोरीत रेल्वेच्या अभियंताचा सहभाग असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की परभणीतील सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथील रेल्वे ट्रॅक बदलण्याच्या कामादरम्यान काढून टाकण्यात आलेले अंदाजे ५९.९९० मेट्रिक टन रेल्वे ट्रॅक (अंदाजे किंमत २९,९७,८३७ रुपये) चोरीस गेल्या प्रकरणी आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) कडे गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा नांदेड येथील आरपीएफ गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
या चोरीच्या गुन्ह्यात नांदेड रेल्वे विभागातील वरिष्ठ स्थायी मार्ग निरीक्षक (पीडब्ल्यूआय) सतीश बाबू यांची सक्रिय भूमिका असल्याचे उघड झाल्याने व वैद्यकीय कारण सांगून त्यांनी चौकशीत सहकार्य करण्याचे टाळत पाय मोडल्याचा दावा केल्यामुळे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी कामगार, कंत्राटदार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता यात सहभागी १३ आरोपींची ओळख पटली व रेल्वेचे पूर्णा येथील अभियंता सतीश बाबू, परळी येथील सय्यद रसूल सय्यद हसन आणि त्यांचे सहकारी चोरीत सहभागी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही त्यांच्याकडून तपासाला सहकार्य मिळत नसल्यामुळे आरपीएफने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात ठोस पुरावे सादर केले.
न्यायालयाने चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिल्याने मुख्य आरोपी अभियंता सतीश बाबू यांच्यासह शेख राशिद शेख रफीक, शेख मुजीब शेख हबीब, सय्यद रसुल, शाहीद बुढन, शेख आदिल शेख अकबर, शेख इसाक शेख चांद, जुबेर गुलफाम रसुल सय्यद, सलीम मेहबुब शेख, रशिद वुसुफ खान पठाण, मोहम्मद पठ्ठाण उर्फ कडू मुसा पठाण, अजहर नूर शेख, शेख अजहर शब्वीर यांची चौकशी करत चोरीस गेलेले रेल्वेचे साहित्य गुरुवार १० जुलै रोजी तेलंगणा राज्यातील विकाराबाद परिसरातील सुगना स्टील कंपनीतुन जप्त करत वाहनाने परभणी रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली.
या चोरीच्या तपास पथकात नांदेड सीआयबीचे निरीक्षक विनोद कुमार मीना, सहाय्यक उपनिरीक्षक शेख जावेद इनामदार, पद्माकर मोगरे, कुंदन मीना, रणजित सिंग आदींचा समावेश होता. त्यांनी सिकंदराबाद येथील आयजी आरोमा सिंग ठाकूर, नांदेड आरपीएफचे आयुक्त अमित प्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment