बीड (प्रतिनिधी) नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणांमध्ये वीस पेक्षा अधिक अधिकारी आणि दोन ते तीन संस्थाचालक यांना अटक झाल्यानंतर असे प्रकार राज्यभर झाल्याचे समोर आले आहे नागपूर अमरावतीनंतर जळगाव जिल्ह्यात देखील शेकडो बोगस शिक्षकांची नियुक्ती झाल्याची बाब उघडकीस आली आहे असाच काहीसा प्रकार मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात झाल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे त्यामुळे लाखो रुपये मोजून शिक्षक आणि कर्मचारी म्हणून नोकरीला लागलेल्या लोकांचे आणि संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
अधिकारी व संस्थाचालकांच्या हातमिळवणीतून पावणेसातशेहून अधिक नियमबाह्य शालार्थ आयडी जारी करण्यात आले. ज्यांना शिकवतादेखील येत नाही, अशा शिक्षकांची संस्थाचालकांनी शाळांमध्ये नियुक्ती करवून शासनाचे वेतन चालू करवून घेतले. अशा पद्धतीचे ३६ शिक्षण संस्थाचालक आता पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असून संबंधित शिक्षक व कर्मचारी, शाळा पदाधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी दिले.
नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक, लेखाधिकारी उदय पंचभाई आणि तत्कालीन वेतन अधिक्षक राजमोहन शर्मा यांनी शिक्षण उपसंचालकांकडून ‘शालार्थ’चे आदेश मंजूर करून न घेता स्वत:च्या स्तरावर ४९ शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती केली. गेली पाच वर्षे या बोगस ४९ कर्मचाऱ्यांनी पूर्ण पगार घेतला आहे. यामध्ये निधीचा अपहार झाला असून याप्रकरणाची सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील समोर आलेले शालार्थ घोटाळा प्रकरणी २५ कोटींच्या निधीचा अपहार झाल्याचा अंदाज आहे.
बीड जिल्ह्यातील काही संस्था चालकांनी प्राथमिक आणि माध्यमिक विभागात जी बोगस भरती केली त्या शिक्षकांचे मागील फरकाची बिले ज्या ज्या बँकांमधून काढण्यात आली त्या त्या बँकांच्या नावासहित शाळांची नावे देखील लवकरच न्यूज च्या माध्यमातून जनतेसमोर मांडली जाणार आहेत ज्या शिक्षकांनी थकबाकीची रक्कम एक रकमे संस्था चालकांच्या हातात उचलून दिली त्यांना आरबीआय कडून नोटीसा प्राप्त झाल्या असल्याचे देखील पुरावे हाती लागले असून ते देखील उघड केले जाणार आहेत.
पाळेमुळे किती खोल?
जळगावमधील घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी असण्याचा विभागाला संशय आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. अनियमिततेबाबत विभागातील अधिकाऱ्यांची पूर्वी खातेनिहाय चौकशी होत असे. सदर चौकशी संबंधित कर्मचारी निवृत्ती होईपर्यंत पूर्ण होत नसे. ‘शालार्थ’ घोटाळा प्रकरणी मात्र फौजदारी गुन्हे नोंदवण्यात येत असून ‘एसआयटी’ नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जळगाव ‘शालार्थ’ घोटाळा प्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच खासगी अनुदानित शाळांमधील जबाबदार कर्मचारी व पदाधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहोत. सदर गुन्ह्याचा तपास ‘विशेष चौकशी पथका’मार्फत (एसआयटी) करण्याबाबत पोलीस विभागास विनंती करण्यात आली आहे
No comments:
Post a Comment