परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मागील दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखीने यावर्षी श्रीक्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान ठेवले असून 8 जुलैला श्रीं ची पालखी पंढरपुर येथे पोहचणार आहे. या प्रवासादरम्यान तीर्थक्षेत्र श्री गजानन महाराज संस्थान शेगांवच्या श्रींच्या पालखीचे 24 जून रोजी तीर्थ क्षेत्र परळी वैजनाथ येथे आगमन होणार आहे.
तीर्थक्षेत्र शेगांव येथून 6 जून रोजी श्रींच्या पालखीने श्रीक्षेत्र पंढरपुरकडे पायदळ वारीने प्रस्थान केले आहे. श्रीक्षेत्र नागझरी, पारस, गायगाव, भौरथ, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देवूळगाव, पातूर, मेंडसी, श्रीक्षेत्र दडव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, मसला पेन, किनखेडा, रिसोड, पानकन्हेरगाव, सेनगाव, श्रीक्षेत्र नृसिंह नामदेव, डिग्रस, श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जवळा बाजार, आडगाव रंजेबुवा (हट्टा) मार्गे या पालखीचे 19 जून रोजी श्रीक्षेत्र त्रिधारा (ता. परभणी) येथे आगमन होणार आहे. तेथून सोमवार 20 जून रोजी परभणीत आगमन होणार असून नवा मोंढा परिसरात मुक्काम केल्यानंतर श्रींची पालखी 21 जून रोजी मंगळवारी ब्राह्मणगाव मार्गे दैठण्यास प्रस्थान करणार आहे. दैठण्यात मुक्काम केल्यानंतर पालखी 22 जून रोजी बुधवारी खळी मार्गे गंगाखेडास रवाना होणार आहे. पुढे 23 जुन वडगाव दादाहरी, परळी थर्मल, 24 जुन परळी वैजनाथ, 25 जुन कन्हेरवाडी, अंबाजोगाई, 26 जुन लोखंडी सावरगाव मार्गे 8 जुलैला श्रीं ची पालखी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे पोहचणार आहे.
No comments:
Post a Comment