Tuesday, June 14, 2022

बीडच्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पोलीस कोठडीत.

बीड (प्रतिनीधी) आठवडा भराच्या पोलीस तपासानंतर बीड जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार बाळू सोनावणेला अटक केली होती. औरंगाबाद येथून एम.बी.बी.एस.’चा कथित शिकाऊ डॉक्टर सतीश बाळू सोनवणेला बीड पोलिसांनी अटक केली आहे. नूतन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पदभार घेतल्यानंतर बीड येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला होता.

नेमके काय होते प्रकरणं?

बीड तालुक्यातील शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान 5 जून रोजी मृत्यू झाला होता, या महिलेस अगोदरच 3 मुली होत्या आणि चौथ्यांदा गर्भवती असलेल्या शीतलचा अवैध गर्भपात करण्यात आला होता.

या प्रकरणात पिंपळनेचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यातील सीमा डोंगरे या नर्सचा पाली येथील तलावात मृतदेह आढळून आला होता. या घटनेनेही त्या नर्सची हत्या की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला होता. यातील इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा सानप ही अंगणवाडी सेविकेला कारागृहात पाठवण्यात आले असल्याचे पोलिसानी सांगितले आहे. तर इतरांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचाही खुलासा यावेळी बोलताना नंदकुमार ठाकूर यांनी केला आहे.

शितलचा अवैध गर्भपात का केला गेला?

गणेश गाडे हा शीतलचा पती ऊसतोड मजूर असून त्याला आणि शीतलला अगोदरच 3 मुली आहेत. मात्र गणेश याला मुलगा हवा होता आणि याच हव्यासापोटी चौथ्यांदा गर्भवती असलेल्या त्याच्या पत्नीला सोनिग्राफी करून अवैध रित्या गर्भलिंग निदान केल्या गेले आणि 4 थ्या ही वेळेस गर्भात मुलगीच असल्याकारणावरून व निराश झालेल्या गणेश याने शीतलचा तिच्या मनाविरुद्ध अवैध गर्भपात करण्यात आला आणि अति रक्तस्त्राव झाल्याने शीतल गाडे या महिलेला आपला जीव गमवावा लागला.

कोण आहे सतीश सोनवणे?

एम.बी.बी.एस (M.B.B.S) करत असलेला कथित शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणे याने शीतल गाडे या महिलेचे गर्भलिंग निदान केल्याची कबुली दिली आहे. हा आरोपी औरंगाबाद येथून नगर या ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याला अटक केली.

शिकाऊ डॉक्टर सोनवणे हा एक गर्भलिंग निदान करण्यासाठी दहा हजार रुपये प्रत्येकी घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी दिली. सतीश सोनवणे हा यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका गवारे नावाच्या डॉक्टरचा सहकारी म्हणून काम करत होता. तसेच मनीषा सानप ही सोनवणेला फोनद्वारे माहिती देऊन बोलावून घ्यायची आणि सानपच्या घरी गर्भलिंग निदान केलं जायचं, असा जवाब त्याने दिला असल्याचेही नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
कथित डॉक्टर सोनवणे हा पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून महिलांची अवैध सोनोग्राफी (Sonography) करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात जोरात तपास सुरू असून आणखी बरेच नावे समोर येणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले आहे.

त्या शिकाऊ डॉक्टरला 4 दिवसांची पोलीस कोठडी

या मयत महिलेचे गर्भलिंग निदान ज्या शिकाऊ डॉक्टरने केले होते, त्या सतीश सोनवणेला पोलिसांनी औरंगाबादमधून ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गर्भलिंग चाचणीसाठी ठरवला होता शनिवार

गर्भलिंग निदानासाठी सावज मिळाले की त्यांना शनिवारी बोलवले जायचे. शुक्रवारी रात्रीच मनीषा सानप गर्भलिंग निदान करणाऱ्या सतीश सोनवणेला निरोप द्यायची. दर शनिवारी गर्भलिंग निदानाचा हा आठवडी बाजार मनीषा सानपच्या घरी भरायचा. शिवाय, मध्येही ग्राहक मिळताच हे काम केले जात होते. मागच्या चार महिन्यांत तब्बल 28 ते 30 वेळा सतीश नाम गेवराईत येऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गर्भलिंग निदानाचा कलंक लागलेल्या बीडमध्ये मुलींबाबतची नकोशी मानसिकता कायम असल्याचे दिसत आहे. परळीच्या सुदाम मुंडे प्रकरणानंतर गर्भलिंग निदानाला ब्रेक लागला होता. मात्र, मागील काही वर्षांत पुन्हा हा प्रकार बिनबोभाट सुरू होता, असे समोर आले. जालन्याचे डॉ. सतीश गवारे यांच्या माध्यमातून अनेक वर्ष हे काम मनीषाने केले. मात्र, त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याच्या सहाय्यकालाच तिने यासाठी तयार केले. मागील 4 महिन्यांत 28 ते 30 वेळा सतीश सोनवणे हा गेवराईत येऊन गेल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी कुणी एजंट होते का याचा शोध घेण पोलिसांना आवश्यक आहे.

फरार काळात पर्यटन

बीडमध्ये गुन्हा नोंद होऊन पोलिस आपला शोध घेत असल्याचे कळताच सतीश सोनवणे हा आपल्या काही मित्रांना घेऊन पुणे, लोणावळा या भागात पर्यटनासाठी गेला. त्याने मोबाइलही बंद ठेवला होता. मात्र, पोलिसांना फार काळ तो गुंगारा देऊ शकला नाही.

मनीषाची मागणार कोठडी

मनीषा सानपला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर व डॉक्टरच्या अटकेनंतर आता पुन्हा पोलिसांकडून मनीषाच्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मनीषा व सतीश यांची समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचे एस.पी ठाकूर म्हणाले.

धक्कादायक बाब म्हणजे सोनवणे याने आतापर्यंत जवळपास 150 महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या 150 पैकी किती मुली होत्या? आणि त्यापैकी किती महिलांचे गर्भपात केले गेले? याचा तपास करणे आता पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे.

No comments:

Post a Comment