मुंबई (प्रतिनीधी) :- बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना पत्र पाठवलं आहे. यातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे.
*सहा तासांत एकनाथ शिंदेंकडे सहा आमदार वाढले*
सकाळीच एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत सध्या 40 आमदार असल्याचे म्हटले होते. तसेच आणखी १० आमदार येतील असे म्हटले होते. आता दुपारी त्यांनी आपल्याकडे 46 आमदार आल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सहा तासांत सहा आमदार वाढले आहेत. शिवसेनेचे दोन आणि अपक्ष तीन असे पाच आमदार सायंकापर्यंत गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे.
*शिवसेनेच्या दोन आमदारांची घरवापसी*
एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 पेक्षा अधिक आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला असतानाच त्यापैकी शिवसेनेचे दोन आमदारांची घरवापसी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे दोन आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. या आमदारांपैकी एक म्हणजे नितीन देशमुख तर दुसरे आहेत उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील.
*संजय राऊत म्हणाले, विधानसभा बरखास्त होणार* :
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केल्यानंतर राज्य सरकार संकटात सापडले आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक ट्वीट केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे ट्वीट राऊतांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदाचा राजीनामा देऊ शकतात, असा या ट्वीटचा अर्थ होतो.
No comments:
Post a Comment