परळी वैजनाथ,(प्रतिनिधी)ः-
दैनिक मराठवाडा साथीचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते चंदुलाल बियाणी यांनी संकलित केलेल्या ’विचारधन’ या बोधपर कथासंग्राहाचे ‘विचारधन से जीवन क्रांती’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
परळी येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक पत्रमहर्षी मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीनिमित्त मराठवाडा साथी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या रविवारी (दि.16) औरंगाबाद येथील हॉटेल वर्षाइन च्या सभागृहात झालेल्या विशेष समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, मुख्य संपादक चंदुलालजी बियाणी, औरंगाबाद आवृत्तीचे संपादक जगदीश बियाणी, राजस्थानी पतसंस्थेचे बालचंद लोढा, महिला साथीच्या प्रमुख मनिषा भंसाळी, डॉ.प्रभू गोरे, प्रा.संध्या मोहिते, श्रावण गिरी, प्रशांत जोशी, संदीप बेदरे, अॅड.जीवनराव देशमुख, पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्यासह पत्रकार, नागरिक उपस्थित होते.
श्री चंदुलाल बियाणी यांनी संकलित केलेल्या ‘विचारधन’ या बोधपर कथा संग्राहाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पुस्तकाच्या दहा हजार प्रती वितरीत झाल्या. या कथासंग्रहाचे हिंदी भाषांतर करावे अशी मागणी अनेक वाचकांनी बोलून दाखवली. ‘विचारधन से जीवन क्रांती’ ही हिंदी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली असून त्याचे हिंदीत भाषांतर औरंगाबाद येथील प्रा.संध्या मोहिते यांनी केले आहे. हा ग्रंथ वाचकांसाठी प्रेरणादायी असल्याचे श्री कराड यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment